पुण्याच्या 'एएफएमसी'ला ‘राष्ट्रपती का निशान’ प्रदान

Story by  आवाज़ मराठी | Published by  Pooja Nayak • 7 Months ago
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

 

भारतीय सैन्याच्या तुकडीला दिला जाणारा सर्वोच्च सन्मान ‘राष्ट्रपती का निशान’ (राष्ट्रपतींचे मानचिन्ह) पुण्यातील सशस्त्र दल वैद्यकीय महाविद्यालयाला (एएफएमसी) प्राप्त झाला आहे. ‘एएफएमसी’च्या स्थापनेला ७५ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त शुक्रवारी (ता. १) राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सन्मान प्रदान केला.

‘एएफएमसी’च्या कॅप्टन देवाशिष शर्मा कीर्ती चक्र परेड मैदानावर सन्मान सोहळा झाला. सशस्त्र दलातील हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन आणि शीख धर्मगुरूंनी निशानाचा अभिषेक केला. त्यानंतर मुर्मू यांनी ‘एएफएमसी’ला राष्ट्रपतींचे मानचिन्ह प्रदान केले. यावेळी राष्ट्रपतींच्या हस्ते विशेष चिन्ह आणि स्टॅम्पचे प्रकाशन करण्यात आले. तसेच ‘प्रज्ञा’ या कॉम्प्युटेशनल मेडिसिनवर आधारित प्रणालीचेही उद्‍घाटन करण्यात आले. यावेळी संबोधित करताना मुर्मू म्हणाल्या, ‘‘देशाचे रक्षण करणाऱ्या वीरांच्या आरोग्याचे संरक्षण करण्याची महत्त्वपूर्ण जबाबदारी ‘एएफएमसी’च्या विद्यार्थ्यांवर आहे. आजवरच्या तुमच्या कारकिर्दीतून तुम्ही हे सिद्ध केले आहे. वैद्यकीय क्षेत्रातील संशोधनावर भर द्या आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करा. आज आपण पाहतोय की आर्टिफिशियल इंटेलिजन्स, प्रिसिजन मेडिसिन, थ्रीडी प्रिंटिंग, टेलिमेडिसीन आणि इतर तंत्रज्ञानाचा वैद्यक क्षेत्रात वापर होत आहे. तुम्ही सर्वांनी मिळून आमच्या तिन्ही सेवांमधील सर्व कर्मचाऱ्यांचे वैद्यकीय उपचार उच्च दर्जाचे असल्याची खात्री केली पाहिजे.’’

या दिमाखदार सोहळ्याला राज्यपाल रमेश बैस, सरसेनाध्यक्ष जनरल अनिल चौहान, दक्षिण मुख्यालयाचे प्रमुख लेफ्टनंट जनरल अजयकुमार सिंह, सैन्य वैद्यकीय सेवेचे महासंचालक लेफ्टनंट जनरल दलजित सिंग, ‘एएफएमसी’चे संचालक कमांडंट लेफ्टनंट जनरल नरेंद्र कोडवार यांच्यासह केंद्र, राज्य सरकार आणि सशस्त्र दलातील वरिष्ठ मान्यवर, तसेच एएफएमसीचे माजी प्रमुख, माजी संचालकांसह अधिष्ठाता आदी उपस्थित होते. लेफ्टनंट कर्नल विद्या रवी, मेजर स्वाती महापात्रा, स्क्वाड्रन लीडर क्षितिज श्रीवात्सव, मेजर अब्बास गाझी नकवी यांनी सूत्रसंचालन केले.

महिला अधिकाऱ्यांच्या निर्मितीत योगदान :
‘एएफएमसी’मधून शिक्षण घेणाऱ्या महिलांनी सैन्याच्या आरोग्य क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान दिल्याचे गौरवोद्गार मुर्मू यांनी काढले. त्या म्हणाल्या, ‘‘सैन्यातील जबाबदारीच्या पदांवर ‘एएफएमसी’चे माजी विद्यार्थी कार्यरत आहेत. देशाची पहिली महिला लेफ्टनंट जनरल पुनीता अरोरा आणि पहिली महिला एअर मार्शल पद्मा बंदोपाध्याय या ‘एएफएमसी’च्या माजी विद्यार्थिनी आहेत."