'भारत- पाक संघर्षात थेट हस्तक्षेप करणार नाही'

Story by  आवाज़ मराठी | Published by  Fazal Pathan • 3 h ago
अमेरिकेचे उपाध्यक्ष जे. डी. व्हान्स
अमेरिकेचे उपाध्यक्ष जे. डी. व्हान्स

 

भारत आणि पाकिस्तानमधील तणाव वाढत असताना आंतरराष्ट्रीय समुदायाने दोन्ही देशांना संयम राखण्याचं आवाहन केलं आहे. भारत-पाकिस्तानातील लष्करी संघर्ष जगाला परवडणारा नाही, असं संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस यांनी सांगितलं. अमेरिकेने या संघर्षात थेट हस्तक्षेप करणार नसल्याचं स्पष्ट केलं. रशियाने सिमला करार आणि लाहोर घोषणेच्या आधारे द्विपक्षीय संवादातून तोडगा काढण्याची सूचना केली.

पहलगाममधील 22 एप्रिल 2025 च्या दहशतवादी हल्ल्यात पाकिस्तानचा सहभाग असल्याचं भारताने जी-20 देशांसह जगातील प्रमुख देशांना सांगितलं. त्यानंतर ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत 6-7 मे रोजी दहशतवादी तळांवर हल्ले केले. ही कारवाई फक्त दहशतवाद्यांना लक्ष्य करण्यासाठी होती. पाकिस्तानी नागरी वसाहती किंवा लष्करी आस्थापनांना हानी पोहोचवण्याचा हेतू नव्हता. पण पाकिस्तानने चिथावणीखोर हल्ले केल्यास ठाम प्रत्युत्तर देण्याची भारताची तयारी आहे. याबाबत सर्व प्रमुख देशांना माहिती देण्यात आली.

ऑपरेशन सिंदूरनंतर संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस यांच्या प्रवक्त्यांनी निवेदन जारी केलं. नियंत्रण रेषा आणि आंतरराष्ट्रीय सीमेवर भारताच्या लष्करी कारवायांबाबत चिंता व्यक्त केली. “भारत आणि पाकिस्तानने कमाल संयम राखावा. दोन्ही देशांमधील लष्करी संघर्ष जगासाठी परवडणारा नाही,” असं गुटेरेस यांनी सांगितलं.

अमेरिकेची भूमिका
अमेरिकेने शांततेचा आग्रह धरला, पण थेट हस्तक्षेप न करण्याचं ठरवलं. उपाध्यक्ष जे. डी. व्हान्स म्हणाले, “हा संघर्ष आमचं काम नाही. आम्ही युद्धात अडकणार नाही.” पण अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ऑपरेशन सिंदूरनंतर पहिली प्रतिक्रिया दिली. भारताच्या कारवाईची माहिती असल्याचं सांगत तणाव लवकर कमी होईल, अशी आशा व्यक्त केली. परराष्ट्रमंत्री मार्को रुबियो यांनी सोशल मीडियावर दोन अण्वस्त्रधारी देशांमधील परिस्थितीवर लक्ष असल्याचं सांगितलं. शांततापूर्ण तोडग्यासाठी दोन्ही देशांशी संपर्क साधण्याचा मानसही त्यांनी बोलून दाखवला.

 कतारने भारत-पाक तणावावर चिंता व्यक्त केली. “शेजारधर्माचा आदर करावा आणि राजनैतिक मार्गाने तोडगा काढावा,” असं कतारने म्हटलं. शांतता आणि स्थैर्यासाठीच्या सर्व प्रयत्नांना पाठिंबा असल्याचंही जाहीर केलं. इराणनेही संयम बाळगण्याचे आवाहन केले आहे. इराणी परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते इस्माईल बधाई यांनी सध्याची परिस्थिती चिंताजनक असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली. तसेच दोन्ही बाजू संकाट कमी करू शकतील अशी अपेक्षाही व्यक्त केली. संयुक्त अरब अमिरातीचे परराष्ट्र मंत्री अब्दुल्ला बिन झापेद यांनीही भारत पाकिस्तानमधील तगावावर भाष्य करताना "शांतता, स्वैर्य आणि समृद्धीसाठी तसेच राष्ट्रांच्या सामाईक आकांक्षा साध्य करणासाठी मुत्सहेगिरी व संवाद है सर्वांत प्रभावी माध्यम आहे, अशी टिपणी केली.

शेजारी चीनने भारताची कृती खेदजनक ठरविताना अप्रत्यक्षपणे पाकिस्तानचे समर्थन केले. "चीन सर्व प्रकारच्या दहशतवादाच्या विरोधात असून भारत आणि पाकिस्तान परस्परांचे व  चीनचेही शेजारी आहेत आणि राहतील. दोन्ही देशांनी शांततेसाठी कृती करावी आणि गुंतागुंत वाढविणारी कृती टाळावी," असे आवाहन चिनी परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्याने केले.  तर तुर्कस्तानने उघडपणे पाकिस्तानची पाठराखण करताना भारताच्या ऑपरेशन सिंदूरला विरोध केला. तुर्कस्तानचे परराष्ट्रमंत्री हकान फिदान यांनी पाकिस्तानी अर्थमंत्री इताक डार यांच्याशी संपर्क साधून पाठिंबा दिला. पाकिस्तानी परराष्ट्र मंत्रालयानेच तुर्कीस्तानच्या या पाठिंब्याचा दावा करणारी पोस्ट केली होती. पाकिस्तानच्या सार्वभौमत्वाचे उसतंपन आणि निष्पाप नागरिकांच्या हत्येविरुद्ध तुर्कस्तान पाकिस्तानसोबत असल्याचे त्यात म्हटले होते.

'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  -

Awaz Marathi WhatsApp Group 
Awaz Marathi Facebook Page

Awaz Marathi Twitter