जगभरातून जमलेल्या १३३ कार्डिनलनी येथे सुरू असलेल्या परिषदेत, दुसऱ्या दिवशी २६७व्या पोपची निवड केली. अमेरिकेतील रॉबर्ट प्रिव्होस्ट यांची पोप म्हणून एकमताने निवड करण्यात आली. त्यानंतर त्यांनी लिओ चौदावे हे नाव स्वीकारले. पोप या पदावर प्रथमच एका अमेरिकी व्यक्तीची निवड झाली आहे.
पोप फ्रान्सिस यांचे मागील महिन्यात निधन झाल्यानंतर नव्या पोपची निवड करण्यासाठी बुधवारी (ता. ७) प्रक्रिया सुरू झाली. आज सिस्टिन चॅपलच्या चिमणीतून पांढरा धूर आला. हा पोपच्या निवडीवर शिक्कामोर्तब झाल्याचे मानल्याचा संकेत मानला जातो. याआधी गुरुवारी सकाळी दोन फेऱ्यांतील मतदान अनिर्णित ठरल्यानंतर पोपची निवड न झाल्याचे संदेश देणारा काळा धूर या चिमणीतून सोडण्यात आला होता. नवीन पोपसाठी दोन तृतीयांश किंवा ८९ मतांची गरज होती.
मात्र, अखेरीस संध्याकाळी सहा वाजून सात मिनिटांनी पोपच्या निवडीचा संकेत मानला जाणारा पांढरा धूर आल्यावर सेंट पीटर्स चौकात जमलेल्या गर्दनि एकच जल्लोष केला. धर्मगुरूंनी क्रॉसचे चिन्ह केल्यावर सर्वांनीच आनंद व्यक्त केला. नवीन पोपचे नाव जाणून घेण्यासाठी सर्वांचीच उत्सुकता शिगेला पोचली होती. पोप फ्रान्सिस यांच्या निधनानंतर नवीन पोपची निवड करण्यासाठी कार्डिनलची परिषद भरविण्यात आली होती.
नावाची घोषणा कशी होते ?
वरिष्ठ कार्डिनलकडून बॅसिलिकाच्या बाल्कनीतून लॅटिन भाषेत 'हाबेमुस पापम !' म्हणजेच 'आमच्याकडे आता पोप आहे', अशी घोषणा केली जाते. त्यानंतर त्या कार्डिनलकडून नव्या पोपचे जन्मनाव लॅटिनमध्ये वाचले जाते आणि त्यांनी जगभरातील दीड अब्ज ख्रिश्चन लोकसंख्येचे प्रतिनिधित्व करणाऱ्या कॅथॉलिक चर्चच्या नवीन पोपचे नाव जाहीर केले जाते. यानंतर नवीन पोप पहिल्यांदा सार्वजनिकरीत्या त्या बाल्कनीतून दर्शन देतात आणि लोकांना आशीर्वाद देतात.