ऑपरेशन सिंदूर: गृहमंत्री अमित शहांनी घेतला सीमा आणि विमानतळ सुरक्षेचा आढावा

Story by  आवाज़ मराठी | Published by  Fazal Pathan • 1 h ago
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह

 

भारत-पाकिस्तान तणाव वाढत असताना गृहमंत्री अमित शहा यांनी शुक्रवारी दिल्लीत उच्चस्तरीय बैठक घेतली. यात सीमावर्ती भाग आणि विमानतळांच्या सुरक्षेचा आढावा घेण्यात आला. शहा यांच्या निवासस्थानी झालेल्या या बैठकीला सीमा सुरक्षा दल (बीएसएफ), केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल (सीआयएसएफ) आणि गुप्तचर विभागाचे प्रमुख उपस्थित होते.

जम्मू-काश्मीरमधील नियंत्रण रेषेवर पाकिस्तान गेल्या काही दिवसांत जोरदार गोळीबार करत आहे. कुपवाडा, बारामुल्ला, उरी, पूंछ, मेंढर आणि राजौरी सेक्टरमध्ये झालेल्या या हल्ल्यांत सहा नागरिकांचा मृत्यू झाला आहे. मालमत्तेचंही मोठं नुकसान झालं असून पाकिस्तानच्या सततच्या चिथावणीखोर कारवायांमुळे सीमावर्ती भागात तणाव आहे. विमान वाहतुकीवरही याचा परिणाम झाला आहे. या पार्श्वभूमीवर गृहमंत्री शहा यांनी नागरिकांच्या सुरक्षेसाठी उपाययोजना आणि विमानतळ सुरक्षा वाढवण्यावर चर्चा केली.

गृह मंत्रालयाचे राज्यांना निर्देश
पाकिस्तानच्या हल्ल्यांमुळे गृह मंत्रालयाने शुक्रवारी सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना पत्र पाठवलं आहे.  ‘नागरी संरक्षण नियम-1968’ अंतर्गत नागरिक आणि मालमत्तेचं संरक्षण करावं, असं पत्रात म्हटलं आहे. महत्त्वाच्या सेवा सुरळीत ठेवण्यासाठीही सूचना देण्यात आल्या असून नागरी संरक्षण संचालकांना आपत्कालीन खरेदीचे अधिकार देण्यात आले आहेत. 

गृहमंत्री शहा यांनी ७ मे ला पाकिस्तान आणि नेपाळ सीमेलगतच्या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेतली. यात त्यांनी आवश्यक वस्तू आणि सेवांचा पुरवठा सुरळीत ठेवण्याचे निर्देश दिले. तसेच आपत्ती निवारण दल, नागरी संरक्षण आणि गृहरक्षक दल यांना सज्ज ठेवण्यास सांगितलं.

रस्ते वाहतुकीवर नजर
केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनीही काल सीमाभागतील परिस्थितीचा आढावा घेतला. सीमावर्ती राज्यांमध्ये आणीबाणीत रस्ते वाहतूक सुरळीत राहावी, यासाठी उपाययोजना करण्यात येत आहेत. या बैठकीला रस्ते वाहतूक मंत्रालय आणि सीमावर्ती राज्यांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. गडकरी यांनी राज्य सरकारे आणि सुरक्षा यंत्रणांशी समन्वय ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. 

सीमावर्ती भागात सतर्कता
पाकिस्तानच्या गोळीबारामुळे जम्मू-काश्मीरमधील कुपवाडा, बारामुल्ला आणि पूंछमध्ये तणाव आहे. स्थानिक प्रशासनाने नागरिकांना घरातच राहण्याचं आवाहन केलं आहे. अमृतसर, पठाणकोट, जालंधर, गुरुदासपूर आणि होशियारपूरमध्ये रात्री ब्लॅकआउट लागू केलं.

'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  -

Awaz Marathi WhatsApp Group 
Awaz Marathi Facebook Page

Awaz Marathi Twitter