'ऑपरेशन सिंदूर' ही भारताची दहशतवाद्यांविरुद्धची संयमित, नियंत्रित आणि तणाव टाळणारी कारवाई असून, पाकिस्तानने यापुढे कोणतीही चिथावणीखोर कृती केल्यास ती संघर्ष वाढवणारी ठरेल, असा सज्जड दम भारताने पाकिस्तानला दिला आहे. 'पहलगाममधील २२ एप्रिलचा दहशतवादी हल्ला हीच मुळात पहिली चिथावणी होती आणि भारतीय सैन्याने त्याचे उत्तर आपल्या कृतीतून दिले आहे,' असे परराष्ट्र सचिव विक्रम मिस्त्री यांनी स्पष्ट केले. तसेच दहशतवादाला खतपाणी घालण्याच्या पाकिस्तानी प्रवृत्ती अधोरेखित करताना, दहशतवाद्यांवर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्याची पाकिस्तानमध्ये पद्धत असावी, असा प्रहारही केला.
विक्रम मिस्त्री यांच्यासह संरक्षण मंत्रालयाच्या अधिकारी कर्नल सोफिया कुरेशी व विंग कमांडर व्योमिका सिंह यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन भारताच्या कारवाईची माहिती दिली. 'ऑपरेशन सिंदूर' अंतर्गत भारताने दहशतवादी तळांवर केलेल्या हल्ल्यात कोणतीही नागरी हानी झाली नाही आणि लष्करी आस्थापनांनाही लक्ष्य करण्यात आलेले नाही, असा पुनरुच्चार मिस्त्री यांनी केला. तसेच नागरिकांच्या जीवितहानीशी संबंधित पाकिस्तानचे सर्व दावे फेटाळून लावले. पहलगामधील दहशतवादी हल्ल्यानंतर भारत संयमाने प्रत्युत्तर देत आहे. मात्र पाकिस्तानकडून चिथावणी देणारी कोणतीही कारवाई झाल्यास त्यावर योग्य प्रत्युत्तर दिले जाईल आणि तसा योग्य प्रतिसाद दिला जात असल्याचे परराष्ट्र सचिवांनी स्पष्ट केले.
पाककडून खोटा प्रचार
पाकिस्तानकडून दहशतवादाबद्दल सातत्याने दिशाभूल करणारी माहिती दिली जात असल्याचे सांगताना विक्रम मिस्त्री म्हणाले, "पहलगाम हल्ल्याची जवाबदारी घेणारी 'टीआरएफ' ही संघटना लष्करे तैयबा दहशतवादी संघटनेचाच गट असल्याचे भारताने संयुक्त राष्ट्र सुरक्षा समितीच्या देखरेख समितीला सांगितले होते. सुरक्षा समितीच्या निवेदनात 'टीआरएफ'च्या उल्लेखाला पाकिस्तानकडून विरोध झाला होता. पाकिस्तानमध्ये कोणीही दहशतवादी नसल्याचे तेथील माहितीमंत्री म्हणत असले तरी पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांनी आणि माजी परराष्ट्रमंत्र्यांनी तेथील सरकारचा दहशतवादी गटांशी असलेला संबंध आधीच मान्य केला आहे. दहशतवादी ओसामा बिन लादेन कुठे होता आणि कोणी त्याला 'शहीद' म्हटले होते हे जगाला माहिती आहे."
'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा -
Awaz Marathi WhatsApp Group
Awaz Marathi Facebook Page
Awaz Marathi Twitter