नवी दिल्ली
भारताचा उदय आणि आर्थिक प्रगती ही कोणाच्या 'मर्जीवर' किंवा 'मेहरबानीवर' अवलंबून नसून, ती स्वतःच्या सामर्थ्यावर आधारित आहे, अशा शब्दांत परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी अमेरिकेला सुनावले आहे. 'रायसिना डायलॉग २०२६' या जागतिक विचारमंचावर बोलताना जयशंकर यांनी अमेरिकन अधिकाऱ्याने भारताच्या वाढत्या प्रभावावर केलेल्या टिप्पणीचा समाचार घेतला.
काही दिवसांपूर्वी अमेरिकेचे उप-परराष्ट्र सचिव ख्रिस्तोफर लँडाऊ यांनी असे म्हटले होते की, "अमेरिका भारताला चीनप्रमाणे आर्थिक प्रतिस्पर्धी बनू देण्याची चूक पुन्हा करणार नाही." त्यांच्या या विधानाचा संदर्भ घेत जयशंकर म्हणाले, "जेव्हा आपण एखाद्या देशाच्या उदयाबद्दल बोलतो, तेव्हा तो उदय तो देश स्वतःच ठरवत असतो. भारताचा उदय केवळ भारतच ठरवेल. हे आमच्या सामर्थ्यावर अवलंबून असेल, इतरांच्या चुकांवर नाही."
"भारताची प्रगती रोखणे आता अशक्य"
जयशंकर यांनी कोणाचेही नाव न घेता स्पष्ट केले की, भारताची वाटचाल ही पूर्णपणे स्वायत्त आहे. "आमची दिशा स्पष्ट आहे आणि आमची प्रगती आता कोणीही रोखू शकत नाही (Unstoppable)," असे त्यांनी ठामपणे सांगितले. हिंदी महासागराच्या सुरक्षेबाबत बोलताना त्यांनी नमूद केले की, भारत या प्रदेशातील प्रमुख शक्ती असून भारताच्या विकासामुळे या क्षेत्रातील इतर देशांनाही फायदाच होणार आहे.
रशियन तेलावरूनही सुनावले खडे बोल
दुसरीकडे, अमेरिकेने भारताला रशियाकडून तेल खरेदी करण्यासाठी ३० दिवसांची तात्पुरती 'परवानगी' (Waiver) दिली आहे, यावरूनही वाद निर्माण झाला आहे. अमेरिकेचे ट्रेझरी सेक्रेटरी स्कॉट बेसेंट यांनी भारताला 'चांगला अभिनेता' (Good Actor) संबोधत ही सवलत दिल्याचे म्हटले होते. यावर जयशंकर आणि भारत सरकारने स्पष्ट केले की, भारताला तेल खरेदी करण्यासाठी कोणाच्याही परवानगीची गरज नाही. भारताचे ऊर्जा धोरण हे केवळ राष्ट्रीय हितावर आधारित आहे, कोणत्याही 'पोकळ घोषणांवर' नाही.
विरोधकांनी या मुद्द्यावरून सरकारवर टीका केली होती, मात्र जयशंकर यांनी याला 'पॅट्रोनायझिंग' (दुसऱ्यावर उपकार केल्यासारखे बोलणे) वृत्ती म्हटले आहे. भारताने नेहमीच आंतरराष्ट्रीय कायद्यांचे पालन केले असून, आपले निर्णय घेण्यास देश समर्थ असल्याचे त्यांनी पुन्हा एकदा जगाला दाखवून दिले आहे.