पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात गुरुवारी १५२ मतदारसंघांमध्ये मतदानाला सुरुवात झाली. अभूतपूर्व सुरक्षा व्यवस्था आणि संपूर्ण निवडणुकीची दिशा ठरवणाऱ्या या अटीतटीच्या लढाईत मतदानाचा प्रारंभ झाला आहे.
उत्तर भागातील दार्जिलिंग आणि जलपाईगुडीपासून दक्षिण भागातील मुर्शिदाबाद, नदिया, बीरभूम आणि हुगळीपर्यंतच्या जिल्ह्यांमध्ये सकाळी ७ वाजल्यापासून मतदारांनी केंद्राबाहेर रांगा लावल्या आहेत. राज्यातील एकूण २९४ जागांपैकी निम्म्याहून अधिक जागांचा समावेश या पहिल्या टप्प्यात आहे. भाजपसाठी ही सुरुवातीलाच मोठी आघाडी घेण्याची संधी मानली जात आहे, तर सत्ताधारी तृणमूल काँग्रेससाठी सलग चौथ्यांदा सत्तेत येण्याच्या दृष्टीने ही सर्वात महत्त्वाची परीक्षा आहे.
निवडणूक आयोगाच्या माहितीनुसार, या टप्प्यात ३.६० कोटींहून अधिक मतदार मतदानासाठी पात्र आहेत. यामध्ये साधारण १.७५ कोटी महिला आणि ४६५ तृतीयपंथी मतदारांचा समावेश आहे. निवडणुकांसाठी राज्यात केंद्रीय निमलष्करी दलाच्या २,४५० कंपन्या म्हणजेच सुमारे २.५ लाख जवान तैनात करण्यात आले असून ८,००० हून अधिक मतदान केंद्रे अतिसंवेदनशील म्हणून जाहीर केली आहेत.
निवडणूक आयोगाने मालदा, मुर्शिदाबाद, उत्तर दिनाजपूर, कूचबिहार, बीरभूम आणि पूर्व वर्धमान या जिल्ह्यांवर विशेष देखरेख ठेवली आहे. हिंसाचार रोखण्यासाठी आणि मुक्त वातावरणात मतदान पार पडण्यासाठी २,१९३ पेक्षा जास्त शीघ्र प्रतिसाद पथके, पाळत ठेवणारी पथके आणि भरारी पथके तैनात केली आहेत.
राजकीयदृष्ट्या पहिल्या टप्प्याला मोठे महत्त्व आहे. यामध्ये उत्तर बंगालमधील सर्व ५४ जागांचा समावेश असून याच भागाच्या जोरावर २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपचा उत्कर्ष झाला होता. २०२१ च्या विधानसभा निवडणुकीतही भाजपने याच बळावर तृणमूल काँग्रेसला कडवे आव्हान दिले होते. १५२ जागांपैकी २०२१ मध्ये भाजपने ५९, तर तृणमूलने ९३ जागा जिंकल्या होत्या.
भाजपला संपूर्ण राज्याच्या लढाईत टिकून राहण्यासाठी उत्तर बंगालवर आपले वर्चस्व कायम राखणे गरजेचे आहे. तर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील तृणमूल काँग्रेससाठी दुसऱ्या टप्प्यापूर्वी आपली ताकद सिद्ध करण्यासाठी उत्तर बंगालमध्ये भाजपची लाट रोखणे महत्त्वाचे ठरेल.
मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षणानंतर (SIR) होत असल्याने या टप्प्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या प्रक्रियेत राज्यातील सुमारे ९१ लाख नावे मतदार यादीतून वगळण्यात आली आहेत. या मुद्द्यावरून प्रचारात मोठे ध्रुवीकरण झाले आहे. भाजपने घुसखोर आणि बोगस मतदारांची नावे हटवण्यात आल्याचा दावा केला असून तृणमूलने केंद्र सरकार आणि निवडणूक आयोगावर अल्पसंख्याक तसेच स्थलांतरित कामगारांना मतदानापासून वंचित ठेवल्याचा आरोप केला आहे.
पहिल्या टप्प्यात अनेक दिग्गज उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. यामध्ये विरोधी पक्षनेते सुवेंदू अधिकारी (भाजप, नंदीग्राम), माजी केंद्रीय मंत्री निशिथ प्रामाणिक (भाजप, माटाभांगा), राज्यमंत्री उदयन गुहा (तृणमूल, दिनहाटा), गौतम देव (तृणमूल, सिलीगुडी) आणि अधीर रंजन चौधरी (काँग्रेस, बहरामपूर) यांचा समावेश आहे. मतदानाचा दुसरा टप्पा २९ एप्रिल रोजी पार पडणार असून ४ मे रोजी मतमोजणी होणार आहे.