हिलाल अहमद राठेर : राफेल उडवणारे पहिले भारतीय पायलट

Story by  आवाज़ मराठी | Published by  Fazal Pathan • 8 h ago
वायुसेनेचे एअर व्हाईस मार्शल हिलाल अहमद राठेर.
वायुसेनेचे एअर व्हाईस मार्शल हिलाल अहमद राठेर.

 

गेल्या काही वर्षांपूर्वी काश्मीरच्या अनंतनागमधील एका तरुणाल दहशतवादाच्या भीतीने घर सोडावं लागलं होतं. तोच तरुण आज दहशतवाद्यांचा कर्दनकाळ ठरत आहे. दोन दिवसांपूर्वी भारताने पाकिस्तानमधील 9 दहशतवादी तळांवर हल्ला करून त्यांना उद्ध्वस्त केलं. ही कारवाई भारतीय सैन्याने ‘ऑपरेशन सिंदूर’च्या अंतर्गत केली. हे मिशन अजूनही सुरू आहे.  

हिलाल राठेर यांचा जन्म अनंतनागमध्ये झाला. त्यांचे वडील जम्मू-काश्मीर पोलिसमध्ये वरिष्ठ अधिकारी होते.  १९८० च्या दशकात काश्मीरमध्ये दहशतवाद वाढला होता. या दशकात हिलाल यांच्या वडिलांना सतत धमक्या मिळायच्या. त्यावेळी हिलाल यांना काही दिवस घराबाहेर रहावं लागलं होतं.  हिलाल यांनी नगरोटाच्या सैनिक स्कूलमधून सीबीएसई परीक्षेत प्रथम क्रमांक मिळवत  प्राथमिक शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण घेत हैद्राबादच्या वायुसेना अकादमीतून सर्वोत्तम पायलट बनले. त्यांना राष्ट्रपतींची पट्टिका आणि ‘स्वॉर्ड ऑफ ऑनर’ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे. वायुसेनेत त्यांना प्रेमाने ‘हैली’ म्हणतात.

राफेल आणण्यात महत्वाची भूमिका 
२०१९ मध्ये राफेल लढाऊ विमानं भारतात आणण्यात हिलाल यांनी महत्वपूर्ण भूमिका बजावली. ते फ्रान्समध्ये भारताचे एअर अटॅची म्हणून तैनात होते. भारतीय वैशिष्ट्यांनुसार १३ राफेल जेटच्या निर्मितीमध्ये फ्रेंच प्रकल्प व्यवस्थापन पथकासोबत त्यावेळी त्यांनी समन्वय साधला. 
 
बोर्डो-मेरिग्नाकपासून ७, ०००  किमीचा प्रवास करून राफेल भारतात यावं यासाठी त्यांनी रणनीती आणि नियोजन केलं होतं. पाकिस्तान आणि चीनशी तणाव वाढत असताना त्यांनी राफेल भारतात आणली होती.  मिराज-200 उड्डाणांचा विक्रम हिलाल यांच्या नावावर आहे. सर्व प्रमुख हवाई हल्ल्यांचे केंद्र असलेल्या ग्वाल्हेर एअरबेसचेही नेतृत्व त्यांनी केलं आहे. हे नेतृत्व करताना त्यांनी लढाऊ वैमानिकांचं प्रशिक्षण आणि शस्त्रास्त्र व्यवस्थापन बळकट केलं.

जागतिक पातळीवर नाव
हिलाल यांनी फक्त भारतातच नव्हे, तर आंतरराष्ट्रीय स्तरावरही आपली छाप पाडली आहे. २०११ मध्ये अमेरिकेतील वायुयुद्ध कॉलेजमधून डिस्टिंक्शन मिळवलं आहे. त्यांनी वेलिंग्टनच्या डिफेन्स सर्व्हिसेस स्टाफ कॉलेजमधून प्रशिक्षण घेतलं असून प्रशिक्षक म्हणून काम पहिलं आहे. २०१९ मध्ये संरक्षणमंत्री राजनाथ सिंह फ्रान्सला गेले होते. तेव्हा हिलाल यांनी राफेलच्या तांत्रिक क्षमतांची माहिती राजनाथ सिंह यांना दिली होती.  

हिलाल यांचे पुरस्कार आणि सन्मान
  • २०१० : वायुसेना पदक (VM)
  • २०१६ : विशिष्ट सेवा पदक (VSM)
  • २०२१ : कार्यवाहक एअर व्हाइस मार्शल
  • २०२३ : कायमस्वरूपी एअर व्हाइस मार्शल
 
काश्मिरी तरुणांसाठी प्रेरणा

हिलाल यांनी वडिलांना आदर्श मानून हिलाल यांनी सैन्याची परंपरा पुढे नेली आहे. त्त्यांचा मित्र सांगतो, “लहानपणापासून हिलालला आकाश आणि ताऱ्यांचं आकर्षण होतं. म्हणून त्यांचं नाव ‘हिलाल’ (अर्धचंद्र) ठेवलं आहे.” काश्मिरी तरुणांना अनेकदा दहशतवादाच्या चष्म्यातून पाहिलं जातं. पण हिलाल यांची कहाणी प्रत्येक तरुणाला स्वप्नांचं आकाश गाठण्याची प्रेरणा देते.

- मलिक असगर हाशमी


'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  -

Awaz Marathi WhatsApp Group 
Awaz Marathi Facebook Page

Awaz Marathi Twitter