भारत आणि पाकिस्तान यांच्यातील वाढत्या तणावादरम्यान पाकिस्तानकडून खोट्या बातम्या आणि दाव्यांचा प्रसार मोठ्या प्रमाणात केला जातो आहे. भारत सरकारने याचा पर्दाफाश करत नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले आहे. परराष्ट्र सचिव विक्रम मिस्त्री यांनी आज पत्रकार परिषदेत यासंदर्भात सविस्तर माहिती दिली.
पाकिस्तानकडून खोट्या बातम्या आणि खोटे दावे केले जात आहेत. पाकिस्तानने सिरसा आणि सूरतगड येथील भारतीय सैन्य तळांवर हल्ले केल्याचा दावा केला आहे, जो पूर्णपणे खोटा आहे. तसेच, आदमगढ येथील एस-400 हवाई संरक्षण प्रणाली नष्ट केल्याचेही म्हटले आहे, परंतु हाही दावा खोटा आहे. या ठिकाणी पाकिस्तानच्या हल्ल्यांमुळे कोणतेही नुकसान झालेले नाही, असे मिस्त्री यांनी स्पष्ट केले.
सायबर हल्ल्याचा दावाही खोटा
पुढे ते म्हणाले, "पाकिस्तानने भारतावर सायबर हल्ले केल्याचे आणि पायाभूत सुविधांचे मोठे नुकसान केल्याचे दावे माध्यमांद्वारे पसरवले जात आहेत. हेही खरे नाही. नागरिकांनी अशा कोणत्याही अफवांना बळी पडू नये." यासोबतच त्यांनी पाकिस्तानवर नागरी भागांवर हल्ले केल्याचा गंभीर आरोप केला. "पाकिस्तान भारतातील नागरी भागांवर, विशेषत: जम्मू-काश्मीर आणि पंजाबमधील क्षेत्रांवर हल्ले करत आहे. आज सकाळी राजौरी येथे झालेल्या हल्ल्यात काही जण जखमी झाले, तर जम्मू-काश्मीरमधील विकास अधिकारी राजकुमार थापा यांचा मृत्यू झाला," असे त्यांनी सांगितले.
हा धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न
पाकिस्तानी प्रसारमाध्यमांमध्ये अमृतसरमधील सुवर्णमंदिरावर भारतानेच मिसाइल हल्ला केल्याचा दावा केला जात आहे. "हा दावा पूर्णपणे खोटा आहे. अशा बातम्यांद्वारे पाकिस्तान भारतात धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे," असे मिस्त्री म्हणाले. तसेच, भारताने अफगाणिस्तानवर मिसाइल हल्ले केल्याचेही पाकिस्तानकडून सांगितले जात आहे. यावर मिस्त्री म्हणाले, "गेल्या दीड वर्षांत अफगाणिस्तानवर हल्ले कोण करत आहे, हे तेथील लोकांना चांगलेच माहिती आहे.
फेक नरेटीव्हचा सामना करण्यासाठी भारत सज्ज
दरम्यान, भारत सरकारने नागरिकांना खोट्या बातम्यांपासून सावध राहण्याचे आणि केवळ अधिकृत माहितीवर विश्वास ठेवण्याचे आवाहन केले आहे. सीमेवरील तणाव आणि पाकिस्तानच्या खोट्या प्रचाराचा सामना करण्यासाठी भारत सज्ज असल्याचेही मिस्त्री यांनी अधोरेखित केले आहे.
'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा -
Awaz Marathi WhatsApp Group
Awaz Marathi Facebook Page
Awaz Marathi Twitter