"मी प्रथम भारतीय, माझ्या देशासोबत उभी राहीन!"

Story by  आवाज़ मराठी | Published by  Fazal Pathan • 4 h ago
अभिनेत्री हीना खान
अभिनेत्री हीना खान

 

भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या तणावादरम्यान अभिनेत्री हिना खान यांनी पाकिस्तानी फॅन्सवर कडक टीका केली आहे. ऑपरेशन सिंदूर आणि पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर हिना यांनी आपल्या देशाला पाठिंबा दिला. यानंतर पाकिस्तानी फॅन्सकडून त्यांना शिवीगाळ आणि धमक्या मिळाल्या. हिनाने या टीकाकारांना ठाम प्रत्युत्तर देत सांगितले की त्या प्रथम भारतीय आहेत आणि नेहमीच आपल्या देशासोबत उभ्या राहतील.

हिनाचे स्पष्ट मत
हिना खान यांनी शनिवारी सकाळी इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली. या पोस्टमध्ये त्यांनी पाकिस्तानी फॅन्सना उद्देशून सांगितले: "मी प्रथम भारतीय आहे. जर मी भारतीय नसेन, तर मी काहीच नाही. माझ्या आयुष्यात मला सीमेपलीकडून नेहमीच प्रेम मिळाले. पण जेव्हा मी माझ्या देशाला पाठिंबा दिला, तेव्हा तुम्ही मला शिव्या देताय आणि धमक्या देताय. तुम्ही मला अनफॉलो करू शकता, मला याची काळजी नाही. मी कोणालाही अपशब्द सांगितले नाहीत. फक्त माझ्या देशाला पाठिंबा दिला."

हिनाने पुढे सांगितले की आपण काय बोलतो, हे आपली विचारसरणी दाखवते. त्यांनी आपल्या पोस्टमध्ये स्पष्ट केले की देशाला पाठिंबा देणे हा त्यांचा हक्क आहे. त्या कश्मिरी मुस्लिम असल्या तरी त्यांची पहिली ओळख ही भारतीय आहे. 

हिनाची पार्श्वभूमी
हिना खान या टेलिव्हिजन विश्वातील एक लोकप्रिय नाव आहे. 2 ऑक्टोबर 1987 रोजी श्रीनगर येथे कश्मिरी मुस्लिम कुटुंबात त्यांचा जन्म झाला. ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ या मालिकेतील अक्षरा ही भूमिका त्यांनी साकारली. यामुळे त्या घराघरांत पोहोचल्या. त्यांनी अनेक हिंदी मालिका आणि चित्रपटांत काम केले. सोशल मीडियावर त्यांचे लाखो फॉलोअर्स आहेत. त्या भारतातील सर्वाधिक मानधन घेणाऱ्या टेलिव्हिजन अभिनेत्रींपैकी एक आहेत. त्यांना तीन ITA पुरस्कार, तीन भारतीय टेली पुरस्कार आणि सात गोल्ड अवॉर्ड्स मिळाले आहेत.

हिना सध्या स्टेज 3 ब्रेस्ट कॅन्सरशी लढत आहेत. या कठीण काळातही त्या आपल्या फॅन्ससोबत सतत जोडलेल्या राहतात. त्यांनी यापूर्वी पहलगाम हल्ल्यावरही दुख व्यक्त केले होते. एका पोस्टमध्ये त्यांनी हिंदू बांधवांची माफी मागितली होती. त्या कश्मिरी असल्याने हा हल्ला त्यांना अधिक त्रासदायक वाटला, असे त्यांनी सांगितले होते.

सोशल मीडियावर संमिश्र प्रतिक्रिया
हिनाच्या या पोस्टनंतर सोशल मीडियावर संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या. X वर काही भारतीयांनी हिनाचे कौतुक केले. एका यूजरने लिहिले: "हिना खान यांनी खरे भारतीयत्व दाखवले. त्यांचा आम्हाला अभिमान आहे." दुसऱ्या एका यूजरने सांगितले: "हिनाने आपल्या देशाला पाठिंबा देऊन योग्य केले. ती खरी देशभक्त आहे."

'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  -

Awaz Marathi WhatsApp Group 
Awaz Marathi Facebook Page

Awaz Marathi Twitter