'अशी' झाली आहे पाकिस्तानची दोन्हीकडून कोंडी

Story by  आवाज़ मराठी | Published by  Fazal Pathan • 7 h ago
प्रातिनिधिक चित्र
प्रातिनिधिक चित्र

 

पंजाबी वर्चस्वाच्या विरोधातील पाकिस्तानातील रोष पराकोटीला पोहोचला आहे. त्यांनी आपला लढा पुन्हा तीव्र केलेला दिसतो. 

भारताला 'शत्रू क्रमांक एक' ठरवून आजवर शाबूत राहिलेल्या पाकिस्तानपुढे आता मात्र अस्तित्वाचे संकट गडद होत चालले आहे. दसपट सामथ्र्यवान असलेल्या भारतविरुद्ध युद्ध करून होणारी नाचक्की टाळण्यासाठी पाकिस्तानने दहशतवाद्यांना पुढे करण्याचे धोरण स्वीकारले, 'हजार जखमा करून भारताला रक्तबंबाळ करण्याचे' हे धोरण होते. पण एखाद्या कल्पनेचा जन्म ज्याप्रमाणे रोखता येत नाही; तसेच तिचा अंतही निश्चित असतो. भारताला बेजार करण्यासाठी वापरलेल्या दहशतवादी अस्त्राचा अतिरेकी वापर करणाऱ्या पाकिस्तानवर या धोरणामुळे स्वतःच रक्तबंबाळ होण्याची वेळ आली आहे. भारतीय लष्कराच्या 'ऑपरेशन सिंदूर ने केवळ पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी तळच उद्ध्वस्त केले नाहीत, तर पाकिस्तानचे तुकडे पडतील, अशी वातावरणनिर्मितीही केली आहे. पहलगामचे हत्याकांड घडवून पाकिस्तानने स्वतःच्याच पायावर कुऱ्हाड मारून घेतली आहे.

पाकिस्तानच्या लष्कर, राजकारण, अर्थकारण आणि समाजकारणाला पंजाबी वर्चस्वाचा विळखा पडला आहे. त्यांच्या मनमानीपणामुळे बलुचिस्तान, खैबरपख्तुन्ख्वा आणि सिंध प्रांतातील जनतेच्या मनात पंजाबविषयी घृणा आहे. 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये भारताने पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवाद्यांच्या पाच अड्ड्यांसह पाकिस्तानच्या पंजाबमधील लष्कराचे संरक्षण आणि आश्रय लाभलेल्या बहावलपूर आणि मुरीदकेमधील जैशे महंमद आणि लष्करे तैयबाच्या मुख्यालयांना उद्ध्वस्त करताना त्यांच्याच शेजारी असलेल्या पाकिस्तानच्या लष्करी तळांना इशारा दिलाच, शिवाय पंजाबीविरोधकांच्या मनातील तिरस्काराला अप्रत्यक्षपणे खतपाणी घालण्याची खेळी केली. त्या देशातील नागरिकांच्या हितांची काळजी घेऊन केलेल्या अचूक हल्ल्यांमुळे तेथील नागरिकांमध्येही भारताविषयी सकारात्मकता निर्माण झाली आहे. 

भारतात क्षेत्रफळाने सर्वांत मोठ्या असलेल्या राजस्थानपेक्षाही अधिक तीन लाख ४७ हजार चौरस किलोमीटर क्षेत्रफळ असलेला बलुचिस्तान म्हणजे पाकिस्तानचे ४० टक्के क्षेत्रफळ आणि ४४ टक्के नैसर्गिकसंपदा असलेला प्रांत. या प्रांतातील जनतेत पाकिस्तानी राज्यकर्ते व पंजाबी वर्चस्वाच्या विरोधातील रोष पराकोटीला पोहोचला आहे. मार्चमध्ये 'बलुच लिबरेशन आर्मी'ने पाचशे प्रवासी असलेली 'जाफर एक्सप्रेस' पळवून २८ पाकिस्तानी सैनिकांना ठार केले. 'ऑपरेशन सिंदूर' सुरू होताच बलुच विद्रोहींनी बोलन खोऱ्यात पाकिस्तानी सैनिकांना घेऊन जाणाऱ्या एका वाहनाला दूरनियंत्रक बॉम्बने उडवले. त्यात अनेक सैनिक मृत्युमुखी पडले आहेत. 

नैसर्गिक वायू, खनिजांसह नैसर्गिक संपत्तीची रेलचेल असलेल्या बलुचिस्तानचे पाकिस्तानच्या राज्यकर्त्यांनी अनेक दशकांपासून शोषण करीत जनतेला गरीबीच्या खाईत लोटल्याची भावना तीव्र आहे. पाकिस्तानमध्ये बळजबरीने समावेश करण्यात आलेल्या बलुची जनतेचा हा संघर्ष इतका विकोपाला गेला आहे की, पाकिस्तानच्या सैन्याला 'बलुच लिबरेशन आर्मी'चा सामना करणे अवघड झाले आहे. ज्या देशातील लष्कराला आपल्याच अंतर्गत विद्रोहींवर नियंत्रण ठेवता येत नाही, ते भारताशी कसे लढेल, हा प्रश्नही उपस्थित होतो. 'बलुच लिबरेशन आर्मी'ने पाकिस्तानी सुरक्षा दल, पंजाबी कामगार तसेच चीन-पाकिस्तान आर्थिक कॉरिडॉरच्या उभारणीत गुंतलेल्या चीनच्या नागरिकांना लक्ष्य बनवले आहे. पाकिस्तानी राज्यकर्ते आणि लष्कराविरोधातील ही फुटीरवादी वृत्ती खैबर पख्तुन्ख्वा आणि सिंध प्रांतातही आहे. 

पाकिस्तानच्या व्यापार आणि लष्करी धोरणांत महत्त्वाची भूमिका असलेल्या खैबर पख्तुन्ख्वा प्रांतात पश्तुनिस्तानची मागणी ऐरणीवर आली आहे. तुलनेने सिंधुदेश चळवळ उम्र नसली तरी मूळ धरत आहे. शिवाय गिलगिट, बाल्टिस्तानमध्ये बलवारीस्तानची मागणी डोके वर काढत आहे. आज ना उद्या, पाकिस्तानचे तुकडे होतील अशी धारणा वाढत चालली आहे. तसे झाल्यास मोठ्या नैसर्गिक संपदेला पाकिस्तानला मुकावे लागेल. अर्थव्यवस्था डबघाईला आलेल्या पाकिस्तानची जगातील उरलीसुरली इभ्रत संपुष्टात आली आहे. पाकव्याप्त काश्मीरचा वापर तर केवळ भारताविरुद्ध दहशतवादाची फॅक्टरी चालविण्यासाठी होत आहे. त्यामुळे नियंत्रण नसलेल्या पाकव्याप्त काश्मीरवर पाकिस्तानचा नैतिक अधिकार उरलेला नाही. 

भारताला आजवर पाकिस्तानशी युद्ध करून कोणताही लाभ झालेला नाही. १९७१ मध्ये भारताने पाकिस्तानी लष्कराला शरणागती पत्करणे भाग पाडून बांगलादेशाची निर्मिती केली, तेव्हा पाकव्याप्त काश्मीर हिसकावून घेता आला असता. पण भारताने ती संधी साधली नाही. आता तशी संधी पुन्हा निर्माण होत आहे, असा सूर राष्ट्रवादाच्या भावनेला उधाण आले असताना व्यक्त होणे स्वाभाविकच. पण त्यासाठी मोठ्या राजनैतिक प्रयत्नांचे अधिष्ठान लागेल. चीन, तुर्किये, अझरबैजान आणि काही मुस्लिम राष्ट्र वगळता पाकिस्तानचा पुळका आलेले देश आता मोजकेच उरलेत. तरीदेखील या प्रयत्नांची आवश्यकता कमी होत नाही, हे ध्यानात घ्यायला हवे. 

'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  -

Awaz Marathi WhatsApp Group 
Awaz Marathi Facebook Page

Awaz Marathi Twitter