बोम्मन आणि बेल्ली यांचा सत्कार करताना तमिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन
चेन्नई : ‘दि एलिफंट व्हिस्परर्स’ या ऑस्कर विजेत्या लघु माहितीपटामुळे चर्चेत आलेल्या बोम्मन आणि बेल्ली या दाम्पत्याचा तमिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांनी नुकताच गौरव केला. हत्तींची काळजी घेणारे हे दाम्पत्य निलगिरी जिल्ह्यातील मुदुमलाई येथे वास्तव्यास आहे. या लघुपटाला ऑस्कर जाहीर झाल्यानंतर हे दाम्पत्य मुख्यमंत्र्यांना भेटले. मुख्यमंत्र्यांनी एक लाख रुपयांचा धनादेश, सन्मानचिन्ह आणि शाल देऊन त्यांचा गौरव केल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
आंतरराष्ट्रीय पातळीवर चर्चेचा विषय ठरलेल्या ३९ मिनिटांच्या माहितीपटामध्ये हत्तीची दोन पिल्लं रघू आणि आमू यांचा बोम्मन आणि बेल्ली यांच्यासोबतचा ऋणानुबंध मांडण्यात आला आहे. गुनीत मोंगा आणि सिख्या एंटरटेन्मेंटच्या अचिन जैन यांनी या माहितीपटाची निर्मिती केली आहे.
तमिळनाडूतील मुदुमलाई आणि अनाईमलाई येथे हत्तींच्या दोन छावण्या असून त्यात काम करणाऱ्या ९१ लोकांना प्रत्येकी एक लाख रुपयांची मदतही मुख्यमंत्र्यांकडून जाहीर करण्यात आली. हत्तींची देखभाल करणाऱ्यांसाठी आता पक्की घरे उभारली जाणार असून त्यासाठी ९.१० कोटी रुपयांची रक्कम जाहीर करण्यात आली आहे. कोईमतूर जिल्ह्यामध्ये अनाईमलाई व्याघ्र प्रकल्पाजवळ असलेल्या हत्तीच्या छावणीची सुधारणा करण्यासाठी पाच कोटी रुपयांची रक्कमही जाहीर करण्यात आली आहे.
हत्तींना मुलासारखे जपावे लागते
कोईमतूर जिल्ह्यामध्ये सवादीवायल येथे हत्तीची छावणी उभारली जाणार असल्याचेही सांगण्यात आले. हत्तींचे संगोपन करणे ही सोपी गोष्ट नाही, लहान मुलांची ज्या पद्धतीने काळजी घेण्यात येते तशीच काळजी त्यांचीही घ्यावी लागते. बोम्मन आणि बेल्ली यांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालेला गौरव पाहून मला अतीव आनंद झाल्याचे या लघु माहितीपटाच्या दिग्दर्शिका कार्तिकी गोन्साल्व्हिस यांनी सांगितले.