आज जागतिक दिन: 'हेल्थ फॉर ऑल' यंदाची थीम

Story by  आवाज़ मराठी | Published by  Pooja Nayak • 2 Years ago
जागतिक आरोग्य दिवस
जागतिक आरोग्य दिवस

 

दरवर्षीप्रमाणे यंदाही जागतिक आरोग्य संघटना ७ एप्रिलला जागतिक आरोग्य दिवस साजरा करणार आहे. हा दिवस साजरा करण्यामागचा एकच उद्देश आहे, जगभरातील लोकांना त्यांच्या आरोग्याचं महत्व पटावं.

 

आरोग्याशी निगडीत महत्वाच्या गोष्टी, नव्या औषधांचा शोध, आरोग्याशी निगडीत अनेक मुद्दे आणि लसिकरण यांच्याविषयी जागरुकता वाढवावी हाच प्रमुख उद्देश आहे.

 

जागतिक आरोग्य दिवसाचा इतिहास

जागतिक आरोग्य संघटनेच्या स्थापनेबरोबरच जागतिक आरोग्य दिवसाची सुरुवातही झाली. १९४८ मध्ये जगातल्या अनेक देशांनी एकत्र येऊन आरोग्याला प्रोत्साहन आणि रोगापासून बचाव करण्याचा निश्चय केला. यासाठीच डब्ल्यूएचओ ची स्थापना करण्यात आली. यामुळे लोकांना आरोग्यदायी राहण्याबरोबरच आवश्यक सुविधा मिळाव्या हा उद्देश होता. ७ एप्रिल १९५० मध्ये पहिला जागतिक आरोग्य दिवस साजरा करण्यात आला. तेव्हापासून हा दिवस दरवर्षी साजरा होतो.

 

उपलब्ध माहितीनुसार यंदा डब्ल्यूएचओ आपला ७५ वा वर्धापनदिन साजरा करत आहे. त्यामुळेच या दिवशी मागील ७० वर्षात सार्वजनिक आरोग्य क्षेत्रात जीवनमान उंचावण्याच्या दृष्टीने यशस्वी उपायांचाही आढावा घेतला जाणार आहे.

 

यंदाची थीम

आरोग्य दिवस साजरा करण्यासाठी दरवर्षीप्रमाणे यंदाही एक विशेष थीम ठेवण्यात आली आहे. डब्ल्यूआचओ ने या वर्षी 'हेल्थ फॉर ऑल' ही थीम ठेवली आहे. या थीममधून आरोग्य ही माणसाची मुलभूत गरज आणि अधिकार आहे हे सूचित करण्यात येत आहे. ही सुविधा माणसाला आर्थिक अडचणींशिवाय मिळणे आवश्यक आहे.