शांती, माणुसकी आणि न्यायाचा 'फैज़ फेस्टिवल'

Story by  Awaz Marathi | Published by  Pooja Nayak • 1 Years ago
‘फैज़ फेस्टिवल’
‘फैज़ फेस्टिवल’

 

मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यातील आरोपी पाकिस्तानात अजूनही मोकळे फिरत आहेत, अशा शब्दांत जावेद अख्तर यांनी लाहोरमध्ये जाऊन पाकिस्तानला सुनावले. ‘फैज़ फेस्टिवल’मध्ये जावेद अख्तर यांनी हे विधान केले होते. भारतीय उपखंडातील सर्वात लोकप्रिय पाकिस्तानी शायर फैज़ अहमद फैज़ यांच्या स्मृतीत दरवर्षी हा महोत्सव आयोजित केला जातो. १९८४ पासून याची सुरुवात झाली. जगभरातून विशेषत: भारतातून फैज़ यांचे प्रशंसक या महोत्सवात सहभागी होतात. भारत-पाकिस्तानमध्ये शांततेचा सेतू ठरलेल्या या फेस्टिवलबद्दल फैज़ अहमद फैज़ यांची मुलगी सलीमा हाश्मी यांच्याशी ‘सकाळ’ने साधलेला संवाद...

 

फैज़ फेस्टिवल सुरू करण्यामागची संकल्पना

सलीमा हाश्मी : फैज़ अहमद फैज़ यांचे १९८४ मध्ये निधन झाले. माझ्या वडिलांनी कायम शांतता, प्रेमाचा पुरस्कार केला. ते पाकिस्तानमध्ये जन्माला आले असले तरी त्यांच्या शायरीला कुठलीही सीमा नव्हती. त्यावेळी पाकिस्तानमध्ये लष्करप्रमुख झिया उल हक यांची राजवट होती. त्यांनी देशात सर्व राजकीय कार्यक्रमांवर बंदी घातली होती. मात्र सांस्कृतिक उत्सवावर बंदी नव्हती. फैज़ अहमद फैज़ यांच्या नावावर सांस्कृतिक महोत्सव सुरू करणे शक्य होते. त्यामुळे आम्ही फैज़ यांच्या नावावर ‘फैज़ अमन मेळावा’ सुरू केला. सुरुवातीला हा उत्सव म्हणजे खुला मंच असायचा. पहिल्याच कार्यक्रमात लोकसंगीत ऐकायला पाकिस्तानच्या सर्वच भागांतून लोक आले. पाकिस्तानमधील तो काळ खूप अडचणीचा होता, मात्र फैज़ या नावात अशी जादू होती की, लोक केवळ त्यांच्या नावावर एकत्र जमले. मध्यंतरी माझी आई आजारी पडल्यानंतर हा कार्यक्रम थांबला होता. मात्र कुठलातरी कार्यक्रम आम्ही घ्यायचो. त्या छोट्याशा कार्यक्रमाचे आज फैज़ फेस्टिवलमध्ये रूपांतर झाले आहे. जगभरातून फैज़ यांचे चाहते या कार्यक्रमाला हजेरी लावतात.

 

दोन देशांतील ‘अमन’चा उत्सव

फैज़ अहमद फैज़ हे भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांतील शांततेचे प्रतीक होते. जगात शांतता नांदावी याचे पक्षधर होते. त्यामुळे फैज़ यांच्या नावावर जगभरातून जेवढे लोक जमा होतील, तेवढे चांगले, हा उद्देश आमचा सुरुवातीपासून होता. फैज़ महोत्सवात सहभागी होण्यासाठी भारतातून खूप नामवंत पाहुणे यायचे. कैफी आझमी यांच्यापासून श्याम बेनेगल, सरदार अली जाफर, मुजफ्फर अली, शबाना आझमी यांच्यासह अनेक नामवंत शायर, कलाकार, दिग्दर्शकांनी या महोत्सवाला हजेरी लावली आहे. यावेळी जावेद अख्तर यांच्यासह मुंबईहून अटल तिवारी, दानिश हुसेन आले होते. पंजाबहून शोरा, लेखक अरविंद चमक यांनी फेस्टिवलला आवर्जून हजेरी लावली. महत्त्वाचे म्हणजे या सर्वांचे लाहोरच्या जनतेने गर्मजोशीने स्वागत केले. जावेद अख्तर यांच्या प्रत्येक शब्दावर पडणाऱ्या टाळ्या हेच सांगते. या निमित्ताने दोन देशांच्या संबंधावर गप्पा झाल्या. फैज़ गेल्यानंतर यापेक्षा दुसरी चांगली भेट आमच्यासाठी काय असू शकते!

 

यंदाच्या महोत्सवात विक्रमी सहभाग

या वेळी भारतातून जावेद अख्तर येणार होते, ही बातमी पाकिस्तानमध्ये वाऱ्यासारखी पसरली. यावेळी मोठ्या संख्येने लोक तीन दिवसांच्या या फेस्टिवलला आले. सध्याची पाकिस्तानची परिस्थिती अडचणीची आहे. या कठीण वेळेत लोकांना फैज़ यांची खूप आठवण येते. फैज़ यांच्यावरच्या प्रेमाचा, त्यांच्या शायरीचा इजहार या ठिकाणी ते करतात. या फेस्टिवलमध्ये सर्व स्तरांतील व्यक्तींसाठी काही ना काही असते. म्हणजे पुस्तकं, गाणी, संगीत, लोकसंगीत, पेंटिंग्स, चित्रपटावरील चर्चा, ड्रम, बँड यासह अनेक गोष्टी. पेशावर, कराची, क्वेटापासून अनेक दुर्गम भागातून लोक आपल्या कुटुंबीयांसोबत फैज़ महोत्सवात सहभागी झाले. येताना ते आपल्या हृदयात शांती, प्रेमाचा संदेश घेऊन आले होते. यावेळी ओपन माईक सेशन होते, जिथे सर्वजण आपली शायरी पेश करू शकत होते. त्याच ठिकाणी एक जुना टाईपरायटर ठेवला होता. तिथे लोक फैज़ साहेबांसाठी पत्र टाईप करत होते. पाचही हॉल प्रेक्षकांनी गच्च भरले होते.

 

कैफी-फैज़ यांचे वेगळे नाते

फैज़ महोत्सवात कैफी आझमी, त्यांची मुलगी शबाना आझमी उपस्थित राहिले आहेत. यावेळी जावेद अख्तर आल्यामुळे ते सर्कल पूर्ण झाले. माझे वडील फैज़ आणि कैफी आझमी यांचे वेगळे नाते होते. ते अनेकदा मुंबईतल्या कैफी आझमी यांच्या घरी गेले. या भेटीत मी फैज़ यांच्यासोबत नव्हते. मात्र मी स्वत: एकटीच मुंबईला कैफी काकांना भेटली. त्यावेळी त्यांनी दोघांच्या दोस्तीचे खूप किस्से मला सांगितले. फैज़ आणि कैफी हे दोन मित्र मुंबई, मास्कोमध्ये अनेकदा भेटत असत. झिया उल हक यांच्या लष्करी राजवटीत लाहोरमध्ये झालेल्या फैज़ अमन उत्सवासाठी कैफी साहेब आले होते. अली सरदार जाफरीही आले होते. लाहोर शहरात कैफी साहेबांना ऐकायला मोठी गर्दी झाली. कैफी आझमी आपल्या नजममधील एक कलाम म्हणायचे आणि प्रेक्षक त्यांच्या शायरीचे पुढचे कडवे पूर्ण करायचे. कैफी या प्रकारामुळे आश्चर्यचकित झाले. ते म्हणाले, आमच्याकडे (भारतात) तरुण वर्गात असे दृश्य कधीच बघितले नाही. ते खूप भावनिक झाले होते.

 

शांती, माणुसकी आणि न्यायाचा महोत्सव

माझी आई आम्हाला नेहमीच सांगायची की, फैज़ साहेबांच्या वस्तूवर तुमचा नव्हे तर जनतेचा अधिकार आहे. त्यांच्याशी संबंधित वस्तूंचे आम्ही एक छोटेसे संग्रहालय बनवले. या वस्तू, आठवणी तुम्हाला उधार मिळाल्या आहेत आणि त्या तुम्हाला परत करायच्या आहेत. फैज़ फेस्टिवलही त्याच पद्धतीने आम्ही करतो. आम्ही खूप नशीबवान आहोत की फैज़ साहेबांचे विशेष प्रेम आम्हाला मिळाले. त्यांचा वारसा जपण्याचा प्रयत्न आम्ही करतो. आमचे वडील चांगले मित्र, अमन पसंद आणि माणुसकी असणारे व्यक्तिमत्त्व होते. त्यामुळे फैज़ साहेबांच्या विचारधारेत किचिंतही फरक पडू नये, याची काळजी आम्ही या महोत्सवादरम्यान घेतो. ‘फैज़ फेस्टिवल’ केवळ शांतता, माणुसकी आणि न्यायाची भाषा करतो.

 

पुस्तकांचा खप

यंदाच्या महोत्सवात दोन पुस्तकांचे उर्दू भाषांतर झाले. माझ्या आईच्या पत्रांचे उर्दूमध्ये भाषांतर केले, तर डॉ. अली हाश्मी यांचे इंग्रजीतील पुस्तक ‘लव अँड रिवॉल्यूशन’ या आत्मकथेचे उर्दूतील भाषांतर आले. या दोन्ही पुस्तकांना मोठी मागणी होती. यासोबत फैज़ यांच्या पुस्तकाचे नवे एडिशन आले. यामध्ये जुन्या पुस्तकातील काही चुका टाळून, काही ॲडीशन करून हे पुस्तक यावेळी प्रकाशित केले. या पुस्तकाला तरुणाईकडून मोठा प्रतिसाद मिळाला. याशिवाय युवा लेखक शहर मिर्झा यांचे इंग्रजी पुस्तक ‘अदर्स इन द मिरर’ हे प्रकाशित झाले, या पुस्तकात भारत-पाकिस्तानमधील कथा आहेत. फैज़ यांचा शांततेचा संदेश या पुस्तकातून दिला गेलाय. या महोत्सवाच्या निमित्ताने तरुणाई पुस्तके खरेदी करते, यापेक्षा समाधानाची बाब नाही.

 

फैज़ यांचे हास्य आठवते

या दरम्यान मला आठवते, ते फैज़ यांचे हास्य, त्यांच्या डोळ्यांतील वेगळी चमक. फैज़ अत्यंत शांत व्यक्तिमत्त्व होते. आयुष्यात ते कधी मोठ्या आवाजात बोलले नाहीत. कधी कुणावर रागावले नाहीत. त्यांनी आपले दु:ख केवळ शायरीतून व्यक्त केले. ते एका शांत समुद्रासारखे होते, जो वाहत असतो. मात्र त्या समुद्रात कधी वादळे येत नाहीत, फक्त ठहराव आहे. तसे आम्हा भावंडांना बारा महिने, चोवीस तास वडिलांच्या आठवणी येतात. मात्र फैज़ फेस्टिवल यशस्वी होत असताना त्यांचे हास्य खूप आठवते.

 

फेस्टिवलचे व्यवस्थापन

माझी छोटी बहीण मुनिझा ही सर्व फेस्टिवलचे काम बघते. मात्र या फेस्टिवलसाठी फैज़ कुटुंब एकत्र येते. आम्ही एक संचालक मंडळ तयार केले आहे. त्यात कलावंत, लेखक, मित्र आहेत. सर्वांना वेगवेगळ्या जबाबदाऱ्या विभागून दिल्या आहेत. आदिल हा या महोत्सवाची आर्थिक बाजू सांभाळतो. माझे वडील काही जमीनदार नव्हते, त्यामुळे या महोत्सवासाठी आम्हाला निधी गोळा करावा लागतो. मात्र फैज़ यांचे चाहते आपला वाटा उचलतात. सर्वांच्या प्रयत्नांतून हा फेस्टिवल पार पडतो.

(सौजन्य: दै सकाळ)