स्वतःला सरस्वतीपुत्र म्हणवणाऱ्या इब्राहीम आदिलशाहचे गणेश स्तवन

Story by  आवाज़ मराठी | Published by  Pooja Nayak • 1 Years ago
प्रातिनिधिक फोटो
प्रातिनिधिक फोटो

 

- सरफराज अहमद

दखनी साहित्यात दुसऱ्या इब्राहीम आदिलशाहचा (१५७०-१६२७) ‘नवरसनामा’ ही शास्त्रीय संगीतावर आधारीत रचनांमुळे अभिजात कलाकृती मानली जाते. कुली कुतूबशाहच्या दिवाननंतर नवरसनामाला दखनीत हे अभिजात महत्त्व प्राप्त झाले आहे. कुली कुतूबशाहची (१५६६-१६२३) ‘पिया बाज पियाला पिया जाए ना’ या कवितेने दखनी साहित्यात इतिहास घडवला. तर इब्राहीम आदिलशाहच्या नवरसनामातील ‘यसत सरसोती मता’ या कवितेने एक स्थित्यंतर घडवण्यात यश मिळवले होते. 

दखनी साहित्याच्या इतिहासातील या दोन महत्वाच्या कलाकृतींनी दखनी संगीत क्षेत्रातही मानाचे स्थान मिळवले आहे. अमीर खुसरोंनी कव्वाली, रुबाया चालबध्द करण्याची स्वतंत्र पध्दत विकसित केल होती. त्याच पातळीवर मर्सियानिगारीच्या (करबलाच्या घटनेवरील शोकगीत) संमेलनातून कुली कुतूबशाहने संगीतात अनेक प्रयोग करुन पाहिले. तर इब्राहीम आदिलशाहने ‘नवरसपूर’ ही संगीताची राजधानी स्थापन करुन त्या आधारे कलेच्या क्षेत्रात मोलाची कामगिरी केली होती. 

कुली कुतूबशाह आणि इब्राहीम आदिलशाह यांच्या या योगदानाला अधोरेखित करताना हारुन खां शेरवानी ‘खुसरोच्या सुरांचे दखनी वारस’ म्हणून दोघांचा उल्लेख करतात. हारुन खां शेरवानी हे विशेषतः बहामनी व कुतूबशाहीचे अभ्यासक होते. त्यांनी दखनी संस्कृतीवर काही लेख लिहीले आहेत. त्यामध्ये इब्राहीम आदिलशाह हा त्यांच्या विशेष आस्थेचा विषय होता. कारण त्यांच्याच शब्दात सांगायचे तर ‘इब्राहीम आदिलशाह एका बाजूला संगीताच्या क्षेत्रात अमीर खुसरोचा वारसा पुढे चालवत होता, तर दुसऱ्या बाजूला त्याने अकबर बादशाहच्या (१५३२-१६०५) दरबाराप्रमाणे आदिलशाही दरबारात विद्वानांना आश्रय देऊन साहित्य आणि संस्कृतीला चालना दिली होती.’ 

हिंदू संस्कृतीतल्या महत्वाच्या मुल्यांना आत्मसात करुन तो राजकारण करत होता. हिंदू आणि लिंगायत संस्कृतीला त्याने राज्यकर्ता म्हणून राज्यकारभारात स्थान दिले होते. मराठीला राजभाषेचा दर्जा देऊन स्वतःला मराठी जनाशी जोडण्याचा त्याने प्रयत्न केला होता. 

इब्राहीमची कलानगरी नवरसपूर
इब्राहीमने स्थापन केलेली ‘नवरसपूर’ नगरी ही कलेची राजधानी म्हणून इतिहास अभ्यासकांना नेहमीच आकर्षित करत राहिली आहे. त्याविषयी माहिती देताना नवरसनामाच्या मराठी संपादित आवृत्तीतडॉ. अरुण प्रभुणे लिहितात, ‘कला ही इब्राहिमची जीवननिष्ठा होती. कला आणि कलाकार यांना राजाश्रय देणे ही त्याच्या कलामनाची भूक होती. कला हे त्याचे स्वप्न होते. राज्यकर्ता असल्याने विद्यापूरजवळ (बिजापूर) ‘नवरसरपूर’ या कलानगरीची स्थापना करून ‘नवरसमहाला’च्या रूपाने त्याने आपले स्वप्न प्रत्यक्षात उतरवले होते. 

श्रेष्ठ चित्रकारांच्या कुंचल्यांतून साकारलेल्या अप्रतीम चित्रांनी त्या महालाच्या भिंतीना सजवले होते. जलाशयासमोर असलेल्या ‘नवरसमहाला’तील मंचावर बैठक मांडून आपल्या प्राणप्रिय मोतिखाँ तंबोऱ्यावर बसून गायन करण्यात त्याने स्वतःला झोकून दिले होते. अशा पद्धतीने प्रत्यक्षातील सल्तनतविश्वात कलाविश्व सामावले गेले होते. सल्तनतीचा आश्रय लाभल्याने कलाविश्व विकास पावले होते.’ नवरसपूरात संगीताच्या सुरांवर आधारीत इमारती बांधून त्याने इराणपर्यंत त्या शहराची ख्याती पोहोचवली होती. विशेषतः शहराच्या रचनांविषयी समकालीन विद्वानांनी बरीचशी चर्चा केली आहे.  

नवरसपूरच्या रचनेबाबत माहिती देताना जगदगुरु इब्राहीम आदिलशाह या पुस्तकात सदाशिव आठवले लिहितात, ‘प्रथम म्हणजे इब्राहीमने आपल्या नव्या शहराला नौरसपूर किंवा नवरसपूर (हा शब्द फारसी लिपीत लिहिला तर दोन्ही प्रकारांनी वाचता येईल.) हे का दिले असेल हे पाहिले पाहिजे. संस्कृत काव्यमिमांसेत वेगवेगळ्या भावना किंवा विकार यांचे नऊ प्रकार मानले असून त्यांना रस अशी संज्ञा दिली आहे. (१) शृंगार (२) वीर (३) बीभत्स (४) रौद्र (५) भीती (६) हास्य (७) करुण (८) अद्भूत (९) शांत (भक्ती) असे नऊ रस कल्पिलेले असून कवितेतून तिच्या शब्दातून वृत्त किंवा छंदातून यांपैकी एक किंवा आधिक परिणाम साधले गेले पाहीजेत असे मानलेले आहे. रसांच्या नावावरुन काय परिणाम अपेक्षिलेले असतात हे सहज लक्षात येण्यासारखे असल्यामुळे ते विस्ताराने विशद करण्याची गरज नाही.  इब्राहीम संस्कृतचा चांगला जाणकार होता आणि प्राचीन भारतीय देवतांप्रमाणे काव्याच्या आणि संगिताच्या भाष्यावरही त्याची श्रद्धा होती. आपल्या काव्यातून आणि गीतातून या रसांचा अविष्कार व्हावा अशी त्याची भावना होती. एकंदर आपल्या दरबारात होणाऱ्या सर्वच कलोपासनेतून ही रसनिष्पत्ती त्यांची अशी त्यांची धारणा होती. म्हणून जिथे काव्यामागून काव्ये रचली जाणार होती व गाण्यामागून गाणी आळवली जाणार होती त्या आपल्या नव्या शहराला नवरसपूर नाव द्यायचे त्याने ठरविले असावे.’ नवरसपूर शहरात सरस्वतीला विशेष महत्व होते. एका महालाला त्याने सरस्वती महल हे नाव दिले होते. कारण संगीताची देवता म्हणून सरस्वतीला त्याने नवरसपूरची प्रेरणाज्योती ठरवले होते.

सरस्वतीशी मातृत्वाचे नाते
नवरसपूरात सातत्याने विविध जलश्यांचे आयोजन केले जाई. नवरोजच्या काळात इब्राहीम आदिलशाह नवरसपूरात संगीत महोत्सवाचे आयोजन करायचा. त्यासाठी देश विदेशातून विद्वानांना आमंत्रित करायचा. त्यात तो स्वतःदेखील आपल्या कविता आणि गाणी सादर करायचा. विणा वाजवायचा. तबल्यावर ताल धरायचा. संगीतात असलेल्या रुचीमुळेच तो स्वतःला सरस्वतीपुत्रही म्हणवून घ्यायचा. इब्राहीम आदिलशाहने सरस्वतीला आपल्या आत्मप्रेरणेची ज्योती मानले होते. आणि सरस्वती या आपल्या आत्मीक मातृत्वाशी असलेले नाते अधिकाधिक विकसित करताना त्याने सरस्वतीला केंद्रस्थानी ठेऊन अनेक सुरांची रचना केली. सरस्वतीविषयी त्याने काही कविताही लिहिल्या. सरस्वतीविषयी लिहीलेल्या एका कवितेत तो म्हणतो, 

‘‘ नवरस सूर जुग जुग ज्योती आनुड सरोगुनी
यसत सरोसती माता इब्राहीम प्रसाद भाई दुनी’’
(भावार्थ - हे सरस्वती माझी माता, इब्राहीमवर तुझी मोठी कृपा झाली की, नवरसाचे सूर प्रदिर्घ कालावधीपर्यंत गुंजत राहतील. आणि जगातील बुध्दीवंतांना हे गीत प्रेरणा देत राहतील) 

सरस्वतीच्या भक्तीविषयी तो लिहितो, 
 ‘‘इब्राहीम माला पिनक सीं नवा दंडूत कृत जपना’’
(भावार्थ – सरस्वती चमेलीचे फुल आहे. इब्राहीम फुलांची माळ गळ्यात घालून घेऊन तिच्या समोर नतमस्तक झाला आहे.)

विद्येची देवता म्हणून इब्राहीमला गणेशाचे आकर्षण
सरस्वती ही जशी संगीताची जननी म्हणून ओळखली जाते. तसे गणेश हे विद्वत्तेचे प्रतिक मानले जाते. त्यामुळेच इब्राहीम आदिलशाहने गणपतीविषयी काही कविता लिहिल्या होत्या. बिजापूरचा उल्लेखही तो अनेकदा बिद्यापूर किंवा विद्यापूर असा करायचा. त्यामुळे विद्येचं प्रतिक म्हणून त्याने गणेशाविषयी स्तवन लिहेले. त्यातील एका कवितेत तो म्हणतो, 

‘‘सारो गणेश माता पिता तुम मानो निर्मल बीब फटक सेसी तास
इब्राहीम गुप्त गेसू अब नवाज प्रगट केमू धनी मीरो रास’’
(भावार्थ - सरस्वती आणि गणेश हे माझे आत्मीक माता पिता आहेत. त्यांच्यामुळे मी त्यांच्या कृपेची अपेक्षा बाळगून आहे.)
      
‘‘गणपती तुम रुपकी तनक जुद मानो स्वर जगमगे रत बसंत 
सौदीष्ट साविष्ट है विनायक मनोहर सुन मुख देखन घटन सावन नैन पंत
चुन्ना छायी चंद्रमुख कलंक स्तुती तेरी सुने कंत’’
(भावार्थ – गणेशच्या मुखाचा थोडासा प्रकाशही वसंत ऋतुतल्या सुर्याच्या किरणांपेक्षा सौंदर्यात काकणभर श्रेष्ठ असते. त्यामुळे हरिणेच डोळेसुध्दा दिपतात. त्याच्या कौतूकाने सौंदर्याचे प्रतिक असणाऱ्या चंद्रालाही संकोच होतोय.)

 ‘‘गणपती मुर्त मस्त मेघ हस्ते मेघ मुदबर खतपानी 
वंत वामीनी घुंट घूर घूर गोर मंडा भालबिदहू बानी’’
(भावार्थ – मेघ नक्षत्र गणेशासारखा आहे. विजा ही त्याची सोंड आहे. जी गर्जना आहे ती त्याची घंटा आहे. इंद्रधनु हा सरस्वतीचा माता  आहे.)

‘‘सरोसती गौरी जिसे गजवंत पोतरी को किस सुतारी सवारें बना 
या कारन गणपती देवमान मातंक मुक्त सुरदफ क्यौं अपना’’
(भावार्थ – सरस्वती हस्तदंतातून बनवलेली मुर्ती आहे. त्यामुळे गणपतीनेही हत्तीचे रुप धारण केले आहे.) 

इब्राहीम आदिलशाहने गणेश व सरस्वती यांच्याप्रमाणेच ब्रम्हा, विष्णू या देवतांविषयीदेखील कविता केल्या आहेत. तो स्वतःला जगद्‌गुरुदेखील म्हणवून घ्यायचा. हिंदू मुस्लिमांमधील परस्पर विसंवाद दूर करण्यावर त्याचा भर होता. त्यासाठी तो वेगवेगळे प्रयोग करुन पाहायचा. एकदा त्याने हिंदूविषयी आदर म्हणून शुक्रवारची साप्ताहीक सुट्टी रद्द करुन बहुसंख्येने असणाऱ्या हिंदूच्या उपासनेचा दिवस म्हणून गुरुवारी सुट्टी जाहीर केली होती. इब्राहीमने आपल्या दरबारात हिंदूंना मानाची पदे दिली होती. शिवाय अनेक हिंदू मंदिरांना देणग्या देऊन आपल्या राजवटीची दिशा स्पष्ट केली होती. अकबर आणि दारा शुकोह ज्याप्रमाणे उत्तर भारताच्या धर्मसहिष्णू इतिहासाचे प्रतिक आहेत, त्याप्रमाणे इब्राहीम आदिलशाह बंधुभावावर आधारीत दखनी राष्ट्रीयत्वाचा नायक आहे. 

- सरफराज अहमद
(लेखक इतिहासाचे अभ्यासक आहेत)

'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज, पॉडकास्ट आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  -