हिंदू जोडप्याच्या मस्जिदमधील शुभविवाहाची 'केरळ स्टोरी'

Story by  Sameer D. Shaikh | Published by  sameer shaikh • 1 Years ago
अंजू, शरत आणि भटजी यांच्यासमवेत मस्जिद कमिटीचे सदस्य
अंजू, शरत आणि भटजी यांच्यासमवेत मस्जिद कमिटीचे सदस्य

 

शंभर टक्के साक्षर राज्य म्हणून केरळची ओळख आहे. मात्र गेल्या काही वर्षांपासून हे राज्य राजकीय दूषप्रचारांचा बळी ठरत आला आहे. 'द केर स्टोरी' सिनेमाच्या निमित्ताने केरळ पुन्हा चर्चेत आले आहे. गेल्या काही वर्षांपासून देशातील मुस्लिमांविषयी भयगंड (Fobia) वाढविण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न केले जात आहेत. त्याचसाठी २६टक्के मुस्लिम लोकसंख्या असलेल्या केरळला मुद्दाम टार्गेट केले जाते. गेल्या काही दिवसांपासून 'द केरळ स्टोरी' नावाच्या चित्रपटातुन राज्याची तथाकथित 'इस्लामिक कट्टरपंथी' प्रतिमा आणखी बटबटीत केली जाऊ लागली आहे. देशातील अनेक राजकीय पक्ष, नेते आणि कलाकार या चित्रपटाच्या बाजूने आणि विरोधात उभे राहिले आहेत. महान संगीतकार ए. आर. रहमान यांनीही आता या वादात उडी घेतली आहे. 

'आणखी एक केरळ स्टोरी' असे शीर्षक असलेला एक व्हिडिओ रहमान यांनी नुकताच ट्विटरवर शेयर केला आहे. केरळमधील एका मशिदीत हिंदू जोडप्याचे हिंदू रीतिरिवाजानुसार लग्न लावून दिले जात असल्याचे व्हिडीओतुन दिसते आहे. सोबत दिलेल्या कॅप्शनमध्ये रहमान म्हणतात, 'शानदार, मानवतेवर केलेले प्रेम हे कायम बिनशर्त आणि जखमांवर फुंकर घालणारे असावे.' 

मस्जिदमध्ये पार पडला 'शुभ विवाह'
ही गोष्ट आहे जानेवारी २०२० मधली. केरळमधील अलपुझ्झा येथे राहणाऱ्या अंजु आणि शरत यांचे लग्न ठरले होते. मात्र अंजुच्या आईची आर्थिक परिस्थिती फारशी बरी नव्हती. परिसरातील चेरावल्ली मुस्लिम जमाअत मस्जिदच्या शेजारीच त्या राहायला होत्या. मुलीचे लग्न जवळ आले होते, हाताशी पैसे नव्हते. साहजिकच त्यांनी आपल्या शेजारी मस्जिद कमिटीकडे आर्थिक मदत मागितली. कमिटीने आनंदाने मदतीचे आश्वासन दिले. उलट ते दोन पाऊल पुढे गेले. त्यांनी मस्जिदमध्येच लग्नाचा मंडप सजवला. इतकेच नव्हे तर हा विवाह हिंदू रीतिरिवाजाने संपन्न झाला. लग्नात आलेल्या हजारएक पाहुण्यांच्या जेवणाची व्यवस्थाही मस्जिदच्या प्रांगणात करण्यात आली आहे. केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी नवदाम्पत्यांना शुभेच्छा देणारी पोस्टही लिहली आहे.
  

केरळची धार्मिक सहिष्णूता
धार्मिक सहिष्णुता आणि सौहार्दपूर्ण सहजीवन यांसाठी केरळ पूर्वापार  प्रसिद्ध आहे. भारतात इस्लामचे आगमन (प्रेषित मुहम्मद यांच्या हयातीतच) केरळमार्गेच झाले असल्याची अनेकांना कल्पना नाही. जगातल्या सर्वांत पहिल्या मशिदींपैकी एक मशीद केरळ येथे आहे. चेरामन पेरूमल या हिंदू राजाने या नव्या धर्मातील परदेशी व नंतर इथेच स्थायिक झालेल्या अरबी व्यापाऱ्यांसाठी इ. स. ६२९ मध्ये ही मस्जिद बांधली होती. 
 
बदनामीची ही पहिलीच वेळ नाही 
२०२० मध्ये आयसिस ही दहशतवादी संघटना धुमाकूळ घालत होती. जगभरातून अनेक तरुण तरुणी आयसिसमध्ये सामील होण्यासाठी स्वतःचा देश सोडून सीरिया इराककडे जात होते. भारतातून आयसिसला अतिशय अल्प प्रतिसाद मिळाल्याचे गृहमंत्रालयाच्या २०१७मध्ये प्रसिद्ध झालेल्या अहवालात नमूद करण्यात आले होते. जे मोजके भारतीय तरुण आयसिसकडून लढण्यासाठी गेले होते त्यापैकी बहुतांश जण केरळमधील होते. त्यावेळी केरळमधील मुस्लिम धर्मांधता हा विषय ऐरणीवर आला. त्याविषयी अनेक तर्क कुतर्क लालढवले जाऊ लागले. साहजिकच विविध राजकीय आणि धार्मिक संघटना आपापले अजेंडे रेटू लागले. पण एका आधुनिक आणि प्रगतिशील राज्याविषयी जाणीवपूर्वक संशयाचे धुके निर्माण करण्यात आले हे मात्र खरे. 

'दुष्प्रचारकी' सिनेमाने वाढवले गैरसमज
केरळविरोधी दुष्प्रचारात उत्तरोत्तर भरच पडत गेली. आता प्रदर्शित होणाऱ्या 'द केरळ स्टोरी' या 'सत्यघटना' संगण्याचा दावा करणाऱ्या हिंदी चित्रपटाचे ट्रेलर काही दिवसांपूर्वी युट्युबवर रिलीज झाले आणि पुन्हा एकदा गजहब झाला. संशयाचे, वादाचे लोट तयार झाले. नजीकच्या काही वर्षांत केरळमधून ३२,००० मुस्लिमेतर मुलींना फूस लावून धर्मांतरित करण्यात आले असून त्यातील काही जणींनी सिरियाची वाट धरल्याचेही या चित्रपटात सांगण्यात आले आहे. ट्रेलर रिलीज झाल्यावर धर्मकार्य म्हणून हा सिनेमा पहा, केरळमध्ये हिंदू एकतेसाठी या सत्कारात सामील व्हा, असे आवाहन सोशल मीडियावरून करण्यात येत असल्याचेही पाहायला मिळते. 

चित्रपट निर्मात्यांनी 'चूक' सुधारली
केरळमधून ३२,००० मुस्लिमेतर मुली 'गायब' झाल्या असून त्यापैकी बहुतेकांचे इस्लाममध्ये धर्मांतर झाल्याचे सत्य उलगडून दाखवण्याचा दावा 'द केरळ स्टोरी'च्या निर्मात्यांनी ट्रेलर रिलीजच्या वेळी केला होता. या दाव्यात काहीच तथ्य नसल्याचे अनेक अभ्यासकांचे मत होते. केवळ दहा मुलींची माहिती द्या आणि एक कोटी रुपये मिळवा असे आव्हान केरळी उद्योजकाने दिले होते. मात्र निर्माते किंवा चित्रपट समर्थक अशी कोणतीही माहिती सादर करू शकले नाही. केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी कायदेशीर कारवाईचा इशाराही दिला होता. सध्या केरळ उच्च न्यायालयात यावर खटला सुरू आहे.

निर्मात्यांच्या वकिलांनी आज न्यायालयाला एक महत्त्वाची 'चूक' दुरुस्त केल्याची माहिती दिली आहे. युट्युबवरील ट्रेलरच्या व्हिडीओमधून आणि सोशल मीडियावरून ३२,००० महिला बेपत्ता हा आकडा हटवत 'चूक' दुरुस्त केली असल्याचे निर्मात्यांनी न्यायालयासमोर कबूल केले आहे. या घटनेत अजिबात तथ्य नसूनही केवळ सनसनाटी निर्माण करण्यासाठी निर्मात्यांनी ही खोटी माहिती पसरवली असल्याचे बोलले जात आहे