शब-ए-कद्र : एक महान ईश्‍वरी वरदान

Story by  Awaz Marathi | Published by  Chhaya Kavire • 23 d ago
प्रातिनिधिक फोटो
प्रातिनिधिक फोटो

 

रमजान महिन्याचा शेवटचा टप्पा सुरु झाला आहे. उपवासाचे हे शेवटचे दहा दिवस विशेष महत्त्वाचे असतात. कारण या दहा रात्रींपैकी एक रात्र विशेष असल्याचा उल्लेख कुराणमध्ये येतो. तिला शब-ए-कद्र असे म्हणतात. मात्र ती रात्र नेमकी कोणती हे भक्ताने उपासनेतून शोधावे असे सांगण्यात आले आहे. मात्र सामन्यत: २६ वा उपवास संपल्यानंतर येणारी रात्र म्हणजेच शब-ए-कद्र असा समजण्याचा प्रघात आहे. यावर्षी ही रात्र रविवारी ७ एप्रिल रोजी येत आहे. त्यानिमित्ताने  शब-ए-कद्रची पार्श्वभूमी आणि तिचे महत्त्व सांगणारा मुस्लीम विचारवंत मरहूम अनीस चिश्ती यांनी लिहिलेला हा लेख.

मानवाला अल्लाहने अफाट देणग्यांनी समृद्ध केलं आहे. कुरआनच्या शब्दात अल्लाहने त्याची निर्मिती 'अहसने तक्वीम' म्हणजे 'आम्ही मानवाला उत्कृष्ट रचनेत निर्माण केली,' अशी आहे. जगात कुठलाही प्राणी त्याची बरोबरी करू शकत नाही. एवढेच कशाला आकाशातील ईशदूत (फरिश्‍ते) त्याच्या हमसरीचा (बरोबरी) दावा करू शकत नाहीत, कारण माणसाच्या निर्मितीच्या समयी संपूर्ण फरिश्‍ते मानवासमोर नतमस्तक झाले होते. संपूर्ण सृष्टी मानवासमोर नतमस्तक (सज्दारेज) होत असताना फक्त इब्लीस (सैतानाने) त्याच्या समोर नतमस्तक होण्यास नकार दिला होता आणि त्याचे तर्क असे होते, की मानवाची निर्मिती मातीपासून झाली आहे आणि 'मी' अग्नीपासून निर्माण झालो असल्याकारणाने मी मातीसमोर कसा माथा टेकू?

अल्लाहने सैतानाचे तर्क निकालात काढले. त्याला त्याक्षणी स्वर्गाच्या मर्यादेतून निष्कासित करण्यात आले आणि त्याची उपाधी 'रजीम' (काढून टाकण्यात आलेला) अशी पडली. माणूस अल्लाहला त्याच्या एकूण निर्मितीस सर्वांत प्रिय व्यक्ती आहे, म्हणून अल्लाहने त्यावर आपल्या कृपेचा जणू काही वर्षावच केला आहे. त्यात एक महान कृपा म्हणजे रमजानच्या पवित्र महिन्यात अंतिम दहा दिवसांतून एका विषम तिथीला अवतरित होणारी पवित्र रात्र म्हणजे 'शब-ए-कद्र 'ची रात्र होय. 'शब' म्हणजे रात्र, रजनी आणि 'कद्र' म्हणजे खूप आदर आणि सन्मान प्राप्त - रात्र. 'शब' हा फारसी भाषेतील शब्द असून, कद्र हा कुरआनातील अरेबिक शब्द आहे. या रजनीच्या संदर्भात कुरआन फर्मावितो:

"आम्ही याला (कुरआनला) कद्रच्या रात्री अवतरले आहे. आणि तुम्हाला काय माहीत, 'कद्र'ची रात्र काय आहे? कद्रची रात्र हजार महिन्यांपेक्षा अधिक उत्तम आहे. दूत आणि रूह (जिब्रील अ.स.) त्यात आपल्या पालनकर्त्याच्या आज्ञेने प्रत्येक आदेश घेऊन उतरतात. त्या रात्रीत पूर्णतः 'शांती' आहे,. उषःकाळापर्यंत." (सूरह अलकद्र - ९७:१ ते ५) 

शब-ए-कद्रची ही रात्र शंभर महिन्यांपेक्षा बेहतर आहे, परंतु रमजानच्या महिन्यातील अंतिम दहा दिवसांच्या विषम तारखांमध्ये म्हणजे २१, २३, २५, २७ आणि २९ पर्यंत या रात्रीला शोधणे हे उपासकाचे काम आहे. या तारखा सुचविण्यात आल्या असल्या तरी या रात्रीत नेमकी कुठली उपासना (इबादत) करावी, हे मात्र सुचविण्यात आलेले नाही. नमाज, दुआ, जप (जिक्र), मुराकिबा (ध्यानधारणा), कुरआनपठण (तिलावत), जियारते कुबूर (कब्रस्तानात जाऊन मृतव्यक्तींसाठी दुआ करणे आणि आपल्या मृत्यूची आठवण करणे) वगैरे गोष्टी आपण करू शकतो.

आपण कितीही मोठे उपासक असलो तरी आयुष्यभरातून आपल्या पाच वेळेची नमाज पूर्ण झालेली नसते. त्याचा एक सोपा उपाय म्हणजे या रात्रीत आठवणीने पूर्ण न झालेल्या नमाजी अदा करण्यात याव्या. नमाज पढण्याच्या या पद्धतीला 'कजाए उमरी' (आयुष्यभरातील उरलेल्या नमाजची भरपाई) असे म्हणण्यात आले आहे. याची अधिक माहिती आपल्या मोहल्ल्यातील मशिदीच्या इमामसाहेबांकडून मिळू शकते.

महिलांनीही ही रात्र साजरी केली पाहिजे. त्यांनी केलेली वातावरणनिर्मिती व इतमामामुळेच घरातील मुले व पुरुष या रात्रीच्या पावित्र्याकडे आकर्षित होतात. इमानधारकांचे घर नेहमीच स्वच्छ आणि पवित्र असले पाहिजे. भिंतींवर शोभेसाठी तसबिरी लावणे वर्ज्य आहे, परंतु तसबिरी असतीलच तर त्यांना हटविले पाहिजे, ज्यामुळे पवित्र फरिश्‍त्याचे (दूतांचे) आपल्या घरीही पदार्पण होईल आणि वर्षभर आपण सुखी व समाधानी राहू शकू. याचा अर्थ असा नाही, की एकदा या रात्रीत जागरण केले आणि मशिदीत अथवा घरात खूप मन लावून प्रार्थना केली तर वर्षभर काही करण्याची आवश्‍यकता नाही. उलट ही रात्र आपणास प्रत्येक रात्रीला शब-ए-कद्र मध्ये परिवर्तित करण्याची शक्ती देते.

मोहल्ल्यात, बाजारात, रस्त्यावर इकडेतिकडे हिंडणे, हॉटेलातून, दुकानांच्या बाकांवर बसून विनाकारण गप्पा मारणे, गोंगाट करणे, मशिदीतून गटागटांत बसून गप्पा मारणे आणि विनाकारण बोलणे इत्यादी कृत्ये करणे म्हणजे या रात्रीचा अपमान आहे, हे विसरता कामा नये!

- अनीस चिश्‍ती
 

 

'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज, पॉडकास्ट आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  -


Awaz Marathi WhatsApp Channel 
Awaz Marathi WhatsApp Group 
Awaz Marathi Facebook Page
Awaz Marathi Twitter