इस्त्रायली सैन्याने गाझामधील कॅफे, शाळा आणि अन्न वितरण केंद्रांवर बॉम्बहल्ले केले. या हल्ल्यात ९५ पॅलेस्टिनी ठार झाले. रुग्णालयावरही हल्ला झाला. यात अनेक जण जखमी झाले आहेत. सोमवारी झालेल्या हल्ल्यांमध्ये गाझा शहर आणि उत्तर भागात ६२ जण मृत्युमुखी पडले. यापैकी ३९ जणांचा मृत्यू गाझा शहराच्या उत्तरेला असलेल्या अल-बक़ा कॅफेवर झालेल्या हल्ल्यात १२ लोक जखमी झाले.
या कॅफेमध्ये लोक वाढदिवस साजरा करत होते. त्याठिकाणी प्रत्यक्षदर्शी याह्या शरीफ यांनी सांगितले, इस्त्रायली लढाऊ विमानांनी हा हल्ला केला. लोकांचे तुकडे झालेले आढळले. हा कॅफे कोणत्याही राजकीय किंवा लष्करी गटाशी संबंधित नव्हता. येथे मुलांसह अनेक लोक जमले होते. हल्ल्यामुळे कॅफे पूर्णपणे उद्ध्वस्त झाला. जमिनीत मोठा खड्डा पडला."
माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार असे सांगण्यात येत आहे की, कॅफेवरील हल्ला कोणत्याही सूचनेशिवाय झाला. हा परिसर विस्थापित आणि त्रस्त लोकांसाठी आश्रयस्थान होता. याठिकाणी तंबूंमधील उष्णतेपासून येथे थोडा दिलासा मिळत होता.
सोमवारीच इस्त्रायली सैन्याने गाझा शहरातील झैतून परिसरातील अन्न वितरण गोदामावर हवाई हल्ला केला. यात अन्नधान्यासाठी आलेल्या १३ जणांचा मृत्यू झाला. इस्त्रायली सैन्याने गाझा शहरातील याफा शाळेवरही बॉम्बहल्ला केला. या शाळेत शेकडो विस्थापित पॅलेस्टिनी आश्रयाला होते.
हल्ल्यापूर्वी पळून गेलेले हमदा अबू जरादेह माध्यमांशी बोलताना म्हणाले, "आम्हाला पाच मिनिटांत स्थलांतराची धमकी मिळाली. कुठे जायचे, काय करायचे, हे कळत नव्हते. गेल्या ६३० दिवसांपासून जगाने आम्हाला एकटे सोडले आहे. मृत्यू आमच्या जवळच आहे."
मध्य गाझातील दैर अल-बलाह येथील अल-अक्सा रुग्णालयाच्या आवारातही इस्त्रायली सैन्याने हल्ला केला. येथे हजारो कुटुंबांनी आश्रय घेतला होता. विस्थापित कुटुंबांचे तंबू हल्ल्यात उद्ध्वस्त झाले. इस्त्रायलने गाझावरील २२ महिन्यांच्या युद्धात अनेक रुग्णालयांना लक्ष्य केले आहे. मानवाधिकार गट आणि संयुक्त राष्ट्रसंघाच्या तज्ज्ञांनी इस्त्रायलवर गाझाची आरोग्य व्यवस्था उद्ध्वस्त करण्याचा आरोप केला आहे.
दक्षिण गाझातील खान युनूस येथे गाझा ह्युमॅनिटेरियन फाउंडेशनच्या (GHF) अन्न वितरण केंद्रांवर हवाई हल्ल्यात १५ पॅलेस्टिनी ठार झाले. हे केंद्र अमेरिका आणि इस्त्रायलच्या पाठिंब्याने चालते. नासर वैद्यकीय संकुलाच्या सूत्रांनी ही माहिती दिली. हल्ल्यात ५० जण जखमी झाले. मे अखेरीस इस्त्रायली नाकेबंदीमुळे अन्न वितरण मर्यादित झाल्यापासून GHF केंद्रांवर सुमारे ६०० पॅलेस्टिनी ठार झाले होते.
गाझाच्या आरोग्य अधिकाऱ्यांनी सांगितले, झैतूनमधील हल्ल्यांमध्ये १० जण ठार झाले. गाझा शहराच्या नैऋत्येला १३ जणांचा मृत्यू झाला. संयुक्त राष्ट्रसंघानुसार, गाझाचा ८० टक्क्यांहून अधिक भाग आता इस्त्रायली लष्करी क्षेत्र किंवा सक्तीच्या विस्थापन दबावाखाली आहे.