इराणच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इस्रायल आणि अमेरिकेवर हल्लाबोल

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 12 h ago
इराणचे परराष्ट्रमंत्री अब्बास अराघची
इराणचे परराष्ट्रमंत्री अब्बास अराघची

 

इराणचे परराष्ट्रमंत्री अब्बास अराघची यांनी इस्रायलबाबत वक्तव्य केले आहे. इस्रायली राज्याला इराणच्या मिसाइल्सपासून वाचण्यासाठी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडे धाव घ्यावी लागली, असे ते म्हणाले. यात ट्रम्प यांचा 'डॅडी' असा उल्लेख केला.  

नाटोचे प्रमुख मार्क रुट यांनी नुकतंच मिश्किलपणे ट्रम्प यांना 'डॅडी' असं संबोधलं होतं. अराघची यांनी सोशल मीडियावर लिहिलं, "महान आणि शक्तिशाली इराणी जनतेने जगाला दाखवून दिलं की, इस्रायली शासनाला आमच्या मिसाइल्सपासून वाचण्यासाठी ‘डॅडी’कडे धाव घेण्याशिवाय पर्याय नव्हता. धमक्या आणि अपमान इराणी जनता सहन करणार नाही. जर भ्रमामुळे आणखी चुका झाल्या, तर इराण आपली खरी ताकद दाखवण्यास मागेपुढे पाहणार नाही. यामुळे इराणच्या सामर्थ्याबाबत कोणताही भ्रम संपेल." 

इराणच्या वरिष्ठ नेत्याने पुढे मागणी केली की, ट्रम्प यांनी इराणचे सर्वोच्च नेते आयातोल्ला अली खामेनी यांच्याविषयी केलेल्या अपमानजनक टिप्पण्या मागे घ्याव्यात. अमेरिकेने इराणच्या तीन महत्त्वाच्या अणुसंस्थांवर हल्ले केल्यानंतर ट्रम्प यांनी आशियाई प्रतिस्पर्ध्यांमध्ये शांतता करार घडवला होता. ट्रम्प खरंच करारासाठी गंभीर आहेत का, असा सवालही अराघची यांनी उपस्थित केला.  

त्यांनी एक्सवर लिहिलं, "जर राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांना खरंच करार हवा असेल, तर त्यांनी इराणचे सर्वोच्च नेते, ग्रँड आयातोल्ला खामेनी यांच्याविषयी अपमानजनक आणि अस्वीकार्य स्वर बाजूला ठेवावा. त्यांच्या लाखो समर्पित अनुयायांना दुखवणे थांबवले पाहिजे."  

अराघची यांनी उल्लेखलेला 'करार' हा इराणच्या अणुकार्यक्रमाशी संबंधित आहे. हा कार्यक्रम नुकत्याच झालेल्या अमेरिकेचा मित्र इस्रायल आणि इराण यांच्यातील संघर्षाच्या केंद्रस्थानी होता. १२ जूनला इस्रायलने इराणच्या अणु आणि लष्करी स्थळांवर हल्ले सुरू केले. हे हल्ले वॉशिंग्टन-तेहरान यांच्यातील अणुकार्यक्रमावरील नव्या चर्चेपूर्वी झाले. २३ जूनला युद्ध संपलं. त्याच्या एक दिवस आधी अमेरिकेने ऑपरेशन मिडनाइट हॅमर राबवलं. याला प्रत्युत्तर म्हणून इराणने कतारमधील अमेरिकेच्या हवाई तळावर मिसाइल्स डागली.