डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतासोबत व्यापारी कराराचे दिले संकेत

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 12 h ago
प्रातिनिधिक फोटो
प्रातिनिधिक फोटो

 

गुरुवारी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सूचक वक्तव्य केले आहे. त्यांनी सांगितले की, अमेरिकेने चीनसोबत करार केला आहे. भारतासोबतही लवकरच खूप मोठा करार होईल. ‘बिग ब्युटीफुल बिल’ या कार्यक्रमात बोलताना ट्रम्प यांनी ही घोषणा केली. 

कार्यक्रमावेळी बोलताना ते म्हणाले, "सर्वांना करार करायचा आहे आणि त्यात सहभागी व्हायचं आहे. काही महिन्यांपूर्वी प्रसारमाध्यमं म्हणत होती, ‘खरंच कुणाला यात रस आहे का?’ पण कालच आम्ही चीनसोबत करार केला. आम्ही काही उत्तम करार करत आहोत. भारतासोबतही एक खूप मोठा करार होऊ शकतो."  

भारत-अमेरिका करार
या महिन्याच्या सुरुवातीला अमेरिकेचे वाणिज्य विभागाचे सचिव हॉवर्ड ल्युटनिक यांनी भारत आणि अमेरिकेत करार होण्याची शक्यता वर्तवली होती. वॉशिंग्टनमधील यूएस-इंडिया स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप फोरमच्या (यूएसआयएसपीएफ) नेतृत्व परिषदेत बोलताना ल्युटनिक म्हणाले होते की, "भारत आणि अमेरिकेत लवकरच व्यापारी करार होऊ शकतो. दोन्ही देशांना एकमेकांना साजेशी जागा सापडली आहे." 

ल्युटनिक यांच्या वक्तव्यानंतर काही दिवसांनी भारताचे वाणिज्य आणि उद्योगमंत्री पीयूष गोयल यांनी सांगितलं होते की, "दोन्ही देश निष्पक्ष आणि समान व्यापारी करारासाठी वाटाघाटी करत आहेत. हा करार दोन्ही अर्थव्यवस्थांना फायदा देईल."  

अमेरिका-चीन करार
ट्रम्प यांनी अमेरिका-चीन कराराचा तपशील सांगितला नाही. परंतु या महिन्याच्या सुरुवातीला सीएनएनने वृत्त दिलं की, अमेरिका आणि चीन यांच्यात नवीन व्यापारी करार झाला. हा करार गेल्या महिन्यात जिनिव्हामध्ये ठरलेल्या अटींवर आधारित आहे.