फॅशन शोमधील चप्पल कोल्हापुरीच असल्याची 'प्राडा'ची कबुली

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 7 h ago
प्रातिनिधिक फोटो
प्रातिनिधिक फोटो

 

प्राडा ब्रँडने कोल्हापुरी चपलेची नक्कल करून स्वतःच्या ब्रँडच्या नावासह बाजारात आणली आणि पुरुषांच्या एका फॅशन शोमध्ये याचे सादरीकरणही केले. त्या विरोधात महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्री अँड अॅग्रीकल्चरने तातडीने इटली येथील 'प्राडा'चे संचालक पेट्रिझो बर्टेली यांच्याशी पत्रव्यवहार केला. त्यांनी या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत त्याच्या कार्यक्रमात वापरली गेलेली चप्पल कोल्हापुरीच असल्याचे जाहीर केल्याची माहिती महाराष्ट्र चेंबरचे अध्यक्ष ललित गांधी यांनी शुक्रवारी दिली.

संबंधित फॅशन शोमध्ये वापरली गेलेली चप्पल इटालियन असल्याचे भासवले गेले होते. त्यामुळे भारतीय सांस्कृतिक वारशाचा फायदा उठवण्याचा आरोप महाराष्ट्र चेंबरचे अध्यक्ष ललित गांधी यांनी 'प्राडा'वर करत पत्रव्यवहार केला. यानंतर प्राडा ग्रुप कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी प्रमुख लोरेन्झो बर्टेली यांनी पत्राला प्रत्युत्तर देत चेंबरचे म्हणणे मान्य केले.

कारागिरांची मागणी
'प्राडा'कडून कोल्हापुरीसारखी चप्पल एक लाख रुपयांपेक्षा जास्त किमतीला विकली जात आहे तर, भारतीय कारागीर तीच चप्पल चारशे रुपयांत बनवतात. या संदर्भात कोल्हापुरातील चप्पल बनवणारे कारागिरांत नाराजी होती. महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सने याप्रकरणी लक्ष घालावे, अशी विनंती राज्यातील काही कारागिरांनी केली होती. ललित गांधी यांनी 'प्राडा'कडे पत्रव्यवहार करुन वस्तुस्थिती मांडली.