सरन्यायाधीश भूषण गवई यांनी जतन केला ऐतिहासिक वारसा

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 5 h ago
सरन्यायाधीश भूषण गवई
सरन्यायाधीश भूषण गवई

 

जुन्या वस्तूंचा प्रवास हा सहसा अडगळीत जाणे व तेथून भंगारात जाणे असाच असतो. उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात एका जुन्या खुर्चीचाही प्रवास असाच होत असताना तत्कालीन मुख्य सरकारी वकील व देशाचे विद्यमान सरन्यायाधीश भूषण गवई यांनी तो रोखला. ती खुर्ची निवृत्त सरन्यायाधीश मोहम्मद हिदायतुल्ला यांची होती. सरन्यायाधीश गवई यांच्यामुळे ती जतन करण्यात आली.

गवई यांचे शुक्रवारी शहरात सरन्यायाधीश पदाची शपथ घेतल्यानंतर पहिल्यांदा आगमन झाले. यानिमित्ताने त्यांचे जुने सहकारी तसेच सध्याचे मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे प्रशासकीय न्यायाधीश नितीन सांबरे यांनी जुन्या आठवर्णीना उजाळा दिला. न्यायाधीश सांबरे म्हणाले, "गवई मुख्य सरकारी वकील झाले तेव्हा त्यांच्यापुढे सरकारी वकील कार्यालयातील जुन्या वस्तू भंगारात काढण्याचा मुद्दा मांडण्यात आला होता. 

त्या पाहत असताना गवईंना एक खूप जुनी खुर्ची दिसली. त्या खुर्चीचे हात पोपटाचा चेहरा व चोचेसारखे तर पाय एखाद्या प्राण्याच्या पायासारखे होते. गवईंनी या खुर्चीबाबत विचारले असता ही खुर्ची माजी मुख्य सरकारी वकील व माजी सरन्यायाधीश मोहम्मद हिदायतुल्ला यांची असल्याचे कळले. ही खुर्ची काही कामाची नाही, असे न्यायिक अधिकारी सांगत असताना गवई म्हणाले, "ही खुर्ची माजी मुख्य सरकारी वकिलांची आहे जे पुढे जाऊन सरन्यायाधीशपदी रूढ झाले. त्यामुळे ती माझ्यासाठी प्रेरणादायी आहे."

'घटनेने तीनही स्तंभांच्या मर्यादा आखल्या'
"भारतीय राज्यघटनेने लोक प्रतिनिधींचे कायदे मंडळ, प्रशासन आणि न्यायपालिका अशा तीन स्तंभांच्या मर्यादा आखून दिल्या आहेत. या स्तंभांनी राज्यघटना आणि कायद्यानुसार काम करणे अपेक्षित आहे. अधिकाराच्या बाहेर जाऊन तयार केलेले कायदे न्यायालयीन तत्त्वांना छेद देणारे असतात. न्यायिक सक्रियतेचे रूपांतर न्यायालयीन साहस आणि न्यायालयीन दहशतवादात होऊ देऊ नये," अशी भावना सरन्यायाधीश गवई यांनी व्यक्त केली. जिल्हा वकील संघटनेतर्फे (डीबीए) शुक्रवारी आयोजित सत्कार सोहळ्यात ते बोलत होते.