पंतप्रधान नरेंद्र मोदी बुधवारी, २ जुलैपासून पाच देशांचा दौरा सुरू करणार आहेत. हा दौरा ९ जुलैपर्यंत चालेल. घानापासून सुरू होणारा हा दौरा गेल्या दहा वर्षांतील सर्वात लांबलचक परदेश दौरा ठरेल. या दौऱ्यात दक्षिण अमेरिका, कॅरिबियन आणि आफ्रिकेतील देशांचा समावेश आहे.
परराष्ट्र मंत्रालयानुसार, दौरा घानापासून सुरू होईल. त्यानंतर मोदी त्रिनिदाद आणि टोबॅगो या कॅरिबियन देशात जातील. पुढे अर्जेंटिना, ब्राझील आणि शेवटी नामिबियाला भेट देतील. ब्राझीलमध्ये ते १७व्या ब्रिक्स २०२५ परिषदेला ते उपस्थित राहणार आहेत.
पाच देशांचा दौरा: देशनिहाय कार्यक्रम
घाना
पंतप्रधान मोदी सर्वात आधी घानाला भेट देणार आहेत. गेल्या ३० वर्षांत भारतीय पंतप्रधानाची ही पहिलीच भेट आहे. घानामध्ये मोदी लस उत्पादन केंद्राच्या निर्मितीला पाठिंबा देतील. तसेच ते घानाच्या संसदेला संबोधित करतील.
त्रिनिदाद आणि टोबॅगो
त्रिनिदाद आणि टोबॅगोच्या पंतप्रधान कमला पर्साद-बिसेसर यांच्या निमंत्रणावरून मोदी तिथे जाणार आहेत. २५ वर्षांनंतर भारतीय पंतप्रधानाची ही पहिली भेट आहे. या भेटीत मोदी संसदेच्या संयुक्त सत्राला संबोधित करतील.
अर्जेंटिना
अर्जेंटिनाचे राष्ट्राध्यक्ष हाविएर मिलेई यांच्या निमंत्रणावरून मोदी पंतप्रधान तिथे पोहोचतील. दोन्ही नेते द्विपक्षीय चर्चा करतील. संरक्षण, शेती, खाणकाम, तेल आणि वायू, नवीकरणीय ऊर्जा, व्यापार आणि गुंतवणूक क्षेत्रात सहकार्य वाढवण्यावर भर असेल.
ब्राझील
अर्जेंटिनानंतर मोदी ब्राझीलला भेट देतील. तिथे ब्रिक्स २०२५ परिषद होईल. ब्राझीलला मोदींची ही चौथी भेट आहे. परिषदेत मोदी दहशतवादाचा मुद्दा उपस्थित करतील. यात अलीकडील पहलगाम हल्ल्याचा आणि ऑपरेशन सिंदूरचा उल्लेख असेल.
नामिबिया
दौऱ्याचा शेवटचा टप्पा नामिबिया असेल. २७ वर्षांनंतर भारतीय पंतप्रधानाची ही पहिली भेट आहे. मोदी राष्ट्राध्यक्ष नेतुम्बो नांदी-नदैतवाह यांची भेट घेतील. तसेच नामिबियाच्या संसदेला संबोधित करतील. या भेटीत भारताची युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस (UPI) प्रणाली नामिबियात लागू करण्याचा करार होईल. ही प्रणाली भूतान, मॉरिशस, नेपाळ, सिंगापूर, श्रीलंका, फ्रान्स आणि युएईमध्ये आधीच कार्यरत आहे.