परंपरेनुसार वारकऱ्यांना चहा-नाश्ता देत मुस्लिम समाजाने जपला सर्वधर्म समभाव

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 4 h ago
पंढरपूर पायी दिंडीचे स्वागत करताना मुस्लिम समाज
पंढरपूर पायी दिंडीचे स्वागत करताना मुस्लिम समाज

 

नगरमध्ये मुस्लिम बांधवांकडून पंढरपूर पायी दिंडीचे स्वागत करतानाच, दिंडीतील वारकऱ्यांच्या चहा, नाश्ता देत धार्मिक सलोख्याचा आदर्श घालून दिला. जामखेड तालुक्यातील जवळा येथील मुस्लिम बांधवांकडून मागील अनेक वर्षांची परंपरा मनोभावे जोपासली जात आहे. या माध्यमातून जातीय सलोखा राखण्याचे काम होत आहे.

जामखेड तालुक्यातील सरदवाडी येथील श्रीक्षेत्र श्रीराम देवस्थान ट्रस्टच्या वतीने तेजोराव महाराज कात्रजकर, बाळासाहेब महाराज गाडे, तुकाराम महाराज ओमासे, भगवान महाराज गंभिरे, कांतीलाल महाराज गंभिरे यांच्या प्रेरणेने व चुंभळी गावकऱ्यांच्या सहकायनि दरवर्षीप्रमाणे पंढरपूर पायी दिंडीचे आयोजन केले जाते. दिंडी सरदवाडी येथून निघाल्यानंतर दिंडीचा पहिला मुक्काम बोर्ले येथे होतो. त्यानंतर दिंडीतील वारकरी सोमवारी (ता.३०) सकाळी चहा आणि नाश्त्यासाठी जवळा येथील मशिदीत आले.

या उपक्रमविषयी सांगताना सामाजिक कार्यकर्ते आयुब शेख म्हणाले की, "आध्यात्मिकदृष्ट्या पंढरपूरच्या आषाढी वारीला खूप महत्त्व आहे. वारीला जाणाऱ्या वारकऱ्यांचे स्वागत करतानाच त्यांची चहा-नाश्त्याची व्यवस्था करून मनोभावे सेवा करण्याचा प्रयत्न मुस्लिम बांधवांकडून दरवर्षी होत आहे." 

या सलोखा जपणाऱ्या उपक्रमविषयी बोलताना श्रीक्षेत्र श्रीराम देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष तेजोराव कात्रजकर महाराज महाराज म्हणाले की, "जवळा येथील मुस्लिम बांधवांनी वारकऱ्यांची मनोभावे सेवा करतानाच, सर्वधर्म समभावाची शिकवण दिली आहे. दुसऱ्या धर्माच्या परंपरांबाबत त्यांनी दाखवलेली आस्था आणि आदर सर्व समाजासाठी प्रेरणादायी आहे."

जवळा येथे मुस्लिम बांधवांकडून दरवर्षीप्रमाणे दिंडीतील वारकऱ्यांचे स्वागत करण्यात आले. माजी ग्रामपंचायत सदस्य आयुब शेख, असलम शेख, रिजवान शेख, तय्यब शेख, बबन आतार, अब्बास आतार, आशिफ शेख, सोहेल सय्यद, आलम पठाण, इत्रूस शेख, दिलावर शेख, खलील शेख, महंमद शेख यांच्यासह मुस्लिम बांधवांकडून पुढाकार घेऊन, वारकऱ्यांची मनोभावे सेवा केली गेली.

यावेळी आदिनाथ साखर कारखान्याचे संचालक दशरथ हजारे, राष्ट्रवादीचे अशोक पठाडे, एकनाथ हजारे, भाजपचे मोहन गडदे, उद्धव शिरसाठ, महादेव गंभिरे, सोमनाथ गाडे, अप्पासाहेब गंभिरे यांच्यासह मोठ्या संख्येने मुस्लिम बांधव व जवळा ग्रामस्थ उपस्थित होते.