तेलंगणा औषधी कारखान्यातील भीषण स्फोटात ४० ठार

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 4 h ago
प्रातिनिधिक फोटो
प्रातिनिधिक फोटो

 

तेलंगणातील रासायनिक कारखान्यात झालेल्या भीषण स्फोटातील मृतांचा आकडा मंगळवारी ४२ वर पोहोचला आहे. बचावकार्यात ढिगाऱ्याखालून आणखी मृतदेह सापडले. जिल्हा पोलीस अधीक्षक परितोष पंकज यांनी सांगितले, "ढिगारा हटवताना अनेक मृतदेह आढळले. बचावकार्याचा शेवटचा टप्पा अजून सुरू आहे." मुख्यमंत्री रेवंथ रेड्डी आज घटनास्थळी भेट देणार आहेत.

तेलंगणातील संगारेड्डी जिल्ह्यात सोमवारी सकाळी ही घटना घडली. मेदक येथील पसामैलाराम फेज-१ येथील सिगाची नावाच्या औषधी कंपनीतील भट्टीत स्फोटात होऊन आग लागली. राज्याचे आरोग्यमंत्री दामोदर राजनरसिंह यांनी सांगितले, की घटनेच्या वेळी कारखान्यात सुमारे ९० कर्मचारी होते. "स्फोटामुळे संपूर्ण औद्योगिक शेड उद्ध्वस्त झाले. स्फोटाचा जोर इतका प्रचंड होता, की काही कर्मचारी हवेत उडाले आणि सुमारे १०० मीटर दूर पडले," असे त्यांनी कर्मचाऱ्यांचा हवाला देऊन सांगितले.

नेमके काय घडले 
तेलंगणाच्या अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांच्या मते, हैदराबाद येथून काही अंतरावर असलेल्या पसामैलाराम फेज-१ येथील एका औषधी रासायनिक कंपनीत आज सकाळी नऊच्या सुमारास भीषण स्फोट झाला. या स्फोटाने परिसर हादरला. दूरपर्यंत आगीचे लोळ आणि धुराचे लोट पाहवयास मिळाले. या स्फोटाने परिसरात एकच घबराट पसरली आणि लोकांची पळापळ झाली. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर अग्निशमन दलाचे अकरा बंब घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी रुग्णवाहिकांना पाचारण केल्याने जखमींना तातडीने रुग्णालयात नेता आले. 

सध्या २६ जणांवर रुग्णालयात उपचार सुरू असल्याचे सांगण्यात आले. स्थानिक नागरिकांच्या मते, घटनेच्या वेळी अनेक कर्मचारी भट्टीजवळ काम करत होते. मात्र भडका उडताच आग कारखान्यात पसरली. कारखान्यात उत्तर प्रदेश आणि ओडिशासह अनेक राज्यांतील कर्मचारी काम करत होते. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या घटनेबद्धल शोक व्यक्त केला असून पंतप्रधान राष्ट्रीय सहायतानिधीतून मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी दोन लाख रुपये आणि जखमींना ५० हजार रुपये मदत देण्याची घोषणा केली. मुख्यमंत्री रेवंथ रेड्डी यांनीही मदतीबाबत सूचना दिल्या आहेत.