पन्हाळगड व परिसरातील गाव, पेठांबरोबरच तालुक्यातील छोट्या-मोठ्या गावांत हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतीक असलेल्या मोहरमनिमित्त पीरपंजांची प्रतिष्ठापनेने सुरुवात झाली. सर्वत्र भक्तिमय वातावरण पसरले आहे.
येथे असलेल्या हजरत पीर शहादुद्दीन दर्गामध्ये हसन व हुसेन पंजांची प्रतिष्ठापना केली आहे. तसेच नाल्या हैदर, बाराईमाम येथेही गवंडी, कासे, तर हैदर मशीद येथे गारदी, आगा, बाजीप्रभू पुतळा येथील कांबळे, मोकाशी मशिदीत हुसेन या पंजांची विधीवत प्रतिष्ठापना केली आहे.
परिसरातील पावनगड, मंगळवारपेठ, सोमवारपेठ, आपटी, रविवारपेठ, नेवापूर, रामापूर येथेही, तसेच धबधबेवाडी, हरपवडे, वेतवडेपैकी मुसलमानवाडी, माले, कोडोली, कोतोली आदी ठिकाणी पीरपंजांची प्रतिष्ठापना केली आहे. पंजे दर्शनसाठी खुले केले आहेत. गुरुवारी पहिल्या पंजे भेटीचा कार्यक्रम होणार आहे. त्यानंतर शनिवारी खत्तलरात्र व रविवारी दफन विधी होणार आहे.
आपटी, मंगळवारपेठ, रामापूर, गुरुवारपेठ पंजांबरोबर कोल्हापुरातील दिलबहार मंडळाचा पंजा, बाबूजमाल तालीम मंडळाचा पंजा, घिसाड गल्लीचा पंजा असे जिल्ह्यांतील विविध गावांतील पंजे भेटीसाठी पन्हाळ्यात दाखल होतात. दफन विधीनंतर मंगळवारी जियारत विधीचा कार्यक्रम होऊन मोहरमची सांगता होणार असल्याची माहिती दर्गा ट्रस्टी अब्दुल सत्तार मुजावर यांनी दिली.