सुहैल सईद : बांदीपोरा ते बॉलीवुडपर्यंतचा संघर्षमय प्रवास

Story by  आवाज़ मराठी | Published by  Fazal Pathan • 4 h ago
 सुहैल  सईद
 सुहैल सईद

 

दानिश अली

बॉलिवूडच्या चकचकीत दुनियेत सुहैल सईद लोन आपल्या अनोख्या कथाकथनाने स्वतःची जागा निर्माण करत आहे. काश्मीरमधील बांदीपोरात जन्मलेल्या सुहैलने संघर्षमय बालपणातून बॉलिवूड निर्माता आणि अभिनेत्यापर्यंतचा प्रेरणादायी प्रवास केला आहे. त्याच्या कथेत वेदना, देशभक्ती आणि सकारात्मक बदलाची ताकद आहे. १९९४ मध्ये वयाच्या १२व्या वर्षी हिजबुल मुजाहिद्दीनच्या दहशतवाद्यांनी सुहैलच्या वडिलांचे अपहरण केले होते. तेव्हा त्याच्या कुटुंबाला मोठ्या संकटाला सामोरे जावे लागले होते. चार दिवसांच्या त्रासदायक कालावधीनंतर, रक्ताची मागणी आणि कुटुंबातील महिलांच्या सन्मानाला धोका निर्माण झाला. सुहैल म्हणतो, “हा भयंकर अनुभव आयुष्यभर माझ्या सोबत राहणार आहे. ही भीती, असहायता आणि दहशत जी माणसाचे मन उद्ध्वस्त करते. वडील परत आले, पण शारीरिक आणि मानसिक जखमा कायम राहिल्या." सुहैलने या वेदनेचा उपयोग रचनात्मक कार्यासाठी केला.

सिनेमातून सैनिकांचा सन्मान

मुंबईत स्थायिक झालेला सुहैल ताहा फिल्म इंटरनॅशनलशी जोडला गेला आहे. तो आपली सर्जनशीलता सैनिकांच्या बलिदानाला सन्मान देण्यासाठी वापरतो. त्याचा महत्त्वाचा प्रकल्प ‘द उप फाइल्स’ सैनिकांचे मानवी चित्रण करतो, ज्यात युद्धाचा उदोउदो न करता त्यांच्या त्यागाला मानवंदना दिली जाते. तो म्हणतो “सैनिकही माणसे आहेत, त्यांचे कुटुंब, स्वप्ने आणि भीती असते. त्यांच्या कथा पडद्यावर यायला हव्यात.” तो म्हणतो. याशिवाय, त्याने ‘अ मिलियन डॉलर टुरिस्ट’ या इंग्रजी चित्रपटात अभिनय केला, जो जम्मू-काश्मीरच्या पार्श्वभूमीवर लंडनच्या कलाकारांसह चित्रित झाला. या चित्रपटातून त्याने काश्मीरच्या कथा जागतिक स्तरावर नेण्याचा प्रयत्न केला. सुहैलचा सध्याचा प्रकल्प राष्ट्रीय रायफल्सवर केंद्रित आहे. हा प्रकल्प काश्मीरमधील दहशतवादविरोधी लढ्यात महत्त्वाची भूमिका बजावते. याविषयी तो सांगतो, "त्यांचे शौर्य आणि योगदानाला सिनेमातून सलाम करायचा आहे."

 

गोल्डन गुबिल पुरस्कार आणि काश्मिरी ओळख

सुहैलच्या कार्याची दखल घेतली गेली असून याचवर्षी त्याला सिने अँड टीव्ही एडी प्रोडक्शन एक्झिक्युटिव्ह गिल्डने गोल्डन गुबिल पुरस्कार देऊन सन्मानित केले. काश्मिरी व्यक्तीला मिळालेला हा पहिला पुरस्कार आहे. हा पुरस्कार त्याच्या सिनेमातील अनोख्या दृष्टिकोन आणि राष्ट्रीय एकतेच्या प्रयत्नांसाठी आहे. सुहैल आपल्या काश्मिरी ओळखीशी घट्ट जोडलेला आहे, पण त्याची दृष्टी सर्व भारतीयांसाठी आहे. तो काश्मीरच्या वास्तवाला सिनेमातून समजावून सांगण्याचा प्रयत्न करतो. त्याच्या चित्रपटांमधून तो दहशतवादाविरुद्ध लढणाऱ्या सैनिकांचे बलिदान आणि काश्मिरी लोकांचे अनुभव यांच्यातील दुवा बांधतो.

सुहैलचे कार्य केवळ कथाकथनापुरते मर्यादित नाही. तो तरुण काश्मिरींना सर्जनशीलतेकडे वळण्याची प्रेरणा देतो. “जिथे बंदुकीने भविष्य ठरायचे, तिथे कथांनी सत्य, सहानुभूती आणि बदल घडवावेत,” असं तो म्हणतो. त्याच्या चित्रपटांमधून तो काश्मीरच्या सौंदर्य आणि संघर्षांना एकत्र आणतो, ज्यामुळे स्थानिक तरुणांना स्वप्ने पाहण्याचे बळ मिळते. ताहा फिल्म इंटरनॅशनलद्वारे त्याने बांदीपोरातील फैसल शेखसारख्या नवोदितांना संधी दिली, ज्याने ‘पुष्पा’ चित्रपटाच्या दृश्याची नक्कल करून ३.३ कोटी व्ह्यूज मिळवले आणि बॉलिवूडमध्ये पदार्पण केले.

सुहैल सईद लोनचे कार्य काश्मीरच्या तरुणांसाठी प्रेरणादायी आहे. काश्मीरला नेहमीच संघर्षाशी जोडले जाते, परंतु सुहैलने सिनेमातून त्याचे सौंदर्य आणि सत्य जगापुढे आणले. त्याच्या चित्रपटांमधून राष्ट्रीय रायफल्ससारख्या संस्थांचे योगदान आणि काश्मिरी जनतेच्या भावना यांचा समतोल साधला जातो. त्याच्या गोल्डन गुबिल पुरस्काराने काश्मिरी प्रतिभेला जागतिक मान्यता मिळाली. सुहैलच्या कार्याने काश्मीरच्या सांस्कृतिक वारशाला नवे आयाम दिले, आणि त्याच्या चित्रपटांनी शांतता आणि एकतेचा संदेश पसरवला. 


'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  -

Awaz Marathi WhatsApp Group 
Awaz Marathi Facebook Page

 

Awaz Marathi Twitter