दानिश अली
यश म्हणजे केवळ यशस्वी होणे नव्हे, तर मार्गातील अडथळे पार करणे. गुलाम नबी तंत्रे यांच्या जीवनकथेत हा विचार खऱ्या अर्थाने उतरला आहे. शिक्षणतज्ज्ञ, क्रीडाप्रेमी आणि समाजसेवक असलेल्या तंत्रे यांनी मोठे यश मिळवले.
तंत्रे यांचे बालपण साधेपणा, प्रामाणिकपणा आणि सेवाभावात गेले. आयथमुल्ला येथे प्राथमिक शिक्षण आणि बांदीपोरात उच्च माध्यमिक शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर सोपोर येथून त्यांनी मानविकी शाखेत पदवी मिळवली.
पुढे काश्मीर विद्यापीठातून व्यवस्थापनात पदव्युत्तर डिप्लोमा केला. यामुळे त्यांच्या व्यावसायिक प्रवासाला दिशा मिळाली.
वयाच्या २६व्या वर्षी तंत्रे यांनी सरकारी कंत्राटदार म्हणून काम सुरू केले. २००३ पर्यंत त्यांनी हा व्यवसाय केला. पण त्यांच्या मनात नेहमीच शिक्षण आणि तरुणांच्या विकासाची ओढ होती.
या ओढीला साद घालत त्यांनी बांदीपोरात बी.एड. महाविद्यालय सुरू केले. हा त्यांच्या आयुष्यातील आणि अनेक विद्यार्थ्यांच्या जीवनातील टर्निंग पॉइंट होता. हे महाविद्यालय फक्त पदवी देणारे नव्हते. उत्तर काश्मीर आणि आसपासच्या भागातील शेकडो विद्यार्थ्यांना कौशल्यं आणि आत्मविश्वास मिळाला. यामुळे ते स्वावलंबी बनले.
तंत्रे यांचा जन्म बांदीपोरातील आजार या खेड्यात सामान्य कुटुंबात झाला. पण त्यांनी जम्मू-काश्मीरच्या शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रात सन्मानाचं स्थान मिळवले. संपूर्ण विकासावर विश्वास ठेवणारे तंत्रे यांनी खेळांमध्येही रस घेतला. २०१४ मध्ये ते भारतीय मार्शल आर्ट्स संघाचा भाग होते. त्यांनी इराणमधील आंतरराष्ट्रीय स्पर्धेत देशाचे प्रतिनिधित्व केले.
खेळातील त्यांच्या उत्साहामुळे त्यांनी नेतृत्व मिळवले. ते किकबॉक्सिंग फेडरेशन ऑफ इंडियाचे वरिष्ठ उपाध्यक्ष आणि जम्मू-काश्मीर रग्बी असोसिएशनचे राज्य उपाध्यक्ष बनले. त्यांनी बांदीपोरात अनेक राष्ट्रीय स्तरावरील क्रीडा स्पर्धांचे आयोजन केले. बाहेरून येणाऱ्या खेळाडूंसाठी निवासाची व्यवस्थाही केली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली तजमुल इस्लाम या तरुण किकबॉक्सिंगपटूने जागतिक स्तरावर नाव कमावले.
२०१५ मध्ये तंत्रे यांनी जम्मूच्या चौवधी येथे दून इंटरनॅशनल स्कूल सुरू केले. आधुनिक शिक्षण आणि भारतीय मूल्यांना जोडण्याचे त्यांचे स्वप्न होते. आज हे स्कूल परिसरातील अग्रगण्य शैक्षणिक संस्थांपैकी एक आहे. स्कूलचे अध्यक्ष म्हणून तंत्रे यांनी केवळ अभ्यासापुरते शिक्षण मर्यादित ठेवलं नाही. तर सर्वसमावेशक वर्ग, मानसिक आरोग्य, प्रदूषणमुक्त वातावरण आणि नाविन्यपूर्ण शिक्षणाची जागा यावर त्यांनी भर दिला. दून इंटरनॅशनल स्कूलमधून दयाळू आणि सक्षम नागरिक घडवण्याचे त्यांचे स्वप्न आहे.
तंत्रे यांनी ‘आवाज-द व्हॉइस’ला सांगितले की, “आम्हाला फक्त स्कूल नव्हे, तर माणुसकी आणि मूल्ये एकाच छताखाली येणारी जागा बनवायची होती.”
तंत्रे यांच्या कार्याचा अनेकांनी सन्मान केला. त्यांना राष्ट्रीय गौरव पुरस्कार, आंतरराष्ट्रीय शिक्षण आणि नेतृत्व पुरस्कार, तसेच यूएईमधील भारतीय राजदूतांनी दिलेला सायबर मीडिया ग्लोबल अचिव्हर्स पुरस्कारही मिळाला आहे. एवढेच नाही तर जम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्र्यांनीही त्यांच्या शैक्षणिक योगदानाचा गौरव केला.
२०२३ मध्ये युनिव्हर्सिटी ऑफ साउथ अमेरिकेने त्यांना साहित्यातील मानद डॉक्टरेट पदवी प्रदान केली. शिक्षण आणि समाजसेवेतील त्यांच्या कार्यासाठी ही दुर्मिळ मान्यता मिळाली. कोविड-19 महामारीत तंत्रे यांनी बांदीपोरात जिल्हा प्रशासनाला साथ दिली. गरजूंना आवश्यक मदत पुरवली. काश्मीरमधील भयंकर पूरपटातही त्यांनी मदतकार्य केले.
पुरस्कार मिळाले तरी तंत्रे आपल्या मूळ गावाशी जोडलेले राहिले. आजार गावातील गरजू कुटुंबांना ते आधार देतात. दुर्गम भागातील तरुणांना मार्गदर्शन करतात. दून इंटरनॅशनल स्कूलमधून शिक्षण क्षेत्रात नवनवीन प्रयोग करतात. तंत्रे यांचे जीवन फक्त वैयक्तिक यशाची गोष्ट नाही. विश्वास, हेतू आणि कृती यांच्या एकत्रित परिणामाने समाजात बदल घडवता येतो, याचा तो पुरावा आहे.
जम्मू-काश्मीर शिक्षण आणि संधींद्वारे उज्ज्वल भविष्य घडवण्याचा प्रयत्न करत आहे. गुलाम नबी तंत्रे यांचा प्रवास यात एक प्रेरणादायी उदाहरण आहे. प्रत्येक स्वप्न पाहणारा विद्यार्थी, ठामपणे उभा राहणारा शिक्षक आणि दून इंटरनॅशनल स्कूलमध्ये आशेने पाऊल टाकणारे प्रत्येक मूल यात तंत्रे यांचा आत्मा प्रतिबिंबित होतो.