दानिश अली
बांदीपोराची १९ वर्षीय सिरत तारिकने आपल्या कलेने काश्मिरी संस्कृतीला जागतिक व्यासपीठावर नेऊन ठेवले आहे. तिने दोन दिवसांत १०६ चित्रे रंगवून इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये नाव कोरले आहे. आज तिची कला पॅरिस, दुबई, इस्तंबूल आणि क्वालालंपूर येथील प्रदर्शनांमुळे जगभरात प्रसिद्ध आहे. क्रिस्टीज आणि सॉथबीजसारख्या नामांकित लिलावगृहांनी तिच्या कलाकृतींवर लक्ष ठेवले आहे. सिरतची कहाणी कलेतून व्यक्त होणाऱ्या काश्मिरी ओळखीची आणि सामाजिक बदलाची आहे.
कलेचा प्रवास आणि प्रेरणा
सिरतचा कलेचा प्रवास शाळेत सुरू झाला. या विषयी ती सांगते, "शाळेच्या सुट्टीत मी फुले आणि काही चित्र रेखाटायचे. पण माझी चित्रे फक्त रेखाटन नव्हती त्या प्रत्येक चित्रामागे माझ्या मनातली न बोललेली कथा असायची. माझ्या कामासाठी आईने घरातील एका कोपऱ्यात स्टुडिओ बनवला होता. माझ्यावर तिचा पूर्ण विश्वास होता. तिच्या पाठिंब्यामुळेच मला चित्रकेलेमध्ये काही तरी करण्याची ताकद मिळाली." कोविड-१९ च्या लॉकडाऊनने तिला कलेत अधिक रमण्याची संधी दिली. तिने कॅलिग्राफी, तैलरंग आणि जलरंग यांचा प्रयोग केला.
विश्वविक्रम आणि जागतिक ओळख
२०२३ मध्ये सिरतने दोन दिवसांत १०६ चित्रे रंगवून इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये स्थान मिळवले. अशी चमकदार करणारी ती काश्मीरमधील पहिली मुलगी ठरली आहे. यानंतर तिच्या कलेने सर्वांचे लक्ष वेधले. २०२७ मध्ये पॅरिसमधील “व्हिस्पर्स ऑफ द व्हॅली” या तिच्या एकल प्रदर्शनाने समीक्षकांची प्रशंसा मिळवली. फ्रेंच समीक्षक पियरे लॉरेन यांनी तिच्या कलेला 'मौन आणि रंग, वेदना आणि शांती यांच्यातील दुवा' असे संबोधले. सिरतची चित्रे काश्मिरी परंपरा आणि आधुनिक अमूर्त अभिव्यक्ती यांचा संगम दाखवतात. ओळख, स्त्रीत्व, संघर्ष आणि आपलेपणा या थीम्स तिच्या कलेतून दिसतात. तिच्या चित्रांनी लंडन, दोहा, दिल्ली आणि टोकियो येथील खासगी संग्रहात स्थान मिळवले आहे.
सिरतने आपले यश सामायिक करण्यासाठी आर्टराइज काश्मीर ही स्वयंसेवी संस्था स्थापन केली आहे. ही संस्था बांदीपोर, श्रीनगर, अनंतनाग आणि गुरेझ येथे ५० हून अधिक कार्यशाळा घेऊन ५०० पेक्षा जास्त तरुणांना, विशेषतः मुलींना, कला शिक्षण देत आहे. याविषयी ती म्हणते, “कला ही फक्त ब्रश फिरवण्यापूरती मर्यादित नाही. या संस्थेच्या माध्यमातून मुलींना, त्यांच्या कथांना आणि कलेला महत्त्व आहे, असा आत्मविश्वास देण्याचा प्रयत्न केला जातो.” या कार्यशाळांमुळे अनेक तरुणींनी चित्रकलेत करिअर निवडले आहे. काहींनी महाविद्यालयात कला क्षेत्रात प्रवेश घेतला असून काही विद्यार्थी स्वतंत्र कलाकार म्हणून काम करत आहेत.
२०२४ मध्ये सिरतला राष्ट्रीय युवा आयकॉन पुरस्कार मिळाला आहे. यावर्षी तिने सोल येथील युनेस्को क्रिएटिव्ह सिटीज फोरममध्ये 'आर्ट अॅज रेझिस्टन्स अँड रिन्यूअल' या विषयावर भाषण केले. तिच्या या भाषणाला उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडाटासह प्रतिसाद दिला. तिच्या कलेने आणि सामाजिक कार्याने तिला जागतिक स्तरावर ओळख मिळवून दिली. सध्या ती 'बियॉन्ड द ब्रश' या आत्मचरित्रावर काम करत आहे. यामध्ये तिच्या निवडक कलाकृती, वैयक्तिक निबंध आणि संघर्षमय परिसरात कलाकार म्हणून वाढण्याचे अनुभव असतील.
सिरतने कधीही बांदीपूर सोडले नाही. ती म्हणते, “बांदीपूरचे डोंगर फक्त निसर्ग नाहीत, ते माझी स्मृती, ओळख आणि प्रेरणा आहेत." सिरत तिच्या स्टुडिओतून विद्यार्थ्यांना चित्रकलेचे मार्गदर्शन करते. सध्या ती जम्मूच्या स्थानिक प्रशासनाच्या सहकार्याने काश्मीरच्या पहिल्या समकालीन कला संग्रहालयाचे स्वप्न साकारत आहे. याविषयी ती म्हणते, "हे संग्रहालय माझ्यासाठी नाही. ते प्रत्येक त्या कलाकारासाठी आहे. हे संग्रहालय बांदीपोरात लवकर उभे राहील आणि याठिकानच्या कलाकारांना व्यासपीठ मिळवून देईल."
सिरत तारिक यांचे कार्य काश्मीरच्या तरुणांसाठी प्रेरणादायी आहे. काश्मीरला नेहमीच संघर्षाशी जोडले जाते, परंतु सिरतने आपल्या कलेने काश्मिरी संस्कृतीची सौंदर्यपूर्ण बाजू जगासमोर आणली आहे. तिच्या कलेत काश्मिरी पागोटे, कांगडी आणि शालीसारखे पारंपरिक घटक आधुनिक शैलीत मिसळलेले दिसतात, असे कला समीक्षक सांगतात. कला ही केवळ रंग आणि कॅनव्हास नाही, तर ती ओळख आणि स्वप्नांचा प्रवासही असू शकते हे सिरतने दाखवले आहे. ती म्हणते, "कलेने मला एक ओळख दिली. आता मी इतरांना त्यांची ओळख शोधण्यासाठी जागा निर्माण करू इच्छिते.”