वजाहत फारूक भट : काश्मीरच्या भविष्याची क्रांतिकारी चळवळ

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 1 d ago
वजाहत फारूक भट
वजाहत फारूक भट

 

दानिश अली 
 
काश्मीरच्या हिंसक निषेधाच्या भोवऱ्यात अडकलेला वजाहत फारूक भट आज बदलाचा प्रतीक बनला आहे. शीरीच्या अरुंद गल्ल्यांमध्ये दगडफेक करणारा हा तरुण आता खोऱ्यातील तरुणांच्या सक्षमीकरणासाठी व्यासपीठ उभारत आहे. वजाहतचा प्रवास अपवादात्मक नाही तर क्रांतिकारी आहे.

उत्तर काश्मीरच्या बारामुल्ला जिल्ह्यातील शीरी गावात सर्वसामान्य कुटुंबात वजाहतचा जन्म झाला. निराश तरुणांच्या पिढीत त्याचा समावेश होता. संघर्ष आणि अराजकाकडे तो ओढला गेला. आज तो ‘सेव्ह यूथ सेव्ह फ्युचर’ (एसवायएसएफ) या स्थानिक संस्थेचा संस्थापक आहे. या संस्थेद्वारे अनेक उपक्रम राबवले जातात. संवाद, खेळ, शिक्षण, कट्टरतावादमुक्ती आणि जागरूकता कार्यक्रमांद्वारे हजारो काश्मिरी तरुणांचे आयुष्य बदलले आहे. काश्मीरसाठी शाश्वत आणि शांतमय भविष्य घडवणे हेच त्याचे ध्येय आहे.
 

संघर्षमय बालपण
काश्मीरमधील राजकीय अस्थिरता आणि वारंवार बंदमुळे वजाहतचे बालपण संघर्षात गेले. प्रत्येक शुक्रवारी दगडफेक करणे त्याच्यासाठी किशोरवयात रीतच बनली होती. राग, हतबलता आणि चुकीच्या वीरतेचं प्रतीक म्हणून ही दगडफेक होती.

याविषयी बोलताना तो स्पष्टपणे म्हणतो, "त्यावेळी मी रस्त्यावर ओढला गेलो होतो. ओसामा बिन लादेनसारख्या व्यक्ती आम्हाला नायक वाटायच्या. हिंसाचार आम्हाला दृश्यमान करतोय असे वाटायचे. माझ्या परिसरात सुरक्षा दलांना भिडणाऱ्यांबद्दल आदराने बोलले जायचे. मी त्यापैकी एक होतो.”

परंतु या रागाच्या मागे कसलीतरी मोठी पोकळी होती. संधीचा अभाव, बाह्य जगाची ओळख नसणे आणि निराशेची भावना यांनी ती पोकळी निर्माण केली. बारामुल्ला येथील शासकीय महाविद्यालयात बीए करताना वजाहतने काही काळ राष्ट्रीय छात्र सेनेत (एनसीसी) प्रवेश घेतला. त्यामुळे त्याचा दृष्टिकोन बदलायला सुरुवात झाली.

बदलाची ठिणगी
एनसीसी शिबिरात नागरोटाला भेट देणे वजाहतसाठी निर्णायक ठरले. “मी इतर राज्यांतील लोकांशी चर्चा केली. त्यांनी माझं ऐकलं. त्या क्षणाने माझ्यात बदलाचा पहिला बीज रुजवला. हिंसा हाच एकमेव मार्ग नाही, असं मला वाटायला लागलं.”

२०१७ मध्ये बारामुल्ला येथील एका क्रीडा कार्यक्रमात त्याची भेट एसएसपी इम्तियाज हुसेन मीर यांच्याशी झाली. हा आणखी एक टर्निंग पॉइंट होता. वजाहत म्हणतो, “ते अधिकारीसारखे वागले नाहीत. त्यांनी आमच्यासोबत मार्गदर्शकासारखा संवाद साधला. त्या भेटीचा माझ्यावर खोल परिणाम झाला.”

या अनुभवांनी प्रेरित होऊन वजाहतने आपलं स्वप्न प्रत्यक्षात उतरवण्याचे ठरवले. काश्मीरच्या तरुणांसाठी शांत आणि आशादायी भविष्य घडवायचे ठरवले.

 
एसवायएसएफचा जन्म: उपेक्षितांसाठी एक अभियान
कोणत्याही आर्थिक पाठबळ, राजकीय संबंध किंवा संस्थात्मक आधाराशिवाय २०१८ मध्ये ‘सेव्ह यूथ सेव्ह फ्युचर’ची स्थापना झाली. ते सांगतात “तेव्हा लोक मला वेडा म्हणाले. मला त्रास होईल, असं सांगण्यात आलं. परंतु हितचिंतक आणि मित्रांकडून प्रोत्साहनही मिळालं.”

संस्थेचा पहिला मोठा कार्यक्रम ‘द यंग काश्मीर: द डायलॉग विदिन’ नावाने झाला. यामध्ये ४०० हून अधिक लोक सहभागी झाले होते. तक्रारी आणि प्रशासन यांच्यात संवादाचा हा एक दुर्मीळ मंच होता. इथूनच काश्मीर खोऱ्यात नव्या संवादाची सुरुवात झाली.

हळूहळू एसवायएसएफ तरुणांच्या सहभागाचे व्यासपीठ बनले. क्रीडा स्पर्धा, मानसिक स्वास्थ्य सत्रे, सांस्कृतिक आदानप्रदान आणि शांतता निर्माण कार्यक्रम आयोजित झाले. अनेकांसाठी वजाहत रस्त्यावरील निषेधकर्ता ते मार्गदर्शक आणि नेता बनला.

वजाहत वाढती लोकप्रियता पुढे जाऊन धोक्याचे कारणही ठरली. २०१८ मध्ये काश्मीर फाइट नावाच्या गूढ ब्लॉगने त्याला धमकी दिली. हा ब्लॉग संयम आणि सुधारणांचा आवाज दडपण्यासाठी ओळखला जायचा. याविषयी बोलताना तो म्हणतो, “मला माझ्या जीवाची भीती वाटली. परंतु एसएसपी इम्तियाज यांनी मला एक वाक्य सांगितलं, जे मी कधीच विसरणार नाही. त्यांचे वाक्य असे होते की, ‘जोपर्यंत नशिबात लिहिलेले नाही तोपर्यंत कोणीही तुम्हाला मारू शकत नाही.' या वाक्याने मला बळ मिळालं.”

पुलवामापासून ब्रुसेल्सपर्यंत
२०२० मध्ये युरोपियन युनियनचं लक्ष एसवायएसएफकडे गेलं. त्यांनी काश्मिरी तरुणांना कट्टरतावादापासून दूर नेण्याच्या शांतता उपक्रमाला पाठिंबा दिला. वजाहत आणि त्याच्या टीमने पुलवामा, शोपियां, अनंतनाग आणि कुपवाडा या संघर्षग्रस्त जिल्ह्यांत ६९ कार्यशाळा यशस्वीपणे घेतल्या.

जवाहरलाल नेहरू विद्यापीठाशी (जेएनयू) भागीदारीत एसवायएसएफने मोठा सांस्कृतिक आदानप्रदान कार्यक्रम आयोजित केला. यात १२० हून अधिक काश्मिरी विद्यार्थ्यांनी देशभरातील विद्यार्थ्यांशी संवाद साधला. याविषयी वजाहत अभिमानाने सांगतो, “त्यांनी आम्हाला शांततेचे दूत म्हटले.” 
 

बदलाची वाटचाल 
वजाहतने एसवायएसएफचा विस्तार करत लिंगभेदावर आधारित उपक्रम सुरू केले. २०२० मध्ये कार्यकर्त्या अनिका नझीर यांच्या नेतृत्वात महिलांसाठी स्वतंत्र शाखा सुरू झाली. यातून काश्मीरच्या पहिल्या महिला काश्मीर प्रीमियर लीग (केपीएल) स्पर्धेची सुरुवात झाली. परंपरागत रूढींच्या वातावरणात हे एक धाडसी आणि प्रतीकात्मक पाऊल होते. एसवायएसएफने यशस्वी महिलांचा सन्मान सुरू केला. लिंग समानतेवर चर्चा घडवली. महिलांच्या हक्कांसाठी सुरक्षित व्यासपीठ उपलब्ध करून दिले.

२०२१ पर्यंत संस्थेने सांस्कृतिक आणि आध्यात्मिक पुनरुज्जनावर लक्ष केंद्रित केले. काश्मिरियत, सूफीवाद आणि खोऱ्यातील शांतता व बहुधर्मी परंपरांवर परिसंवाद आयोजित झाले. मौलवी, इमाम आणि सूफी विद्वानांनी एकत्रित सांस्कृतिक ओळख पुन्हा जागवण्यात योगदान दिले.

आशावादी चळवळ
आज एसवायएसएफने काश्मीरच्या प्रत्येक भागात आपली उपस्थिती नोंदवली आहे. शेकडो समर्पित स्वयंसेवक, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय विचारगट, शैक्षणिक संस्था आणि नागरी समाज यांच्याशी सहकार्याने हा उपक्रम राबवला जात आहे.

आज वजाहतचा फोन क्वचितच शांत राहतो. कोणी तरुण समुपदेशनासाठी संपर्क साधतो, तर कोणी महाविद्यालय त्याला व्याख्यानासाठी बोलावतं. 

निष्कर्ष: वेदनेतून उद्दिष्टाकडे
वजाहत फारूक भटची कहाणी फक्त पश्चात्तापाची नाही. तर बदल, करुणा आणि सकारात्मक दृष्टी काय साध्य करू शकते, याची आठवण करून देते. शीरीच्या संघर्षग्रस्त रस्त्यांपासून जागतिक शांतता संवादापर्यंत त्याचं आयुष्य सिद्ध करतं की, बदल शक्य आहे आणि आवश्यकही.

वजाहत म्हणतो, “मी नेहमी सांगतो, काश्मीरच्या तरुणांना मृत्यूच्या गोष्टी सांगू नका. त्यांना आयुष्याच्या गोष्टी सांगा. ते काय बनू शकतात, त्या गोष्टी त्यांना सांगा. शांतता जिंकण्याचा हाच एकमेव मार्ग आहे.”

दशकांपासूनच्या अशांततेने विभाजित झालेल्या या प्रदेशात, वजाहत एक पूल बनला आहे. पिढ्या, विचारसरणी आणि शक्यता जोडणारा पूल. एकेकाळी दगडफेक करणारा हा तरुण आता शांतता प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्नात आहे. २०१८ पासून ‘सेव्ह यूथ सेव्ह फ्युचर’ने काश्मीरमधील दोन लाखांहून अधिक तरुणांपर्यंत पोहोचून संवाद, सक्षमीकरण आणि सातत्यपूर्ण समुदाय सहभागातून शांतता जोपासण्याचं कार्य चालू ठेवलं आहे.
 

'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  -

Awaz Marathi WhatsApp Group 
Awaz Marathi Facebook Page

Awaz Marathi Twitter