अनिसा नबी : प्रशासनातील 'वंडर वुमन'ने काश्मिरमधील क्रीडा क्षेत्राचा केला कायापालट

Story by  आवाज़ मराठी | Published by  Fazal Pathan • 20 h ago
अनिसा नबी
अनिसा नबी

 

 दानिश अली

अनिसा नबी २०१२-२ बॅचच्या जम्मू-काश्मीर प्रशासकीय सेवेतील (JKAS) अधिकारी, सध्या जम्मू-काश्मीर क्रीडा परिषदेच्या मुख्य क्रीडा अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. पण त्यांची कहाणी प्रशासकीय कार्यालयांपुरती मर्यादित नाही. कागदपत्रं, धोरणं आणि बैठकींच्या प्रशासकीय क्षेत्रात अनिसा यांनी प्रशासकीय काम आणि खेळाचा अनोखा संगम साधला आहे. उत्तम प्रशासक, खेळाडू, मार्गदर्शक आणि जम्मू-काश्मीरमधील महिलांच्या फिटनेसबाबत नवा दृष्टिकोन देणाऱ्या समाजसुधारक म्हणून आज अनिसा नबी यांची सर्वत्र ओळख आहे. त्यांचा इथपर्यंतचा प्रवास हा जिद्द, चिकाटी आणि प्रामाणिक कष्टाचे प्रतीक आहे.  

 
अनिसा यांनी नागरी सचिवालय, महसूल, राज्य कर, राष्ट्रीय ग्रामीण आजीविका अभियान आणि ग्रामीण विकास विभाग यासारख्या महत्त्वाच्या खात्यांमध्ये यशस्वी कामगिरी केली आहे. त्यांची प्रशासकीय क्षमता आणि गतिमानता यामुळे त्या ओळखल्या जातात. व्यस्त कारकीर्दीतही त्यांनी खेळाप्रती त्यांची आवड जोपासली आहे. प्रशासन आणि क्रीडा यांचं संतुलन त्या अचूक साधतात. 'आवाज-द व्हॉइस'शी बोलताना त्या म्हणतात, “प्रशासन आणि खेळ यापैकी एक गोष्ट मी निवडू शकत नाही. खेळातून मला शिस्त मिळाली आणि प्रशासकीय सेवेतून करुणा माझ्या खेळात आली. दोन्ही गोष्टी माझ्यासाठी महत्वाच्या आहेत." 

 
अनुभवी धावपटू असलेल्या  अनिसा  यांनी राज्य आणि राष्ट्रीय स्तरावरील अनेक लहान-मोठ्या शर्यतींमध्ये भाग घेतला आहे. त्यांनी राज्य मास्टर्स ऍथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये १०० मीटर आणि २०० मीटर शर्यतीत सुवर्णपदक, तर अखिल भारतीय मास्टर्स ऍथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये ८०० मीटर शर्यतीत रौप्यपदक मिळवलं आहे. त्या वेदांता दिल्ली हाफ मॅरेथॉन, टाटा मुंबई मॅरेथॉन आणि दुबई मॅरेथॉन यासारख्या जागतिक दर्जाच्या हाफ मॅरेथॉन्समध्ये यशस्वीपणे सहभागी झाल्या होत्या. या स्पर्धेमध्ये जगभरातील नामांकित खेळाडू सहभागी होत असतात. या शर्यती त्यांच्या समर्पण आणि ऍथलेटिक्समधील कौशल्याचं द्योतक आहेत.

 
अनिसा  सामाजिक कार्यातही अग्रेसर आहेत. त्या फिट इंडिया मूव्हमेंटच्या राजदूत असून, महिलांच्या आरोग्य, शिक्षण आणि सक्षमीकरणासाठी अनेक जागरूकता शर्यतींच्या प्रचारक आहेत. जम्मू-काश्मीरमध्ये सामाजिक आणि सांस्कृतिक अडथळ्यांमुळे महिलांचा क्रीडा सहभाग मर्यादित आहे. पण,  अनिसा  यांनी प्रत्यक्ष कृतीतून हे अडथळे दूर केले आहेत. त्यांनी स्थापन केलेली वंडरस वुमन कम्युनिटी ही महिलांच्या फिटनेससाठीच  प्रेरणादायी व्यासपीठ आहे. हे व्यासपीठ फिटनेस मार्गदर्शन, मानसिक आरोग्य जागरूकता आणि प्रेरक कहाण्या प्रदान करतं. यामुळे अनेक महिलांना विशेषतः प्रथमच क्रीडा क्षेत्रात येणाऱ्यांना प्रोत्साहन मिळतं. त्या सांगतात, “वंडरस वुमन ही केवळ फिटनेस समूह नाही, तर महिलांना एकमेकींना प्रोत्साहन देणारं, आंतरिक शक्ती शोधणारं आणि फिटनेसची नवी व्याख्या घडवणारं सुरक्षित व्यासपीठ आहे." 

 
जम्मू-काश्मीरच्या पिकलबॉल राजदूत म्हणून  अनिसा  यांनी या वेगाने वाढणाऱ्या रॅकेट खेळाला लोकप्रिय करण्यात मोलाचं योगदान दिलं आहे. त्या हिमालयातील ट्रेकिंग आणि समुदाय मॅरेथॉन्स आयोजित करत बहुआयामी फिटनेस उत्साही व्यक्तिमत्त्व दाखवतात. त्यांची ही ऊर्जा आणि नेतृत्व क्रीडा क्षेत्रात नवे आयाम उघडत आहे. मुख्य क्रीडा अधिकारी म्हणून त्या जम्मू-काश्मीरच्या क्रीडा भवितव्यास आकार देत आहेत. त्यांची प्रशासक आणि खेळाडू अशी दुहेरी ओळख क्रीडा पायाभूत सुविधा सुधारणे, खेळाडू कल्याण आणि विशेषतः महिला व तरुणांचा समावेश वाढवण्यासाठी संवेदनशीलतेने योगदान देते. त्या ग्रासरूट स्तरापासून आंतरराष्ट्रीय खेळांपर्यंत क्रीडा संधी वाढवण्यासाठी प्रयत्नशील आहेत.

अनिसा यांची कहाणी वैयक्तिक यशापुरती मर्यादित नाही तर इतरांना मोठी स्वप्नं पाहण्यासाठी प्रेरणा देणारी आहे. काश्मीरच्या सामाजिक आणि सांस्कृतिक उत्क्रांतीत  अनिसा  नबी फिटनेस, नेतृत्व आणि सार्वजनिक सेवेच्या एकत्रित प्रवासाचं प्रतीक आहेत. त्यांचं प्रत्येक पाऊल नव्या शक्यतांना उजागर करतं. यामुळे जम्मू-काश्मीरमधील महिला आणि तरुणांना प्रेरणा मिळते.  अनिसा  यांचा हा प्रवास केवळ त्यांचा नाही, तर एका नव्या, सक्षम आणि समावेशक काश्मीरचं भविष्य घडवण्याचा आहे.  

'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  -

Awaz Marathi WhatsApp Group 
Awaz Marathi Facebook Page

Awaz Marathi Twitter