जम्मू आणि काश्मीरमधील पहिल्या महिला राष्ट्रीय क्रिकेट प्रशिक्षक असूनही, सकीना अख्तर यांना स्वतःला सिद्ध करण्यासाठी एक दशक लागले. श्रीनगरमधील मुनावराबादच्या अरुंद गल्लीतून सुरू झालेला त्यांचा प्रवास राष्ट्रीय क्रिकेट प्रशिक्षकापर्यंत येऊन पोहोचला आहे.
करिअरच्या सुरुवातीला त्या काश्मीर विद्यापीठाच्या क्रिकेट मैदानावर एकट्या दिसायच्या. तिथे त्या एकमेव महिला होत्या. उदयोन्मुख क्रिकेटपटूंना प्रशिक्षण देताना त्या सामाजिक रूढींशी लढत होत्या. चिकाटी, जिद्द आणि खेळाप्रती असलेल्या अटळ निष्ठेने त्यांनी देशातील सर्वोत्तम राष्ट्रीय प्रशिक्षकांपैकी एक लौकिक मिळवला.
श्रीनगरमधील ४२ वर्षीय सकीना यांची कहाणी आहे अथक जिद्दीची आणि कधीही न विझणाऱ्या प्रज्वलित ज्योतीची. किशोरवयात मुलांसोबत क्रिकेटखेळणे त्यांना सामाजिक दबावामुळे सोडावे लागले. आज त्या भारतीय महिला क्रिकेटचे भविष्य घडवत आहेत.
सकीना यांचा प्रवास मुनावराबादच्या छोट्याशा गल्लीतून सुरू झाला. तिथे त्या पुरुष क्रिकेट संघातील एकमेव महिला होत्या. "तिथेच मी बॅट फिरवायला, कॅच पकडायला आणि बाऊन्सरला तोंड द्यायला शिकले. आयुष्यानेही मला अनेक बाऊन्सर टाकले," असे त्यांनी आवाज-द व्हॉइसला सांगितले.
सकीना यांना १९९८ मध्ये मोठी संधी मिळाली. दिल्लीत त्यांनी पहिला अंडर-१९ राष्ट्रीय सामना खेळला. तिथे त्या मालिकेच्या सर्वोत्कृष्ट खेळाडू ठरल्या. परंतु यशाच्या उंबरठ्यावर असतानाच कुटुंब आणि समाजाच्या दबावाने त्यांनामागे हटावे लागले. तरीही त्यांनी क्रिकेट पूर्णपणे सोडला नाही. तर त्या प्रशिक्षणाकडे वळल्या.
सुरुवातीला संस्थात्मक पाठबळ कमी होते. तरीही सकीना यांनी औपचारिक प्रशिक्षण घेतले. त्यांनी तरुण खेळाडूंना आपले ज्ञान द्यायला सुरुवात केली. हळूहळू त्यांच्या प्रयत्नांना यश मिळाले आणि काश्मीर विद्यापीठाने प्रशिक्षक म्हणून त्यांना मान्यता दिली. २०१७ मध्ये विद्यापीठाने त्यांना क्रिकेट प्रशिक्षक म्हणून नेमले. पुढील आठ वर्षे त्या मुले आणि मुलींना प्रशिक्षण देत राहिल्या. आज त्यांच्या कठोर परिश्रमाची आणि मार्गदर्शनाची ख्याती सर्वत्र पसरली आहे.
सकीना म्हणतात, "माझ्याकडे येणाऱ्या अनेक मुलींना खेळातलं आपलं स्थान माहीत नव्हतं. तेव्हा मी त्यांना सांगायचे माझ्याकडे बघा. मी त्यांना आत्मविश्वास द्यायचे की, मी करू शकते, तर तुम्हीही करू शकता."
सकीना यांनी अनेक अंडर-१९ राज्यस्तरीय खेळाडूंना प्रशिक्षण दिले आहे. त्यापैकी काही आता प्रादेशिक संघात आहेत. तर काही राष्ट्रीय निवड समितीपर्यंत पोहोचले आहेत.
यावर्षी सकीना यांच्या सातत्यपूर्ण योगदानाला राष्ट्रीय स्तरावर मान्यता मिळाली. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने त्यांना अंडर-१९ महिला संघाची सहायक प्रशिक्षक म्हणून नेमले. त्या आता वरिष्ठ महिला राष्ट्रीय संघाच्या प्रशिक्षण पथकात अधिकृतपणे सामील झाल्यात. जम्मू-काश्मीरमधील जनतेसाठी हा एक ऐतिहासिक क्षण आहे.
सकीना यांच्या या यशाने काश्मीर खोऱ्यात उत्साह निर्माण केला आहे. श्रीनगरमधील नव्या क्रिकेट अकादमींमध्ये आता मुलींसाठी खास सत्रे सुरू झाली आहेत. एकेकाळी मैदानावर एकटी असलेली मुलगी आता डझनभर मुलींना प्रेरणा देत आहे. याविषयी सकीना म्हणतात, "सुरुवातीला मला सांगितलं गेलं होतं, मुली क्रिकेट मैदानावर जात नसतात. आज तेच लोक त्यांच्या मुलींना माझ्याकडे प्रशिक्षणासाठी आणतात."
भविष्यात सकीना काश्मीरमधील मुलींसाठी निवासी क्रिकेट अकादमी स्थापन करण्याचे स्वप्न पाहत आहेत. त्या म्हणतात, "आम्हाला पायाभूत सुविधा, संधी आणि सर्वात महत्त्वाचा विश्वास हवाय. जर मी काही मुलींना हे देऊ शकले, तर माझा उद्देश पूर्ण होईल."
सकीना ‘बियॉन्ड द बाऊंड्री’ नावाचे आत्मचरित्र लिहिण्याच्या तयारीत आहेत. यात श्रीनगरच्या गल्लीपासून राष्ट्रीय क्रिकेट रंगमंचापर्यंतचा त्यांचा प्रवास असणार आहे. सकीना अख्तर केवळ प्रशिक्षक नाहीत, तर त्या उत्तम मार्गदर्शक आणि प्रेरणास्थान देखील आहेत. स्वप्ने कितीही दूर असली, तरी ती प्रत्यक्षात येऊ शकतात, याचा त्या जिवंत पुरावा आहेत.