जम्मू-काश्मीरमध्ये बदलांचे वारे आणणारे १० चेंजमेकर्स

Story by  आवाज़ मराठी | Published by  Fazal Pathan • 3 d ago
 जम्मू काश्मीरचे मुस्लिम चेंजमेकर्स
जम्मू काश्मीरचे मुस्लिम चेंजमेकर्स

 

गेली अनेक दशके अशांतता आणि राजकीय उलथापालथींनी व्यापलेल्या काश्मीर खोऱ्यातल्या दुर्गम भागातील जनतेची स्वप्ने अनेकदा अंधारात गुडूप होत असत. मात्र आता तिथे मूक क्रांतीचे वारे वाहत आहे. या भूमीवर काही व्यक्ती आपल्या ध्येयाने आणि कृतीने समाजाला नवे रूप देत आहेत. प्रसिद्धी झोतापासून दूर असलेल्या काही व्यक्ती सामाजिक बंधने तोडत, आव्हानांना सामोरे जात आपल्या कार्याने इतरांना प्रेरणा देत आहेत. ही मंडळी माणसे काश्मीरच्या भविष्याला आकार देत आहेत.

‘आवाज द व्हॉईस’च्या ‘चेंजमेकर्स’ या मालिकेतून पुढचे १० दिवस आम्ही जम्मू-काश्मीरमधील या १० चेंजमेकर्सच्या प्रेरणादायी कथा तुमच्यासमोर आणणार आहे.तत्पूर्वी या लेखातून त्यांच्या कार्याचा त्रोटक परिचय करून देत आहोत.

 सकीना अख्तर : क्रिकेटच्या मैदानावरील नवा इतिहास
मुनावराबादच्या गल्ल्यांमध्ये क्रिकेट खेळणारी एकमेव मुलगी ते भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रीय क्रिकेट प्रशिक्षकापर्यंतचा सकीना अख्तर यांचा प्रवास थक्क करणारा आहे. काश्मीरमध्ये खेळाडू महिलांना सामाजिक विरोधाचा सामना करावा लागतो. पण सकीना यांनी लिंगभेदाच्या भिंती तोडल्या. तिचा हा प्रवास धैर्य आणि परिवर्तनाची गाथा आहे.

 सिरत तारिक : कलेतून सशक्तीकरण
वयाच्या १९व्या वर्षी सिरत तारिकने आपल्या कलेच्या माध्यमातून सशक्तीकरणाचा आणि सांस्कृतिक पुनर्जागरणाचा मार्ग निवडला. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी गौरवलेली सिरत कला क्षेत्रात नव्या पिढीला, विशेषतः संघर्षग्रस्त भागातील तरुणींना, प्रेरणा देत आहे. तिच्या कार्याने अनेकांना स्वतःतील सामर्थ्य शोधण्याची दिशा मिळाली.

शबनम कौसर : शिक्षणातील दीपस्तंभ
संघर्षाच्या सावटाखालील बांदीपोऱ्यात शबनम कौसर यांनी शिक्षणाची ज्योत पेटवली. केवळ चार विद्यार्थ्यांपासून सुरू झालेली त्यांची आर्मी गुडविल स्कूल आज राष्ट्रीय स्तरावर मान्यता पावली आहे. शबनम यांचा प्रवास म्हणजे शिक्षण, दृष्टी आणि दृढनिश्चयाची कहाणी आहे.

सुहैल सईद लोन : सिनेमातून मांडली सत्यकथा
बांदीपोऱ्यात दहशतवादाच्या झळा सोसलेल्या सुहैल सईद लोन यांनी आपल्या वेदनांना सिनेमाच्या माध्यमातून व्यक्त केल्या. आज मुंबईच्या चित्रपटसृष्टीत कार्यरत असलेला सुहैल आपल्या सिनेमातून धैर्य, त्याग आणि देशभक्तीच्या कथा मांडतात. आपल्या वेदनाला त्याने आपल्या सकारात्मक सर्जनशीलतेत रूपांतरित केले आहे.

 सरवर बुलबुल: संगीतातून सांस्कृतिक वारसा
काश्मीरच्या आध्यात्मिक आणि सांस्कृतिक वारशाला सरवर बुलबुल संगीतातून जिवंत ठेवत आहे. रफाबाद येथील ‘बुलबुल अकादमी ऑफ परफॉर्मिंग आर्ट्स’च्या माध्यमातून ते काश्मिरी शास्त्रीय, सूफी आणि भक्ती संगीताचे प्रशिक्षण देतात. वंचित तरुणांना मार्गदर्शन करत ते  परंपरांचे संवर्धन करत आहे.

 इर्तिका अयूब: रग्बीच्या मैदानावर बदल
काश्मीरमधील सर्वात तरुण रग्बी डेव्हलपमेंट ऑफिसर इर्तिका अयूब रग्बीसारख्या पुरुषी वर्चस्व असलेल्या खेळात महिलांचा सहभाग वाढवत आहे. तिच्या या कार्याने काश्मिरी तरुणींमध्ये आत्मविश्वास आणि समानतेची भावना निर्माण होत आहे. खेळ हा सामाजिक बदलाचा मार्ग असू शकतो, याचे उत्तम उदाहरण म्हणजे इर्तिका अयूब यांचे कार्य.

अनिसा नबी: क्रीडा नेतृत्वाची नवी व्याख्या
जेकेएएस अधिकारी आणि मुख्य क्रीडा अधिकारी असलेल्या अनिसा नबी यांनी खेळ आणि सामाजिक कार्य यांची सांगड घातली आहे. मॅरेथॉन धावपटू आणि फिटनेसप्रेमी असलेली अनिसा या ‘वंडरस वुमन’ समूहाच्या  संस्थापक आहे. फिट इंडिया मोहिमेच्या राजदूत म्हणून त्या सर्वांना प्रेरणा देत आहेत.

गुलाम नबी तांत्रे: समुदायासाठी समर्पण
बांदीपोऱ्यात बी.एड. महाविद्यालय आणि जम्मूमध्ये डून इंटरनॅशनल स्कूल स्थापन करणारे गुलाम नबी तांत्रे यांनी समुदायाच्या सशक्तीकरणासाठी स्वतःला वाहून घेतले आहे. तजमुल इस्लामसारख्या खेळाडूंना मार्गदर्शन करत त्यांनी संकटात अडकलेल्या अनेक खेळाडूंना मदतीचा हात पुढे केला आहे. अनेक राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय मानसन्मान मिळवूनही त्यांचे पाय अजूनही जमिनीवरच आहेत. खरे नेतृत्व उद्देशातून तयार होते, संधीतून नव्हे याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे गुलाम नबी तांत्रे.

मोहम्मद हफीझ फुर्कानाबादी: शिक्षणातून समाजपरिवर्तन
मोहम्मद हफीझ फुर्कानाबादी यांनी शिक्षण आणि करुणेच्या माध्यमातून समाज बदलाचा वसा घेतला. मुलींच्या शिक्षणाला विरोध असूनही त्यांनी घरोघरी जाऊन लोकांना विचार बदलायला भाग पाडत समानतेचे बीज रोवले.  त्यांच्या धर्मादाय ट्रस्टने सर्व धर्मांच्या मुलांना मोफत शिक्षण आणि संसाधने उपब्लध करून दिली. त्यामुळे सामाजिक सौहार्दाला आणि ऐक्याला चालना मिळाली. 

वजाहत फारूक भट: अंधारातून प्रकाशाकडे
कधीकाळी दगडफेकीत सामील असणाऱ्या वजाहत फारूक भट याने आपले आयुष्य बदलले. २०१८ मध्ये एसएसपी इम्तियाझ हुसेन यांच्याशी झालेल्या भेटीने त्याला नवा दृष्टिकोन मिळाला. आज तो ‘जम्मू आणि काश्मीर सेव्ह यूथ सेव्ह फ्यूचर’ या संस्थेच्या माध्यमातून ३,०००हून अधिक तरुणांना कट्टरतावादाच्या मगरमिठीतून सोडवण्यासाठी प्रयत्नशील आहे.

जम्मू-काश्मीरमधील मूक क्रांतीचे प्रणेते
या चेंजमेकर्सच्या कथा वृत्तपत्रांच्या मथळ्यांत क्वचितच येतात, पण त्यांचा प्रभाव काश्मीर खोऱ्यामध्ये खोलवर पसरला आहे. धैर्य, सर्जनशीलता आणि दृढनिश्चयाने ते काश्मीरची नव्याने उभारणी करत आहेत. त्यांचे कार्य हे सिद्ध करते की सातत्य आणि सामर्थ्य यांच्या बळावर सर्वात आव्हानात्मक परिस्थितीतही बदल शक्य आहे, याचा पुरावा म्हणजे या चेंजमेकर्सचे कार्य. ‘आवाज द व्हॉईस’वर येत्या १० दिवसांत वाचा या प्रत्येक व्यक्तीच्या प्रेरणादायी कहाण्या सविस्तर.

'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  -

Awaz Marathi WhatsApp Group 
Awaz Marathi Facebook Page

Awaz Marathi Twitter