बॉलीवूडचा 'भाईजान' म्हणून ओळखला जाणारा सलमान खान नेहमीच आपल्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत राहिलेला आहे. करिअर जितकं यशस्वी, तितकंच प्रेमप्रकरणं आणि वादांनी भरलेलं त्याचं खासगी आयुष्य आजही लोकांच्या चर्चेचा विषय ठरतं. नुकत्याच एका शोमध्ये सहभागी होत सलमानने आपल्या लव्ह लाइफविषयी धक्कादायक कबुली दिली आहे.
सलमानने स्पष्टपणे सांगितलं की, "मी प्रेमप्रकरणांमध्ये अत्यंत अनलकी होतो. फक्त ३-४ मुलींशीच माझं रिलेशनशिप होतं, तेही अनेक वर्षं चाललेलं होतं. मी आजच्या पिढीसारखा सतत नवे संबंध ठेवणारा नाही." सलमानची ही कबुली जितकी स्पष्ट आहे, तितकीच ती अनेक जुन्या गोष्टींची आठवण करून देणारी आहे. सलमानने जरी आज ३-४ नात्यांचा उल्लेख केला असला तरी गेल्या काही दशकांत त्याचं नाव संगीता बिजलानी, सोमी अली, ऐश्वर्या राय, कतरिना कैफ, लूलिया वंतूर अशा अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं आहे. त्याने कधीच कोणाचं नाव जाहीर केलं नसलं, तरी त्याचे वाद आणि ब्रेकअप्स प्रसारमाध्यमांमध्ये गाजले.
त्यामुळे 'अनलकी' म्हणत स्वतःला दुःखी दाखवण्याचं हे प्रयत्न जरा उशिराचेच वाटत आहेत, असं अनेक नेटकरी म्हणाले. सलमान खाननं आपल्या वयाच्या ५९ व्या वर्षीही लग्न न करण्याचा निर्णय घेतला असला, तरी त्याच्या वैयक्तिक आयुष्यातील उलथापालथर्थीचं प्रतिबिंब आजही चर्चेत आहे.