मुंबई
मुंबईत मान्सूनचे उशिरा का होईना पण दमदार आगमन झाले असून, पहिल्याच पावसात शहराचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. बुधवारी सकाळी झालेल्या मुसळधार पावसामुळे सखल भागात पाणी साचल्याने रस्ते आणि रेल्वे वाहतुकीवर मोठा परिणाम झाला. काही भागात तर २४ तासांत ३०० मिमी पेक्षा जास्त पावसाची नोंद झाली आहे.
पावसाचा आढावा घेण्यासाठी महापौर रितू तावडे किंग्ज सर्कल येथील गांधी मार्केट भागात गेल्या असताना, एक धक्कादायक प्रकार घडला. यावेळी पालिकेचा एक सुपरवायझर उघड्या गटारात पडला. सुदैवाने त्याला तातडीने बाहेर काढण्यात आले, परंतु या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर वाऱ्याच्या वेगाने व्हायरल झाला आहे. यावरून विरोधकांनी सत्ताधारी भाजप-शिवसेना युतीवर निशाणा साधला आहे.
शिवसेना (UBT) आमदार आदित्य ठाकरे यांनी या परिस्थितीवरून सत्ताधाऱ्यांवर कडक टीका केली. "मुंबईची सेवा करण्याऐवजी सत्ताधारी दिल्लीच्या सेवेत व्यस्त आहेत," असा टोला त्यांनी लगावला. तर काँग्रेस खासदार वर्षा गायकवाड यांनी हा व्हिडिओ शेअर करत महापालिकेच्या भ्रष्टाचाराचा आरोप केला.
हवामान विभागाने (IMD) मुंबई, ठाणे आणि पालघर जिल्ह्यांसाठी 'ऑरेंज' अलर्ट जारी केला आहे. पावसाच्या तीव्रतेमुळे अंधेरी सबवेसह हिंडमाता आणि किंग्ज सर्कलमध्ये पाणी साचले होते. मध्य रेल्वेच्या ट्रान्स-हार्बर मार्गावर तुर्भे आणि कोपरखैरणे दरम्यान ट्रॅक खचल्याने वाहतुकीवर परिणाम झाला, मात्र नंतर ती हळूहळू पूर्ववत करण्यात आली. बेस्टच्या २४ हून अधिक बसगाड्यांचे मार्गही बदलण्यात आले होते. महापालिकेने दावा केला आहे की, उपसा पंप आणि पूर नियंत्रण यंत्रणा कार्यरत असल्याने पाणी वेगाने उपसले गेले, मात्र मुंबईकरांना पहिल्याच पावसात मोठा मनस्ताप सहन करावा लागला आहे.