संयुक्त राष्ट्र
संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेत (UNSC) आयोजित एका अनौपचारिक बैठकीदरम्यान, पाकिस्तानने जम्मू-काश्मीरबाबत केलेल्या अनुचित विधानांचा भारताने तीव्र शब्दांत निषेध केला आहे. जम्मू-काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग असून तो पूर्णपणे देशाचा अंतर्गत विषय आहे, असे भारताने पुन्हा एकदा स्पष्ट केले.
चीन आणि पाकिस्तानने संयुक्तपणे आयोजित केलेल्या 'अरिया-फॉर्म्युला' बैठकीत पाकिस्तानचे संयुक्त राष्ट्रांमधील राजदूत आसिम इफ्तिखार अहमद यांनी जम्मू-काश्मीरचा मुद्दा उपस्थित केला होता. यावर भारताचे संयुक्त राष्ट्रांतील स्थायी प्रतिनिधी, राजदूत परवतनेनी हरीश यांनी सडेतोड उत्तर दिले. "पाकिस्तानच्या प्रतिनिधींनी केलेले विधान अत्यंत अनावश्यक आणि अनुचित आहे. ज्या सह-अध्यक्षांनी तटस्थ राहणे अपेक्षित होते, त्यांनी या मंचाचा वापर राजकीय हेतूसाठी करावा, हे खेदजनक आहे," असे हरीश यांनी म्हटले.
भारताने आपली भूमिका स्पष्ट करताना सांगितले की, जम्मू-काश्मीर केंद्रशासित प्रदेश हा भारताचा अंतर्गत विषय आहे. तो नेहमीच भारताचा भाग होता, आहे आणि राहील. दरम्यान, बैठकीच्या विषयावर बोलताना राजदूत हरीश यांनी संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेच्या कार्यपद्धतीवर आणि मध्यस्थीच्या जुन्या आराखड्यांवरही भाष्य केले. सुरक्षा परिषदेने बदलत्या जागतिक वास्तवाशी जुळवून घेणे आवश्यक असून, कालबाह्य झालेल्या मध्यस्थीच्या चौकटींचा आढावा घेणे गरजेचे आहे, असे त्यांनी अधोरेखित केले.
सुरक्षा परिषदेची सध्याची रचना जुनी झाली असून ती जागतिक वास्तवाचे प्रतिनिधित्व करत नाही, असे म्हणत भारताने अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या परिषदेतील कायमस्वरूपी सदस्यत्वाचा मुद्दा पुन्हा एकदा लावून धरला.