अर्शेल अख्तर : सामाजिक बदलासाठी सायकलिंग करणारा अवलिया

Story by  आवाज़ मराठी | Published by  Fazal Pathan • 7 d ago
अर्शेल अख्तर
अर्शेल अख्तर

 

दौलत रहमान/गुवाहाटी

आसामच्या अर्शेल अख्तर यांनी आपल्या वडिलांनी भेट दिलेली सायकल स्वतःहून शिकून चालवायला सुरुवात केली, तेव्हा ते आठवीत शिकत होते. शनिवार-रविवारी मित्रांसोबत आसपासच्या परिसरात ते सायकल चालवत फिरायचे. २००१ मध्ये पदवी मिळेपर्यंत त्यांचा प्रवास असाच अधूनमधून चालू होता. नोकरी लागल्यानंतर त्यांनी सायकलिंग सोडले, सायकल विकली. त्यानंतर त्यांनी कार खरेदी केली. पण कॉर्पोरेट नोकरी आणि नव्या कारचा अनुभव त्यांना फारसा रोमांचक वाटला नाही. त्यांनी नोकरी सोडली, उद्योजकतेचा प्रवास सुरू केला आणि २०१६ मध्ये पुन्हा सायकलिंगकडे वळले.
 
 
आज अर्शेल अख्तर हे आसाममधील सायकलप्रेमींमध्येच नव्हे, तर सर्वसामान्यांमध्येही परिचित चेहरा आहेत. ते राज्यभर सायकल चालवून समाजात सकारात्मक संदेश पसरवत आहेत. तसेच वाढत्या गुवाहाटी शहरात सायकलिंगला विश्वासार्ह वाहतूक साधन बनवण्यासाठी जनमत तयार करत आहेत.

नोकरी सोडल्यानंतर अर्शेल यांनी २०१६ पासून गुवाहाटीच्या आसपासच्या भागात सायकलवरून भटकंती सुरू केली. भटकंतीच्या माध्यमातून ते हळूहळू सायकलप्रेमींशी जोडले गेले. त्यांनी सायकलिंग व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप्स जॉइन केले आणि अधिक उत्साही लोकांना भेटले. २०१७ च्या सुरुवातीला त्यांनी वीकेंड राइड्स, विशेष प्रसंगी रॅली आणि रेस आयोजित केल्या. नंतर त्यांनी मोहिमा, चर्चासत्रे आणि तज्ज्ञांना आमंत्रित करून परिषदा आयोजित केल्या.

 
२०१८ मध्ये अर्शेल यांना सायकल मेयर कार्यक्रमाची माहिती मिळाली. त्यांनी आपली सायकलिंगची आवड, गुवाहाटी आणि शहरासाठीच्या दृष्टिकोनावर तीन पानांचा लेख सादर केला. BYCS, ही सायकलिंगद्वारे शहरांचे रूपांतर करणारी, अ‍ॅमस्टरडॅम येथील जागतिक NGO, यांनी त्यांच्या तीन ऑनलाइन मुलाखती घेतल्या आणि त्यांना या भूमिकेसाठी योग्य ठरवले. NGO ने स्थानिक सक्रिय नागरिकांकडून सात समर्थनपत्रे मागितली. अर्शेल यांनी ४० हून अधिक लोकांशी संपर्क साधला आणि सुमारे २० समर्थनपत्रे मिळवली. २२ एप्रिल २०१८, आंतरराष्ट्रीय पृथ्वी दिनी, अर्शेल यांची गुवाहाटीचे पहिले सायकल मेयर म्हणून नियुक्ती झाली.

 ‘आवाज-द व्हॉइस’ला दिलेल्या विशेष मुलाखतीत अर्शेल म्हणाले, “या नियुक्तीमुळे मला स्थानिक सरकार आणि आसाममधील सायकलिंग समुदायांशी संवाद साधण्याची संधी मिळाली. मी लक्षात घेतले की, लोक सायकलिंगला फक्त खेळ किंवा मनोरंजन मानतात, वाहतूक साधन म्हणून नाही. यामुळे मी शाश्वत वाहतूक, सरकारी योजना, सायकलिंग धोरणे आणि ती का अयशस्वी झाली किंवा लागू झाली नाहीत याची कारणे शोधण्यास सुरुवात केली.”

 
यानंतर अर्शेल यांचे कार्य गतीने पुढे सरकले. २०१९ मध्ये, काही मित्रांसोबत त्यांनी पेडल फॉर अ चेंज नावाची संस्था स्थापन केली. ही संस्था सायकलिंगच्या सर्व पैलूंवर लक्ष केंद्रित करते. ते म्हणाले, “२०१९ पासून मी सायकलिंगला शहरी गतिशीलतेचा पर्याय म्हणून पाहू लागलो. हा पर्याय प्रदूषण आणि वाहतूक कोंडी या दोन मोठ्या समस्यांवर उपाय ठरू शकतो. माझे ज्ञान इतर शहरांतील सायकल मेयर, शहरी वाहतूक तज्ज्ञ (लिंक्डइनद्वारे), लेख, पुस्तके आणि ऑनलाइन सामग्री यांद्वारे वाढत गेले. २०२० पर्यंत मला शाश्वत शहरी गतिशीलतेची सखोल समज मिळाली. त्यानंतर मी सायकलिंगसह सार्वजनिक वाहतूक आणि चालण्यासंदर्भात लोकांना माहिती देऊ लागलो.”

राज्यातील सायकलिंग समुदायांशी अधिक जोडण्यासाठी, अर्शेल यांनी जून-जुलै २०२३ मध्ये आसाममधील २,००० किमीचा सायकल प्रवास केला. २८ दिवसांत २७ जिल्ह्यांचा दौरा करून त्यांनी हवामान कृती, सक्रिय गतिशीलता आणि रस्ता सुरक्षेचा संदेश त्यांनी यावेळी दिला.  

पेडल फॉर अ चेंजद्वारे २०२०-२०२१ मध्ये स्वयंसेवकांशी झालेल्या संवादाने प्रेरित होऊन, अर्शेल यांनी २०२४ मध्ये पूर्वका फाउंडेशनची सह-स्थापना केली. ही संस्था आता हवामान कृती, सार्वजनिक वाहतूक, सक्रिय गतिशीलता (चालणे आणि सायकलिंग) आणि रस्ता सुरक्षेवर प्रचार करते. अर्शेल म्हणाले, “आम्ही आता विविध संस्थांसाठी सायकल राइड्स आणि रॅली आयोजित करतो. स्पोकहब सायकलिंगसोबत रेस घेतो. हा समुदाय सहभागाच्या उपक्रम आहेत. ESAF फाउंडेशनच्या पाठिंब्याने ओपन स्ट्रीट्स गुवाहाटी आयोजित करतो. आम्ही ‘आय अ‍ॅम कार-फ्री टुडे’ मोहीम राबवली आहे. या मोहिमेचा उद्देश लोकांना महिन्यातून काही दिवस कार न वापरण्यास प्रोत्साहित करणे आहे. तसेच ‘वी टू’ मोहिमेद्वारे सायकलस्वार आणि पादचाऱ्यांच्या सुरक्षेबाबत जागरूकता वाढवण्यावर आमचा भर आहे.”

 
अर्शेल आणि त्यांच्या संस्थेने पेडल टॉक्स, मोबिलिटी टॉक्स, लेट्स गेट इन्व्हॉल्व्ड आयोजित करून शहरी गतिशीलतेच्या समस्यांवर सहकारी उपाय शोधले आहेत. त्यांनी सार्वजनिक वाहतूक आणि सायकलिंगबाबत लोकांच्या धारणा समजून घेण्यासाठी सर्वेक्षण आणि अभ्यास केला. २०२३ मध्ये त्यांनी नॉर्थ ईस्ट सायकलिंग अवॉर्ड्स सुरू केले. या माध्यमातून सायकलिंगमधील योगदानासाठी व्यक्ती, संस्था आणि संघटनांचा गौरव केला जातो. 

ते म्हणाले, “आम्ही गुवाहाटीतील काही शाळांमध्ये सायकल रॅली आयोजित केल्या. बरेच विद्यार्थी इतर संघटनांच्या मोठ्या रॅलींमध्येच सहभागी होतात. स्पोकहब सायकलिंगसोबत आयोजित केलेल्या रेसमधून  १२ ते १८ वयोगटातील तरुणांना आकर्षित करतात.”

पूर्वका फाउंडेशनद्वारे अर्शेल यांची शाश्वत शहरी गतिशीलतेसाठी अधिक अभ्यास करण्याची आणि पुरावे गोळा करण्याची योजना आहे. ते आणि त्यांची टीम पायलट प्रकल्पांवर काम करत आहे. यामुळे पायी चालणे आणि सायकलिंगद्वारे परिसरातील प्रवेशक्षमता सुधारेल. विशेषतः प्रमुख सार्वजनिक वाहतूक केंद्रांशी जोडण्यासाठी. “ही पायलट प्रकल्प गुवाहाटीच्या इतर भागांत आणि नंतर आसाममधील इतर शहरांत विस्तारित करता येतील,” असे ते म्हणाले.

 

ते पुढे म्हणाले, “आम्ही उपजीविकेच्या सायकलस्वारांना पाठबळ देण्यासाठी एक विशेष कार्यक्रम सुरू करणार आहोत. याशिवाय, शालेय मुलांसाठी सायकलिंग उपक्रमांवर काम करत आहोत. यंदा आम्ही नॉर्थ ईस्ट सायकलिंग अवॉर्ड्सचा दुसरा संस्करण आयोजित करू. यामुळे सायकलिंगमधील योगदान देण्यासाठी सर्वांना प्रेरणा मिळेल.” 


'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  -

Awaz Marathi WhatsApp Group 
Awaz Marathi Facebook Page

Awaz Marathi Twitter