हिमाचलमध्ये पावसाचा हाहाकार

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 5 h ago
प्रातिनिधिक फोटो
प्रातिनिधिक फोटो

 

हिमाचल प्रदेशात मुसळधार पाऊस आणि भूस्खलनामुळे रविवारी शिमला हवामान केंद्राने १० जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट जारी केला आहे. मिळालेल्या वृत्तानुसार, बिलासपूर, हमीरपूर, कांगडा, मंडी, शिमला, सोलन, सिरमौर, उना, कुल्लू आणि चंबा या जिल्ह्यांत २९ जून रोजी जोरदार पावसाचा अंदाज वर्तवला गेला.

रात्रीच्या पावसामुळे शिमला-कालका राष्ट्रीय महामार्गावरील (NH-5) कोटीजवळ भूस्खलन झाले. यामुळे रस्त्याचे काही भाग खराब झाले. परिणामी, दोन ते तीन किलोमीटर लांबीचा ट्रॅफिक जाम काही तास राहिला. शिमला-कालका रेल्वे मार्गावर ढिगारा आणि झाडे पडल्याने रेल्वे सेवा तासभर बंद राहिली. ढिगारा हटवल्यानंतर सेवा पुन्हा सुरू झाली.

सोलनचे पोलीस अधीक्षक गौरव सिंग यांनी सांगितले, " NH-5 वरील चक्की मोडजवळ द्विमार्गी वाहतूक पुन्हा सुरू झाली. भूस्खलनामुळे हा भाग खराब झाला होता. जंगेशू रस्त्यावरील ढिगारा पडल्याने तोही बंद झाला. आता तो साफ केला जात आहे. कसौलीहून चंदीगडकडे जाणारी वाहतूक जंगेशू मार्गे वळवली जाईल."

हवामान खात्याने भूस्खलन, जलमयता, कमकुवत इमारतींचे नुकसान, वाहतूक कोंडी आणि अत्यावश्यक सेवांमध्ये व्यत्यय येण्याचा इशारा दिला आहे.

२०२३ च्या पावसामुळे नुकसान

गेल्या वर्षी जुलै आणि ऑगस्टमध्ये मुसळधार पावसाने हिमाचलमध्ये मोठे नुकसान केले. हवामान खात्याने तेव्हा रेड अलर्ट जारी केला होता. त्यावेळी ५५० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला होता. २०२३ हे हिमाचलमधील सर्वात वाईट मान्सून आपत्ती वर्ष मानले गेले. 

हिमाचलमधील सध्याची परिस्थिती  रविवारी शिमला-कालका रेल्वे मार्गावर सोलनच्या कोटी परिसरात पाऊस आणि भूस्खलनामुळे दगड आणि झाडे पडली. यामुळे रेल्वे सेवा खंडित झाली. सकाळी येणारी पहिली गाडी कोटी रेल्वे स्थानकात अडकली. इतर गाड्या गुम्मन आणि कालका येथे थांबवल्या गेल्या.  

सोलनच्या बारोटीवाला औद्योगिक क्षेत्रातील हिमुडा संकुलाकडे जाणारा रस्ता आणि पूल पावसाने वाहून गेला. मंधाला आणि बग्गूवाला येथील रस्ते बंद झाले. रस्त्यांवर दुरुस्तीचे काम सुरू आहे.  

बड्डी परिसरातील बाल्ड नदी पावसामुळे दुथडी भरली. आजूबाजूच्या भागांना धोका निर्माण झाला. झडमजरी परिसरात पाण्याचा प्रवाह तीव्र झाला. बड्डीच्या शिवालिक नगरात २० हून अधिक घरांमध्ये चार फूट पाणी शिरले. 

पांडोह धरणाचे पाचही सांडवे रविवारी सकाळी उघडण्यात आले. लारजी धरणातील प्री-मान्सून फ्लशिंगमुळे बियास नदीची पाण्याची पातळी वाढली.  पावसामुळे राज्यात १२९ रस्ते बंद झाले. ६१२ ट्रान्सफॉर्मर खराब झाले. सिरमौर आणि मंडी जिल्ह्यांत अनुक्रमे ५७ आणि ४४ रस्ते बंद झाले.  

हवामान खात्याने १० जिल्ह्यांत सोमवारपर्यंत मध्यम ते उच्च पुराचा धोका जाहीर केला. यात बिलासपूर, चंबा, हमीरपूर, कांगडा, कुल्लू, मंडी, शिमला, सोलन, सिरमौर आणि उना यांचा समावेश आहे. ५ जुलैपर्यंत हिमाचलच्या काही भागांत जोरदार ते अति जोरदार पावसाचा ऑरेंज इशारा देण्यात आला.