नेपाळ सीमेवर बंदी घातलेल्या वॉकीटॉकीसह ७ जणांना अटक

Story by  आवाज़ मराठी | Published by  Fazal Pathan • 20 h ago
नेपाळ सीमेवर अटक केलेले सात जण
नेपाळ सीमेवर अटक केलेले सात जण

 

उत्तर प्रदेशातील बहराईच जिल्ह्यातील रुपाईडीहा येथील भारत-नेपाळ सीमेवर सशस्त्र सीमा बल (एसएसबी) ने मोठी कारवाई केली आहे. प्रतिबंधित 'फ्रिक्वेन्सी हॉपिंग' तंत्रज्ञानाचे ५ इलेक्ट्रॉनिक वॉकीटॉकी संच बाळगल्याप्रकरणी ७ जणांना अटक करण्यात आली. पकडलेल्या या सर्वांना पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

एसएसबीच्या तक्रारीवरून, या अटक केलेल्यांवर दूरसंचार कायदा, भारतीय तार कायदा आणि भारतीय वायरलेस टेलिग्राफी कायद्याच्या कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला. अटक केलेले संशयित हे महाराष्ट्रातील पुणे आणि ठाणे, तसेच उत्तर प्रदेशातील बहराईच, बिजनौर आणि कुशीनगर जिल्ह्यातील रहिवासी आहेत. त्यांना कारागृहात पाठवण्यात आले आहे.

एसएसबीने दिलेल्या माहितीनुसार, अटक केलेले हे लोक नेपाळमधील 'इस्लामिक युनियन ऑफ नेपाळ' या संघटनेच्या अधिकाऱ्यांना भेटून परतले होते. या संघटनेला पाकिस्तानी एजन्सींकडून निधी मिळतो.

एसएसबीच्या ४२ व्या बटालियनचे कमांडंट गंगा सिंह उदावत यांनी सांगितले, की २७ जूनच्या सायंकाळी रुपाईडीहा सीमेवर नेपाळमधून एसयूव्हीमधून येत असलेल्या ७ जणांना थांबवण्यात आले. त्यांच्या ताब्यातून ५ प्रतिबंधित 'फ्रिक्वेन्सी हॉपिंग' तंत्रज्ञानाचे इलेक्ट्रॉनिक वॉकीटॉकी संच जप्त करण्यात आले. परवान्याशिवाय असे संच भारतात वापरण्यास मनाई आहे. या तंत्रज्ञानात, संभाषणादरम्यान वारंवारता सतत बदलत राहते, ज्यामुळे ते ऐकणे किंवा त्यात व्यत्यय आणणे अत्यंत कठीण होते.

संशयास्पद वॉकीटॉकी सापडल्यानंतर, सर्व सुरक्षा एजन्सींनी त्यांची चौकशी केली. प्रतिबंधित 'फ्रिक्वेन्सी हॉपिंग' असलेले वॉकीटॉकी नेपाळमध्ये घेऊन जाण्यामागे कोणतेही वैध कारण ते देऊ शकले नाहीत. चौकशीत समोर आले की, अटक केलेल्यांपैकी एक मोहम्मद मुस्लिम हा पुण्यातील रहिवासी असून, तो पूर्वी बहराईचमधील मटेरा परिसरात राहायचा. सुमारे १५-२० वर्षांपूर्वी तो केटरिंगचा व्यवसाय करण्यासाठी पुण्याला स्थायिक झाला होता.

मोहम्मद मुस्लिम २४ जून रोजी आपल्या मुलीच्या लग्नासाठी बहराईचला आला होता. २६ जून रोजी मोहम्मद मुस्लिम आपले साथीदार बिलाल अब्दुल रहमान शेख आणि मुनीर युसूफ शेख (पुणे, महाराष्ट्र), टेमेश्वर भोंडवे (ठाणे, महाराष्ट्र), अचलेश कुमार (बिजनौर, उत्तर प्रदेश), शंकर पांडे (कुशीनगर, उत्तर प्रदेश) आणि चांगूर अहमद (बहराईच) यांच्यासह नेपाळला गेला. नेपाळमध्ये ते नसीम शेख नावाच्या व्यक्तीला भेटले आणि एका रात्रीसाठी त्याच्या घरी थांबले. नसीम शेख हा 'इस्लामिक संघ ऑफ नेपाळ' या संघटनेशी संबंधित आहे, ज्याला पाकिस्तानी एजन्सींकडून निधी मिळतो.

या सर्व बाबी लक्षात घेता, एसएसबीने या घटनेला संशयास्पद सुरक्षा धोका मानले आहे. २८ जून रोजी रुपाईडीहा पोलिस ठाण्यात या सातही जणांवर दूरसंचार कायदा २०२३, भारतीय तार कायदा १८८५ आणि भारतीय वायरलेस टेलिग्राफी कायदा १९३३ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अटक केलेल्यांना पोलिसांच्या स्वाधीन करून कारागृहात पाठवण्यात आले आहे. या घटनेच्या सर्व पैलूंचा तपास सुरू आहे.