सय्यदना मुफद्दल सैफुद्दीन हे बोहरा समाजाचे सर्वोच्च धार्मिक नेते - मुंबई उच्च न्यायालय

Story by  Awaz Marathi | Published by  sameer shaikh • 10 d ago
सय्यदना मुफद्दल सैफुद्दीन
सय्यदना मुफद्दल सैफुद्दीन

 

गेल्या १० वर्षांपासून न्यायालयासमोर कायदेशीर लढा चाललेल्या दाऊदी बोहरा समाजाच्या नेतृ्त्वाचा मुद्दा अखेर निकाली निघाला आहे. तब्बल आठ वर्षं सुनावणी घेतल्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाने या प्रकरणाचा निकाल दिला.विशेष म्हणजे इतक्या प्रदीर्घ सुनावणीनंतरही तब्बल वर्षभर या प्रकरणाचा निकाल राखून ठेवण्यात आला होता. अखेर मंगळवारी न्यायमूर्ती जी. एस. पटेल यांनी सय्यदना मुफद्दल सैफुद्दीन यांची दाऊदी बोहरा समाजाच्या नेतृत्वपदी झालेली नियुक्ती वैध ठरवली आहे.
 
२०१४ मध्ये दाखल करण्यात आला होता खटला
मार्च २०१४ मध्ये सय्यदना खुझैमा कुतुबुद्दीन यांना ५२व्या दाई अल-मुतलक (सर्वोच्च धर्मगुरू) यांनी ५३वे दाई अल-मुतलक किंवा अध्यात्मिक नेता आणि १५ लाख दाऊदी बोहरा समुदायाचा प्रमुख म्हणून घोषित केल्याचा दावा करत हा  खटला दाखल केला होता. 

सय्यदना खुजैमा कुतुबुद्दीन यांनी दावा केला की त्यांना डिसेंबर १९६५मध्ये ५२व्या दाई  द्वारे 'नास' प्रदान करण्यात आला होता. नास ही दाऊदी बोहरा पंथाद्वारे उत्तराधिकाराची अधिकृत घोषणा आहे. मात्र तरीही ५२ व्या दाईचा मुलगा सय्यदना मुफद्दल सैफुद्दीन यांनी ५३वा दाई असल्याचा दावा केला होता. १७  जानेवारी २०१४ रोजी वडिलांच्या मृत्यूनंतर दाईने समुदायावर आणि तेथील मालमत्तांवर ताबा मिळवला. 

याचिकाकर्त्यांच्यामते सय्यदना मुफद्दल यांनी ५३वे दाई अल-मुतलक म्हणून दाऊदी बोहरा समुदायाच्या सर्व स्थावर आणि जंगम मालमत्तेचे तसेच ए जी बेल रोडवर असलेल्या सैफी महलच्या नियंत्रण आणि व्यवस्थापनासाठी हक्कदार असल्याची घोषणाही केली. मलबार हिलमध्ये दाई अल-मुतलकचे अधिकृत कार्यालय-सह-निवासस्थान आहे.

याचिकाकर्ते खुजैमा कुतुबुद्दीन यांनी मागणी केली होती की सय्यदना मुफद्दल यांना सैफी मस्जिद, रौदत ताहेरा आणि सर्व बोहरा मस्जिदी, दार उल-इमार, कम्युनिटी हॉल, मकबरे, शाळा, महाविद्यालये, रुग्णालये, कब्रस्तान यांसारख्या सामुदायिक संपत्तिमध्ये प्रवेश देण्यात येऊ नये. 

मात्र, २०१६मध्ये खटल्यादरम्यान कुतुबुद्दीन यांचा मृत्यू झाला. त्यानंतर त्यांचा मुलगा सय्यदना ताहेर फखरुद्दीन याने या प्रकरणात वडिलांची जागा घेण्यासाठी उच्च न्यायालयात अर्ज दाखल केला. फखरुद्दीनने दावा केला की त्यांना त्यांच्या वडिलांनी नास ही पदवी दिली आहे आणि ते  ५४वे दाई असल्याचा दावा केला.

त्यांच्या बाजूने, सय्यदना मुफद्दल सैफुद्दीन यांनी दावा केला की त्यांची ५२ व्या दाईने कायदेशीररित्या उत्तराधिकारी म्हणून नियुक्ती केली होती आणि १७ जानेवारी २०१४ रोजी ५२व्या दाईच्या मृत्यूनंतर त्यांनी पदभार स्वीकारला होता. २०११मध्ये त्यांचे वडील लंडनमधील रुग्णालयात होते तेव्हा त्यांनी मुंबईत त्यांच्या उत्तराधिकाराची जाहीर घोषणा केली होती, असे सांगून सय्यदना मुफद्दल यांनी आपल्या कृतीचे समर्थन केले होते.

सैयदना मुफद्दल आणि बोहरा समाजाकडून न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत 
दहा वर्षांच्या प्रदीर्घ न्यायालयीन लढ्यानंतर आलेल्या या निर्णयाचे दाऊदी बोहरांचे ५३वे सर्वोच्च धर्मगुरू सैयदना मुफद्दल सैफुद्दीन यांनी निवेदनाद्वारे स्वागत केले आहे. न्यायालयाचा हा निर्णय समाजासाठी ऐतिहासिक आणि दिशादर्शक ठरणारा असल्याचे त्यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे. सैयदना आणि दाऊदी बोहरा समाजाच्या परंपरा आणि श्रद्धा यांवर वेळोवेळी शिक्कामोर्तब करणाऱ्या न्यायव्यवस्थेचेही त्यांनी विशेष आभार मानले आहेत.   

कोण आहे सय्यदना मुफद्दल सैफुद्दीन?
सय्यदना मुफद्दल सैफुद्दीन हे दाऊदी बोहरांचे ५३वे सर्वोच्च धर्मगुरू (दाई अल-मुतलक) आहेत. अध्यात्मिक नेते, शिक्षणतज्ज्ञ आणि समाजसेवक म्हणून त्यांची ओळख आहे. यापूर्वी त्यांचे वडील मोहम्मद बुरहानुद्दीन वडील हे ५२ वे धर्मगुरू होते. २०१४ मध्ये त्यांच्या निधनानंतर मुफद्दल सैफुद्दीन यांची सय्यदना म्हणून निवड करण्यात आली. निवड झाल्यानंतर त्यांनी लगेचच भारत आणि जगभरातील बोहरा समुदायांना शांतता आणि सद्भावाचे आवाहन केले.

बोहरा मुस्लीम म्हणजे नमके कोण? 

बोहरा मुस्लीम समाज हा शिया इस्लामच्या इस्माइली शाखेतील एक धार्मिक संप्रदाय आहे. मात्र काही बोहरा सुन्नी समाजातही मोडतात. बोहरा हा शब्द 'वहौराऊ' या गुजराती शब्दाचा अपभ्रंश होऊन तयार झाला. ‘वहौराऊ' म्हणजेच व्यापार. हा समाज प्रामुख्याने व्यापारी वर्ग म्हणून ओळखला जातो.  ही मंडळी अकराव्या शतकात उत्तर इजिप्तमधून धर्मप्रचारकांसोबत भारतात आले.



हा लेखही जरूर वाचा :