सैयदना मुफद्दल सैफुद्दीन - दाऊदी बोहरा समुदायाचे सर्वोच्च धर्मगुरू

Story by  Pooja Nayak | Published by  Pooja Nayak • 7 Months ago
सैयदना मुफद्दल सैफुद्दीन
सैयदना मुफद्दल सैफुद्दीन

 

दाऊदी बोहरा समाजाचे प्रमुख सैयदना मुफद्दल सैफुद्दीन यांचा हिजरी सनाप्रमाणे आज ७७वा वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने त्यांची जडणघडण आणि कार्य याचा आढावा घेणारा हा लेख…

सैयदना मुफद्दल सैफुद्दीन हे दाऊदी बोहरांचे ५३वे सर्वोच्च धर्मगुरू (दाई अल-मुतलक) आहेत. अध्यात्मिक नेते, शिक्षणतज्ज्ञ आणि समाजसेवक म्हणून त्यांची ओळख आहे. यापूर्वी त्यांचे वडील मोहम्मद बुरहानुद्दीन वडील हे ५२ वे धर्मगुरू होते. २०१४ मध्ये त्यांच्या निधनानंतर मुफद्दल सैफुद्दीन यांची सैयदना म्हणून निवड करण्यात आली. निवड झाल्यानंतर त्यांनी लगेचच भारत आणि जगभरातील बोहरा समुदायांना शांतता आणि सद्भावाचे आवाहन केले.

बोहरा मुस्लीम समाज हा शिया इस्लामच्या इस्माइली शाखेतील एक धार्मिक संप्रदाय आहे. मात्र काही बोहरा सुन्नी समाजातही मोडतात. बोहरा हा शब्द 'वहौराऊ' या गुजराती शब्दाचा अपभ्रंश होऊन तयार झाला. ‘वहौराऊ' म्हणजेच व्यापार. हा समाज प्रामुख्याने व्यापारी वर्ग म्हणून ओळखला जातो.  ही मंडळी अकराव्या शतकात उत्तर इजिप्तमधून धर्मप्रचारकांसोबत भारतात आले.

बोहरा मुस्लिम प्रेषित मोहम्मद यांचे जावई अली इब्न अबी तालिब यांना प्रेषितांचा खरा वारस मानतात. त्यांना ‘इमाम’ म्हणून संबोधतात. बोहरा मुस्लिम त्यांच्या विशिष्ट धार्मिक आणि सांस्कृतिक प्रथांसाठी ओळखले जातात. धर्मशास्त्र, धर्मगुरूंचे नेतृत्व आणि दैनंदिन जीवनातील विधी यांनी बोहरा समुदायाचे जीवन व्यापलेले असते. 

सैयदना मुफद्दल सैफुद्दीन यांचा जन्म २० ऑगस्ट १९४७ रोजी (रब्बीउल आखिर महिन्याच्या २० तारखेला, हिजरी वर्ष १३६५) गुजरातमधील सुरत येथे झाला. त्यांचे आजोबा ताहिर सैफुद्दीन यांनी त्यांचे नाव 'अली कदर मुफद्दल' असे ठेवले होते.  ते या समाजाचे ५१वे धर्मगुरू होते. याच दोन्ही पूर्वजांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी आपल्या धार्मिक आणि सामाजिक जीवनाचे धडे गिरवले.
 
सैफुद्दीन हे त्यांच्या वडीलांसमवेत तीर्थयात्रेवर आणि देश-विदेशातील बोहरा समुदायाला भेटण्यासाठीजात असत. यातूनच अल-दाई अल-मुतलकया पदाशी संबंधित परंपरा, चालीरीती आणि नियम त्यांनी आत्मसात केले. त्यांनी धार्मिक शिक्षण अल-जामिया-तुस-सैफिया, मुंबई विद्यापीठ आणि अल-अजहर विद्यापीठ, काहिरा या नामांकित संस्थेमधून पूर्ण केले. पुढे १९६९ मध्ये त्यांनी जामिया सैफिया, सुरत येथून अल-फकीह अल-जय्याद (प्रतिष्ठित न्यायशास्त्रज्ञ) या पदवीसह पदवी प्राप्त केली. १९७१ मध्ये त्यांना अल-आलिम अल-बरेन (उत्कृष्ट विद्वान) ही पदवी देण्यात आली. याच काळात ते युसूफ नजमुद्दीन यांची कन्या जोहरतुस-शराफ नजमुद्दीन यांच्याशी विवाहबद्ध झाले.  

सैयदना मुफद्दल सैफुद्दीन यांचे शैक्षणिक कार्य 
२०१४ मध्ये अल-दाई अल-मुतलक म्हणजे सर्वोच धर्मगुरू या पदावर सय्यदना सैफुद्दीन आरूढ झाले. त्यांना त्यांच्या आदरणीय वडील आणि आजोबांप्रमाणे अलीगढ मुस्लिम विद्यापीठाचे कुलपतीपद स्वीकारण्याची विनंती करण्यात आली. एप्रिल २०१५ मध्ये त्यांनी ही विनंती मान्य केली आणि अलीगढ मुस्लिम विद्यापीठाच्या कुलपतीपदी त्यांची नियुक्ती झाली. फेब्रुवारी २०१६ मध्ये त्यांनी ६३ व्या वार्षिक दीक्षांत समारंभाच्या निमित्ताने प्रथमच कुलपती म्हणून विद्यापीठाला भेट दिली. 

सप्टेंबर २०१५ मध्ये, कराची विद्यापीठाने त्यांना डॉक्टर ऑफ लेटर्सची मानद पदवी प्रदान केली . या संस्थेकडून मानद पदवी मिळवणारे सय्यदना सैफुद्दीन हे दाऊदी बोहरा समाजाचे तिसरे प्रमुख आहेत; त्यांचे वडील सैयदना मोहम्मद बुरहानुद्दीन यांना २००४ मध्ये हीच पदवी देण्यात आली होती आणि त्यांचे आजोबा सैयदना ताहेर सैफुद्दीन यांनाही १९५५ मध्ये मानद पदवी प्रदान करण्यात आली होती.

४ मार्च २०२३ पासून पाच वर्षांच्या कालावधीसाठी जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठाचे कुलपती (अमीर-ए-जामिया) म्हणून त्यांची एकमताने निवड झाली.

सुरत येथे धार्मिक शिक्षण आणि न्यायशास्त्रच्या शिक्षणासाठी  १८१० मध्ये अल्जामिया-तुस-सैफियाह या संस्थेची स्थापना करण्यात आली. त्याच्या विस्ताराचे कामही सैय्यदना सैफुद्दीन यांनी केले.  संस्थेच्या पायाभूत उद्दिष्टांना धक्का न लावता आधुनिक सुविधा आणि अध्यापन पद्धती त्यांनी संस्थेत आणल्या. ‘अल्जामिया-तुस-सैफिया’ ही दाऊदी बोहरा समुदायाची मुख्य शैक्षणिक संस्था आहे. सय्यदना मुफद्दल सैफुद्दीन यांच्या नेतृत्वाखाली ही संस्था या समुदायाच्या अध्ययन परंपरा आणि ज्ञान यांचे संरक्षण करण्याचे काम करते. 

सध्या सुरत, कराची आणि नैरोबी येथे या संस्थेचे कॅम्पस आहेत. काही महिन्यांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मुंबईतील मरोळ येथे अल्जामिया-तुस-सैफिया (सैफी अकादमी) च्या नव्या कॅम्पसचे उद्घाटन झाले. त्यावेळी बोलताना पंतप्रधान म्हणाले होते की,  “आज मी इथे पंतप्रधान या नात्याने आलो नाही, तर एक ज्या कुटुंबाशी आपले चार पिढ्यांपासूनचे स्नेहसंबंध आहेत, त्या कुटुंबाचा सदस्य म्हणून आलो आहे.”

सय्यदना मुफद्दल सैफुद्दीन यांच्या शैक्षणिक क्षेत्रातील प्रयत्नांचे लाभार्थी केवळ दाऊदी बोहरा समाजापुरते मर्यादित नाहीत. सर्वधर्मातील विद्यार्थी येथे शिक्षण घेतात. भारतासोबतच दक्षिण आशिया, पूर्व आफ्रिका आणि आखाती देशांमध्येही त्यांच्या अनेक शैक्षणिक संस्था आहेत.

सय्यदना सैफुद्दीन यांनी कैरोमधील १० व्या ते १२ व्या शतकातील प्राचीन फातिमी स्मारकांच्या जीर्णोद्धारात महत्त्वाची भूमिका बजावली. १९९० च्या दशकात, इतर फातिमी ऐतिहासिक वास्तूंचे नूतनीकरण करण्यात आले, त्यात मशिदी अल-अकमार, अल-लुलुआ आणि अल-जुयुशी यांचा समावेश आहे. 

सय्यदना यांनी आर्थिक आघाडीवर केलेली कामे 
सय्यदना यांनी ‘कर्जन हसना’ची संकल्पना रुजवली .आपल्या आदरणीय वडिलांच्या पुढाकारानेत्यांनी अनेक स्वयंसेवी संस्था विकसित केल्या. या संस्था गरिबांना परवडणारी घरे देतात आणि व्यवसाय वाढीसाठी मदतही करतात. इस्लामिक आदेशानुसार व्याज घेणे निषिद्ध आहे. त्यामुळे या संस्था बिनव्याजी कर्ज उपलब्ध करून देतात.  ज्याला कर्जन हसना असे म्हणतात.  संस्थात्मक कर्ज देण्याव्यतिरिक्त, समुदाय सदस्यांना वैयक्तिक स्तरावरही कर्जन हसनाच्या रूपात एकमेकांना आर्थिक मदत करण्यास प्रोत्साहित केले जाते. या परंपरेमुळे बोहरा समाजाची आर्थिक भरभराट झाली आहे. 

सय्यदना यांचे समाजभान 
समाजाचे जीवनमान आणि परिस्थिती सुधारण्यावर लक्ष केंद्रित करणे हे सैय्यदना सैफुद्दीन यांच्या कल्याणकारी उपक्रमांपैकी एक प्रमुख आहे. गेल्या तीन वर्षांपासून, सय्यदना त्यांच्या प्रशासनातील अधिकारी, विद्यार्थी आणि अल्जामिया-तुस-सैफियाचे कर्मचारी आणि समाजातील वास्तुविशारद, अभियंते आणि बांधकाम व्यावसायिकांना जीर्णोद्धाराच्या कामाची गरज असलेल्या घरांना भेट देण्यासाठी पाठवतात आणि गरजूंना मदतही करतात.

इस्लामच्या खर्‍या भावनेतून सैयदना सैफुद्दीन यांनी समाजाच्या कल्याणासाठी आणि उन्नतीसाठी स्वत:ला झोकून दिले आहे. असाच एक महत्त्वाकांक्षी उपक्रम म्हणजे मुंबईतील भेंडी बाजार येथील लोकांचे जीवनमान सुधारण्यासाठी सुरू करण्यात आलेला सैफी बुरहानी उत्थान प्रकल्प (SBUP) आहे . २००९ मध्ये आदरणीय वडील सय्यदना सैफुद्दीन यांनी निवासी आणि व्यावसायिक भाडेकरूंना आध्यात्मिक, बौद्धिक, सामाजिक आणि आर्थिक अशा सर्व पैलूंमध्ये मानवी विकासाला चालना देणारे वातावरण प्रदान करण्याच्या दृष्टीकोनातून SBUP ची सुरुवात केली होती.

शहराच्या मध्यभागी असलेल्या १६.५ एकरच्या पुनर्विकास प्रकल्पात २५० मोडकळीस आलेल्या इमारतींचा समावेश आहे आणि त्यात ३२०० कुटुंबे आणि १२५० दुकाने आहेत. या सर्वांचा समावेश १७ नवीन इमारती, रुंद रस्ते, आधुनिक पायाभूत सुविधा, मोठ्या खुल्या जागा आणि प्रमुख व्यावसायिक क्षेत्रांसह अत्याधुनिक शाश्वत विकास प्रकल्पामध्ये करण्यात येणार आहे. २०१५ मध्ये, हा प्रकल्प भारत सरकारने अंतर्गत शहर पुनर्विकासासाठी 'राष्ट्रीय सर्वोत्तम सराव प्रकल्प' म्हणून प्रदर्शित केला आणि ओळखला गेला .

अर्धशतकभर दाऊदी बोहरा समुदायाचे नेतृत्व करण्याऱ्या सय्यदना मोहम्मद बुरहानुद्दीन यांनी आध्यात्मिक आणि भौतिक प्रगतीचा समृद्ध वारसा मागे ठेवला.  सय्यदना मुफद्दल सैफुद्दीन यांनी हा वारसा समर्थपणे पेलला आहे. सेवा, शिष्यवृत्ती आणि सामाजिक सुधारणेसाठी बांधिलकी यांवर ते भर देतात.
  
दाऊदी बोहरा समुदायाच्या सदस्यांना भेटण्यासाठी सैफुद्दीन हे जगभर प्रवास करतात. दयाळूपणा, निष्ठा आणि भक्ती यावर आधारित जीवन जगण्यासाठी मार्गदर्शन करतात. दाऊदी बोहरा समुदायाचे इतर धर्मियांशी कायमच सालोख्याचे संबंध राहिले आहेत. यात सय्यदना यांची मोठी भूमिका आहे.  त्यांची नम्रता  आणि कामाची तळमळ प्रत्येकावर गहरी छाप सोडते. त्यांच्या नेतृत्वाखाली दाऊदी बोहरा समाज उज्ज्वल भविष्याकडे वाटचाल आहे.