विवाहसोहळ्यात येणाऱ्या पाहुण्यांना मिठाई किंवा इतर अन्य वस्तू भेट देण्याची आपल्याकडे प्रथा आहे. परंतु केरळच्या तिरुवनंतपुरमजवळील पलोड येथील एका जोडप्याने अनोखा आदर्श निर्माण केला आहे. जबीरुल हसन आणि असिना यांनी त्यांच्या लग्नात पाहुण्यांना एक अशी भेट दिली आहे ज्याचा तुम्ही विचारही केला नसेल. या मुस्लिम जोडप्याने विवाहसोहळ्यासाठी आलेल्या सर्व पाहुण्यांना भारतीय संविधानाची एक प्रत भेट म्हणून दिली आहे. इतकेच नाही तर या जोडप्याने एकमेकांनाही संविधानाची प्रत भेट दिली आहे.
सध्या केरळमधील हा विवाह चर्चेत आहे. यावेळी पाहुण्यांना संविधानाच्या प्रतीसोबत एक माहितीपत्रकही देण्यात आले होते. संविधानाचे महत्व सांगणारे पत्रक आहे. लोकांनी संविधान वाचून ते आपल्या जीवनात आचरणात आणावे, हा यामागील उद्देश होता. विवाहसोहळ्यात संविधानाच्या प्रस्तावनेचे प्रदर्शनही करण्यात आले. निकाहनंतर हसन आणि असिना यांनी एकमेकांना संविधानाची प्रत भेट दिली आणि संविधानाशी संबंधित संदेशाचे वाचनही केले. तसेच कार्यक्रमाचा समारोप राष्ट्रगीताने झाला.
"लोकांना जागरूक करणे हाच आमचा उद्देश"
हसन यांनी यापूर्वी कोल्लम जिल्हा पंचायतीने राबवलेल्या 'कॉम्प्रिहेन्सिव्ह कॉन्स्टिट्यूशन लिटरसी प्रोजेक्ट'मध्ये काम केले आहे. या प्रकल्पामुळेच त्यांना लोकांमध्ये संविधानाबद्दल जागरूकता वाढवण्याची प्रेरणा मिळाली. हसन हे 'कॉन्स्टिट्यूशन लिटरसी कौन्सिल' या स्वयंसेवी संस्थेचे खजिनदारही आहेत. २०२२ साली हसन यांची संविधान साक्षरता प्रकल्पासाठी 'सिनेटर' म्हणून निवड झाली होती. त्यांनी महाविद्यालये आणि अनेक कार्यक्रमांमध्ये संवाद सत्रे आयोजित केली होती. कोल्लम जिल्ह्यातील विद्यार्थी आणि सामान्य लोकांसाठी त्यांनी वर्गही घेतले.
या उपक्रमाबद्दल बोलताना हसन म्हणाले, "या उपक्रमाच्या माध्यमातून लोकांना जागरूक करण्याचा आमचा उद्देश आहे. संविधानाची मूल्ये आमच्या कौटुंबिक जीवनाचा भाग असावीत, हेच आम्हाला सांगायचे आहे. फक्त मीच नाही तर माझ्या पत्नी असिना यांना देखील या विषयात रस आहे. ही कल्पना देताच त्यांनी उपक्रमासाठी होकार दिल. तसेच हा उपक्रम राबवण्यासाठी आमच्या कुटुंबीयांनीही आम्हाला मोठा पाठिंबा दिला."
यावेळी वधू असिनानेही आपल्या भावना व्यक्त केल्या. ती म्हटली, "सध्याच्या काळात संविधानाचे संरक्षण करणे हे प्रत्येक भारतीयाचे कर्तव्य आहे. त्यामुळे आम्ही आमच्या आयुष्यातील या सर्वात महत्त्वाच्या दिवशी सर्वांना संविधानाची प्रत भेट देऊन आमचे जीवन सुरू करण्याचा निर्णय घेतला."
या अनोख्या लग्नसोहळ्यात उपस्थित असलेल्या पाहुण्यांनी देखील वधू-वराच्या या निर्णयाचे स्वागत केले. ते म्हणाले की, "संवैधानिक मूल्ये संपूर्ण समाजात पसरतील तेव्हाच एक चांगला देश घडण्यास मदत होईल. त्यामुळे आम्ही हसनच्या निर्णयाचे कौतुक करतो. हसन आमच्या संस्थेचा खजिनदार आहे. त्याचे लग्न इतरांसाठी एक आदर्श ठरावे म्हणून त्यांनी एकमेकांना संविधानाची प्रत भेट द्यावी, अशी आमची इच्छा होती. आम्ही प्रवेशद्वारावर संविधानाची प्रस्तावना लावली होती आणि सर्व पाहुण्यांना संवैधानिक मूल्ये असलेली माहितीपत्रके वाटली."
त्यांच्यापैकी असलेले दुसरे आयोजक म्हणाले की, "विवाहसोहळ्यात संविधानाची प्रत भेट देणारा आमचा ग्रुप कदाचित पहिलाच असावा. दोन वर्षांपूर्वी आमच्याच ग्रुपच्या एका सदस्याचा विवाह अशाच प्रकारे झाला होता. तसेच इथून पुढे आमच्यातील आणखी एक मित्र ही संकल्पना पुढे नेत आहे याचा आम्हाला खूप आनंद आहे."