इराकमधील बसराजवळील खोर अल जुबैर बंदराजवळ हल्ल्यात मृत पावलेले कांदिवलीचे रहिवासी देवनंदन प्रसाद सिंह
इराक मधील बसराजवळील खोर अल जुबैर बंदराजवळ 'एमटी सेफसी विष्णू' या ऑईल टँकरवर बुधवारी हल्ला झाला. या हल्ल्यात कांदिवलीचे रहिवासी देवनंदन प्रसाद सिंह (५४) यांचा मृत्यू झाला. बंदर, जहाजबांधणी आणि जलमार्ग मंत्रालयाच्या जहाजबांधणी महासंचालकांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे.
मार्शल आयलँड्सचा ध्वज असलेल्या या जहाजावर सिंह कार्यरत होते. मंत्रालयाने १२ मार्च रोजी प्रसिद्ध केलेल्या पत्रकात एका भारतीय खलाशाचा मृत्यू झाल्याची पुष्टी केली होती. सिंह हे या जहाजावर अतिरिक्त मुख्य अभियंता (अधीक्षक) म्हणून सेवा बजावत होते आणि हल्ल्यात झालेल्या जखमांमुळे त्यांचा मृत्यू झाल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
सिंह यांच्या कुटुंबाने कंपनीवर गंभीर आरोप केले आहेत. त्यांच्या मते, सिंह यांनी जहाजावरील नोकरी सोडून गेल्या सात वर्षांपासून ते जमिनीवरील कार्यालयीन काम करत होते. इंजिनीअरिंग क्षेत्रात जवळपास २५ वर्षांचा अनुभव असलेल्या सिंह यांना कंपनीने जबरदस्तीने पुन्हा जहाजावर पाठवले. विशेष म्हणजे, २८ फेब्रुवारी रोजी अमेरिका आणि इस्रायलने इराणवर हल्ला करून युद्ध सुरू होण्याच्या अवघ्या तीन दिवस आधी त्यांना कामावर रुजू होण्यास भाग पाडले.
कुटुंबातील एका सदस्याने सांगितले की, "जहाजावर रुजू झाल्यानंतर अवघ्या दोन आठवड्यांतच त्यांचा मृत्यू झाला. कॉर्पोरेट क्षेत्रातील कराराच्या नियमांमुळे त्यांना या कामावर जाणे भाग पडले होते. त्यांनी जहाजावर जाणे बंद केले असतानाही त्यांना मृत्यूच्या दारात ढकलले गेले. करारातील अटींचा हवाला देऊन कंपनीने त्यांना युद्ध सुरू होण्यापूर्वी तीन दिवस आधी इराकमध्ये जहाजावर पाठवले."
मंत्रालयाच्या अधिकाऱ्याने माहिती दिली की, सिंह या घटनेत गंभीर जखमी झाले होते आणि नंतर त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. संबंधित सागरी संस्थांना याबद्दल कळवण्यात आले असून या हल्ल्याच्या परिस्थितीचा तपास सुरू आहे. हल्ल्यानंतर जहाजावरील सर्व कर्मचाऱ्यांनी समुद्रात उड्या मारल्या. त्यांना 'एसटीएस' टगने वाचवले. इराकी तटरक्षक दलाने सर्व २८ कर्मचाऱ्यांची सुटका केली. यामध्ये १६ भारतीय आणि १२ फिलिपिनो नागरिकांचा समावेश असून त्यांना बसरा बंदरात नेण्यात आले आहे.
मुंबईतील जहाजबांधणी महासंचालक कार्यालयाने या विषयावर अधिक बोलण्यास नकार दिला. 'एक्झिक्युटिव्ह मॅनेजमेंट' किंवा 'ब्राव्हो शिपिंग मॅनेजमेंट' या कंपनीने अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. दरम्यान, जहाजाचे व्यवस्थापन आणि संबंधित घटकांनी सिंह यांच्या कुटुंबाबद्दल संवेदना व्यक्त केल्या आहेत. 'बीआयटी सिंद्री'च्या माजी विद्यार्थी विभागानेही फेसबुकवर शोकसंदेश पोस्ट केला आहे.