नाताळनिमित्त दिल्लीतील ऐतिहासिक चर्चमध्ये पंतप्रधान मोदींनी केली प्रार्थना

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 1 h ago
पंतप्रधान नरेंद्र मोदी दिल्लीतील'कॅथेड्रल चर्च ऑफ द रिडेम्पशन'मध्ये प्रार्थना करताना
पंतप्रधान नरेंद्र मोदी दिल्लीतील'कॅथेड्रल चर्च ऑफ द रिडेम्पशन'मध्ये प्रार्थना करताना

 

नाताळच्या उत्साहात सहभागी होण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी सकाळी 'कॅथेड्रल चर्च ऑफ द रिडेम्पशन'ला भेट दिली. या भेटीचाव्हिडिओ शेअर करत त्यांनी देशवासियांना सणाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

"हा ख्रिसमस सर्वांच्या आयुष्यात नवी उमेद, उत्साह आणि दयाभाव घेऊन येवो. कॅथेड्रल चर्चमधील सकाळच्या प्रार्थनेचे हे काही खास क्षण..." अशा शब्दांत पंतप्रधान मोदींनी 'एक्स' या माध्यमावर आपल्या भावना व्यक्त केल्या.

दिल्ली आणि उत्तर भारतातील ख्रिश्चन बांधवांच्या मोठ्या उपस्थितीत पंतप्रधानांनी कॅथेड्रल चर्चमधील सकाळच्या विशेष प्रार्थनेत सहभाग घेतला. या कार्यक्रमात सामूहिक प्रार्थना, कॅरोल्स आणि भक्तिगीतांचा समावेश होता. यावेळी दिल्लीचे बिशप राईट रेव्हरंड डॉ. पॉल स्वरूप यांनी पंतप्रधानांसाठी विशेष प्रार्थना केली.

"दिल्लीतील 'कॅथेड्रल चर्च ऑफ द रिडेम्पशन'मधील सकाळच्या प्रार्थनेला उपस्थित राहिलो. हा कार्यक्रम प्रेम, शांतता आणि करुणेचा चिरंतन संदेश देणारा ठरला. नाताळचा हा सण आपल्या समाजात एकोपा आणि सलोखा वाढवण्यास प्रेरणा देईल," असे विचार पंतप्रधानांनी 'एक्स'वरील पोस्टमध्ये मांडले.

तत्पूर्वी, पंतप्रधानांनी देशवासियांना नाताळच्या शुभेच्छा दिल्या होत्या. "सर्वांना शांतता, करुणा आणि आशेने परिपूर्ण अशा आनंददायी ख्रिसमसच्या शुभेच्छा. येशू ख्रिस्ताची शिकवण आपल्या समाजातील बंधुभाव अधिक दृढ करो," असे त्यांनी दुसऱ्या एका पोस्टमध्ये नमूद केले.

गेल्या काही वर्षांपासून पंतप्रधान मोदी ख्रिश्चन समुदायाच्या कार्यक्रमांना नियमितपणे उपस्थित राहत आहेत. २०२३ च्या ईस्टर सणावेळी त्यांनी दिल्लीतील 'सॅक्रड हार्ट कॅथेड्रल'मधील कार्यक्रमाला हजेरी लावली होती. त्यानंतर २०२३ च्या नाताळात त्यांनी दिल्लीतील आपल्या ७, लोक कल्याण मार्ग या निवासस्थानी एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले होते. २०२४ मध्ये त्यांनी मंत्री जॉर्ज कुरियन यांच्या निवासस्थानी भोजनाचा आस्वाद घेतला आणि 'कॅथोलिक बिशप कॉन्फरन्स ऑफ इंडिया'ने आयोजित केलेल्या कार्यक्रमातही सहभाग नोंदवला होता.

राहुल गांधी आणि इतर नेत्यांकडून नाताळच्या शुभेच्छा

दुसरीकडे, लोकसभेतील विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनीही स्वतःचा व्हिडिओ शेअर करत नाताळच्या शुभेच्छा दिल्या आहेत. "सर्वांना नाताळच्या हार्दिक शुभेच्छा! हा सण तुमच्या आयुष्यात आनंद, सुख आणि समृद्धी घेऊन येवो. तसेच तुमचे जीवन प्रेम आणि करुणेने उजळून निघो," असे राहुल गांधी यांनी म्हटले आहे.

उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांनीही देशवासियांना ख्रिसमसच्या शुभेच्छा दिल्या. "आशा, प्रेम आणि दयाळूपणाने ओसंडून वाहणाऱ्या या ख्रिसमसच्या सर्वांना शुभेच्छा. येशूंचा संदेश आपल्याला अधिक मजबूत आणि संवेदनशील समाज घडवण्यासाठी प्रेरणा देवो. त्यांची शिकवण आपल्यातील बंध अधिक घट्ट करून चिरंतन शांतता प्रस्थापित करो," असे त्यांनी 'एक्स'वर लिहिले आहे.

ट्रम्प यांच्याकडून ख्रिसमस शुभेच्छा

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी बुधवारी (स्थानिक वेळेनुसार) ख्रिसमसच्या शुभेच्छा दिल्या. मात्र, यावेळी त्यांनी "रॅडिकल लेफ्ट स्कम असा उल्लेख करत विरोधकांवर जोरदार राजकीय हल्ला चढवला.

'एक्स'वरील एका पोस्टमध्ये ट्रम्प यांनी आपल्या नेतृत्वाखालील कामगिरीचा दावा केला. देशात आता उघड्या सीमा, महिलांच्या खेळांमध्ये पुरुषांचा सहभाग, सर्रास ट्रान्सजेंडर धोरणे किंवा कमकुवत कायदा सुव्यवस्था अशा समस्या उरल्या नसल्याचे त्यांनी म्हटले. याच वेळी त्यांनी भक्कम आर्थिक स्थितीकडेही लक्ष वेधले. अमेरिकेत सध्या शेअर बाजाराने उच्चांक गाठला असून '४०१ के' (निवृत्ती वेतन योजना) योजनांची स्थिती उत्तम असल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच दशकातील सर्वात कमी गुन्हेगारी दर, महागाईचा अभाव आणि ४.३ टक्के जीडीपी विकास दर असल्याचे त्यांनी सांगितले. हा विकास दर अपेक्षेपेक्षा दोन अंकांनी जास्त असल्याचा दावा त्यांनी केला.

ट्रम्प यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिले, "आपल्या देशाला उद्ध्वस्त करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणाऱ्या पण त्यात सपशेल अपयशी ठरलेल्या 'डाव्या विचारसरणीच्या जहाल गटा'सह (रॅडिकल लेफ्ट स्कम) सर्वांना ख्रिसमसच्या शुभेच्छा. आता आपल्याकडे उघड्या सीमा, महिलांच्या खेळांत पुरुषांचा प्रवेश, सर्वांसाठी ट्रान्सजेंडर धोरणे किंवा कमकुवत पोलीस यंत्रणा उरलेली नाही. त्याऐवजी आपल्याकडे विक्रमी शेअर बाजार आणि '४०१ के', दशकातील नीचांकी गुन्हेगारी, महागाई मुक्ती आणि काल नोंद झालेला ४.३ टक्के जीडीपी दर आहे. हा दर अपेक्षेपेक्षा दोन अंकांनी अधिक आहे."