शेख हसीनांच्या पलायनानंतर तारिक रहमान यांची 'ग्रँड एन्ट्री'

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 1 h ago
प्रातिनिधिक फोटो
प्रातिनिधिक फोटो

 

बांगलादेशच्या राजकारणात आज एक ऐतिहासिक आणि महत्त्वपूर्ण घटना घडली आहे. बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टीचे (बीएनपी) कार्यवाहक अध्यक्ष तारिक रहमान तब्बल १७ वर्षांच्या प्रदीर्घ वनवासानंतर मायदेशी परतले आहेत. लंडनहून आलेल्या विमानाने त्यांचे गुरुवारी ढाका येथील हजरत शाहजलाल आंतरराष्ट्रीय विमानतळावर आगमन झाले. आपल्या नेत्याच्या स्वागतासाठी पक्षाच्या हजारो कार्यकर्त्यांनी आणि समर्थकांनी विमानतळाबाहेर प्रचंड गर्दी केली होती.

तारिक रहमान हे बांगलादेशच्या माजी पंतप्रधान खालिदा झिया आणि माजी राष्ट्रपती झियाउर रहमान यांचे पुत्र आहेत. लष्कर समर्थित काळजीवाहू सरकारच्या काळात २००८ मध्ये ते उपचारासाठी लंडनला गेले होते. त्यानंतर ते तिथेच निर्वासित म्हणून वास्तव्यास होते. शेख हसीना यांच्या १५ वर्षांच्या राजवटीत त्यांच्यावर अनेक गुन्हे दाखल करण्यात आले. त्यांना विविध प्रकरणांत शिक्षाही सुनावण्यात आली होती. मात्र, शेख हसीना यांची सत्ता उलथवून लावल्यानंतर आणि त्यांनी देश सोडल्यानंतर बांगलादेशातील राजकीय परिस्थिती पूर्णपणे बदलली आहे. या बदललेल्या परिस्थितीत रहमान यांच्या परतीचा मार्ग मोकळा झाला.

विमानतळावर उतरल्यानंतर रहमान यांचे जंगी स्वागत करण्यात आले. सकाळपासूनच बीएनपीचे कार्यकर्ते ढोल-ताशे आणि पक्षाचे झेंडे घेऊन विमानतळ परिसरात जमले होते. 'देशनायक तारिक रहमान' आणि 'बीएनपी झिंदाबाद' अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता. गर्दी एवढी प्रचंड होती की विमानतळाकडे जाणारे सर्व रस्ते समर्थकांनी व्यापले होते. कडेकोट पोलीस बंदोबस्त असूनही कार्यकर्त्यांचा उत्साह ओसंडून वाहत होता. रहमान यांनी बाहेर येताच हात उंचावून उपस्थितांचे अभिवादन स्वीकारले.

आगामी काळात होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकांच्या दृष्टीने त्यांचे हे पुनरागमन अत्यंत निर्णायक मानले जात आहे. गेली अनेक वर्षे त्यांनी लंडनमधून व्हर्च्युअल माध्यमातून पक्षाची धुरा सांभाळली होती. आता ते प्रत्यक्ष मैदानात उतरून पक्षाचे नेतृत्व करतील. देशात लोकशाही प्रक्रिया बळकट करणे आणि विस्कळीत झालेली पक्षाची घडी पुन्हा बसवणे हे त्यांच्यासमोरचे मोठे आव्हान असेल. त्यांच्यावर दाखल असलेल्या जुन्या खटल्यांबाबत न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण करून ते पुन्हा सक्रिय राजकारणात सहभागी होतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. त्यांच्या आगमनामुळे बांगलादेशातील सत्तासंघर्षाला नवी कलाटणी मिळाली आहे.