आनंद हर्डीकर
भारतीय हितसंबंधांच्या दृष्टिकोनातून विचार करता १९७१ नंतरच्या कालखंडातील सर्वांत मोठे राजनैतिक आव्हान बांगलादेशामधील सध्याच्या घडामोडींमुळे निर्माण झाले आहे, असे संसदेच्या समितीने नुकतेच नमूद केले. ज्या शेख हसीनांच्या राजवटीविरुद्धच्या बंडाळीमुळे ही असाधारण परिस्थिती निर्माण झाली आहे, त्या शेख हसीना यांना भारताने आश्रय दिला आहे, म्हणून ढाक्यामधील भारतीय वकिलातीवर हल्ला करण्याच्या इराद्याने तिकडचे तरुण मोर्चे काढत आहेत. या पार्श्वभूमीवर या प्रश्नांच्या मुळाशी जाणारे एक पुस्तक लक्ष वेधून घेते. 'वंगबंधू' म्हणवल्या जाणाऱ्या शेख मुजिबूर रहमान यांच्याच धोरणात्मक घोडचुकांची उत्तरचिकित्सा करणारे हे पुस्तक मानस घोष या पत्रकाराने लिहिले आहे.
१९७२मध्ये सत्तासूत्रे हाती घेतलेल्या झुल्फिकार अली भुट्टो यांनी कराचीतल्या जाहीर सभेत प्रश्न विचारला होता, "सध्या तुरुंगात असणाऱ्या शेख मुजीबना मी सोडून द्यावे, असे तुम्हाला वाटते का?" आणि लाखभर नागरिकांच्या त्या जमावाकडून होकार मिळाल्यावर 'तुम्ही माझ्या डोक्यावरचे ओझे उतरवले आहे', असे भुट्टो म्हणाले होते. जणू काही लोकमताचा मान राखण्यासाठीच मुजीबना तुरुंगातून सोडत आहोत, अशा थाटात त्यांनी त्या बंगाली नेत्याला मुक्त केले होते. याह्याखानांनी मुजीब यांचा काटा काढण्याचा अनेकदा प्रयत्न करून पाहिला होता; परंतु ते सगळे प्रयत्न या ना त्या कारणाने फसले होते.
ढाका येथील परेड ग्राउंडवर डिसेंबर १९७१मध्ये पाकिस्तानी सैन्याने भारतीय सैन्यासमोर बिनशर्त शरणागती पत्करली होती. त्या निर्णायक पराभवामुळे पाकिस्तानचे ९३हजार सैनिक व अधिकारी युद्धकैदी म्हणून भारताच्या तावडीत सापडले होते. त्यांना सोडवून परत मायदेशी आणायचे असेल, तर आपल्या कैदेत असणाऱ्या मुजीबना सोडावे लागेल, हे समजण्याइतके व्यावहारिक शहाणपण भुट्टोंकडे होते. तथापि त्याबरोबरच खुनशी वृत्तीही त्यांच्यात होती. भुट्टोंनी मुजीबना 'जीवदान' दिल्याचे श्रेय आपल्याकडे घेत मुजीब यांचा त्यांनी विश्वास संपादन केला. 'पश्चिम पाकिस्तानातल्या या नेत्याने आपल्याला सोडले आहे', या कृतज्ञतेच्या दडपणाखाली तो बांगलादेशी नेता पुढील काळात कसा वाहवत गेला, याचे तपशील लेखकाने दिले आहेत.
'मुक्तते' नंतर MA CHOSH मुजीबना नवी दिल्ली किंवा ढाका येथे न पाठवता थेट लंडनला पाठवण्यापासून ताजुद्दिन अहमद या बांगलादेशच्या त्यावेळच्या पंतप्रधानांबद्दल मुजीब यांच्या मनात संशयाचे विखारी बीजारोपण करण्यापर्यंत भुट्टोंनी काय काय केले, त्यांचे ते सर्व कट अमेरिकी/ब्रिटिश व चिनी राजनैतिक अधिकाऱ्यांच्या सहमतीने कसे आखले जात होते, हे बारकाव्यानिशी लेखकाने मांडले आहे. अलीकडे खुल्या झालेल्या गोपनीय दस्तऐवजांच्या आधारे तारिक शुजात/मानस घोष यांनी हे सिद्ध केले आहे की, पाकिस्तानची फाळणी होऊ नये, बांगलादेश उदयाला येऊ नये, भारतीय सेना आणि मुक्तिबाहिनीच्या संयुक्त नेतृत्वासमोर पाकिस्तानी सेनेने शरणागती पत्करू नये, यासाठी या तिन्ही बड्या देशांनी प्रयत्न करून पाहिले, परंतु ते फसले.
भारताला वेगळे पाडून बांगलादेश पुन्हा पाकिस्तानच्या जवळ कसा खेचता येईल, याची व्यूहरचना आखली गेली आणि भुट्टोंचा प्याद्यासारखा वापर केला गेला. ताजुद्दिन अहमद यांच्याबद्दल संशयाची पेरणी, त्यांना 'भारताचा हस्तक' ठरवून अवामी लीगच्या नेतृत्वापासून दूर ढकलण्याचा प्रयत्न, पाकिस्तानवादी नोकरशहांना हाताशी धरून पंतप्रधानपद खेचून घेण्याचा मुजीब यांचा निर्णय... वगैरे अनेक प्रसंगांमध्ये भुट्टोंचा अप्रत्यक्ष सहभाग होता. 'पाकिस्तानचे दोन तुकडे झाले असले, तरी आपण परत एकत्र येऊ या, मी पश्चिमेकडे राज्य सांभाळतो, तुम्ही पूर्वेकडचे सर्वाधिकारी व्हा. आपण दोघे 'सह-पंतप्रधान' म्हणून पाकिस्तानवर राज्य करु या', हा प्रस्ताव ठेवण्यापर्यंत भुट्टोंनी जून १९७४ मध्ये मजल मारली होती.
तथापि मुजीबनी त्या योजनेला अनुकूलता दर्शवली नाही. साहजिकच त्यांना दूर केल्याशिवाय बांगलादेशातला भारताचा वाढलेला प्रभाव निष्प्रभ ठरवता येणार नाही, हातपाय पसरता येणार नाहीत, हे कारस्थानी देशांना उमगले. त्यानंतर वेगाने चक्रे फिरली आणि मुजीबना ठार मारण्याचा कट शिजला. त्या कटाचे सूत्रधार कोण होते, बांगलादेशाच्या सेनेतील दुफळीचा कटवाल्यांनी कसा फायदा उठवला होता आणि १५ ऑगस्ट १९७५ रोजी प्रत्यक्षात ती हत्या कशी घडली, हा थरारक घटनाक्रम मुळातून वाचायला हवा. आजची बांगलादेशाची तरुण पिढी शेख हसीना वाजेद या मुजीबकन्येच्या जिवावर उठली असताना मुजीब यांच्या चुकांची उत्तरचिकित्सा करणारे हे पुस्तक अभ्यासणे आवश्यक आहे.
(पुस्तक : मुजीब्स ब्लंडर्स- द पॉवर अॅण्ड द प्लॉट बिहाइंड हिज किलिंग, लेखक : मानस घोष)
'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा -