बांगलादेशातील तरुण आणि प्रभावशाली विद्यार्थी नेता शरीफ ओसमान हादी याच्या निधनानंतर संपूर्ण बांगलादेशात गुरुवारी रात्रीपासून हिंसक आंदोलने सुरू झाली आहेत. देशातील सार्वत्रिक निवडणुका तोंडावर असतानाच या घटनेमुळे मोठ्या प्रमाणावर अशांतता पसरण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
निवडणूक प्रचारादरम्यान झाला होता हल्ला
गेल्या वर्षी शेख हसीना सरकार उलथवून टाकण्यात शरीफ हादीने महत्त्वाची भूमिका बजावली होती. गेल्या शुक्रवारी ढाका येथे आपल्या निवडणूक प्रचाराचा शुभारंभ करत असताना बुरखाधारी हल्लेखोरांनी त्याच्या डोक्यात गोळी झाडली होती. सुरुवातीला स्थानिक रुग्णालयात उपचार केल्यानंतर त्याला तातडीने सिंगापूरला हलवण्यात आले. मात्र, तिथे सहा दिवस व्हेंटिलेटरवर राहिल्यानंतर त्याची प्राणज्योत मालवली.
वृत्तपत्रांच्या कार्यालयांची तोडफोड
हादीच्या मृत्यूची बातमी वाऱ्यासारखी पसरली आणि ढाकामध्ये संतापलेल्या जमावाने उच्छाद मांडला. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओंमध्ये संतप्त जमाव बांगलादेशातील सर्वात मोठे वृत्तपत्र 'प्रथम आलो' आणि 'डेली स्टार' यांच्या कार्यालयांची तोडफोड करताना दिसत आहे. आंदोलकांनी हादीच्या नावाने घोषणाबाजी करत संपूर्ण परिसर डोक्यावर घेतला होता. रॉयटर्स या वृत्तसंस्थेच्या मते, ढाकामधील अनेक भागात आजही तणाव कायम असून परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी अतिरिक्त सुरक्षा दले तैनात करण्यात आली आहेत.
मोहम्मद युनूस यांचे आवाहन
हादीच्या निधनावर प्रतिक्रिया देताना बांगलादेशचे अंतरिम नेते मोहम्मद युनूस म्हणाले, "हादीचे जाणे हे देशाच्या राजकीय आणि लोकशाही क्षेत्रासाठी कधीही न भरून येणारे नुकसान आहे." त्यांनी या प्रकरणाची पारदर्शक चौकशी करण्याचे आश्वासन दिले असून नागरिकांना शांतता राखण्याचे आवाहन केले आहे.
शेख हसीना यांच्या सत्तापालटानंतर बांगलादेश एका नाजूक वळणावर आहे. अशातच एका लोकप्रिय तरुण नेत्याची हत्या झाल्याने देशात पुन्हा एकदा अस्थिरता निर्माण होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.