दिल्लीतील ऐतिहासिक लाल किल्ल्याजवळ १० नोव्हेंबर रोजी झालेल्या कार बॉम्बस्फोट प्रकरणाचा तपास करणाऱ्या राष्ट्रीय तपास यंत्रणेने (NIA) गुरुवारी आणखी एका मुख्य आरोपीला अटक केली. यासिर अहमद दार असे या आरोपीचे नाव असून त्याला दिल्लीतूनच ताब्यात घेण्यात आले आहे. या अटकेनंतर त्याला न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्याला २६ डिसेंबरपर्यंत कोठडी सुनावली आहे.
आत्मघाती हल्ल्याची घेतली होती शपथ
यासिर अहमद दार हा मूळचा काश्मीरमधील शोपियान येथील रहिवासी आहे. या प्रकरणात अटक करण्यात आलेला तो नववा आरोपी ठरला आहे. तपास यंत्रणेने दिलेल्या माहितीनुसार, यासिर हा बॉम्बस्फोटाच्या कटात सक्रियपणे सहभागी होता. तपासात असे समोर आले आहे की, त्याने दहशतवादी कारवायांसाठी स्वतःचे बलिदान देण्याची शपथ घेतली होती. या हल्ल्यातील इतर मुख्य आरोपी, जसे की स्फोट झालेली कार चालवणारा उमर-उन-नबी आणि मुफ्ती इरफान यांच्याशी तो सतत संपर्कात होता.
तपासाची व्याप्ती वाढली
या दहशतवादी हल्ल्याचा कट पूर्णपणे उघड करण्यासाठी तपास यंत्रणा विविध केंद्रीय आणि राज्य संस्थांच्या मदतीने काम करत आहे. या महिन्याच्या सुरुवातीला जम्मू-काश्मीर आणि उत्तर प्रदेशमध्ये अनेक संशयितांच्या ठिकाणांवर छापे टाकण्यात आले होते. यादरम्यान अनेक डिजिटल उपकरणे आणि आक्षेपार्ह कागदपत्रे जप्त करण्यात आली आहेत.
यापूर्वी या प्रकरणातील मुख्य आरोपी डॉ. मुझम्मिल शकील गनी आणि डॉ. शाहीन सईद यांच्या फरीदाबाद येथील विद्यापीठ परिसरातील ठिकाणांवरही झडती घेण्यात आली होती. यासिरच्या अटकेमुळे या संपूर्ण कटाचा मास्टरमाईंड कोण होता आणि त्यांचे पुढील नियोजन काय होते, याबाबत महत्त्वाची माहिती मिळण्याची शक्यता आहे.