समीर दि. शेख
नुकताच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा इथिओपिया दौरा संपन्न झाला. या दौऱ्यात त्यांना इथिओपियाचा सर्वोच्च सन्मान 'ग्रेट ऑनर निशान' देऊन गौरवण्यात आले. यावेळी बोलताना पंतप्रधानांनी एक ऐतिहासिक आठवण करून दिली. ते म्हणाले, "भारत आणि इथिओपियाचे संबंध आजचे नसून तब्बल २,००० वर्षांपूर्वीचे आहेत."
भारत आणि इथिओपिया यांच्यातील या २,००० वर्षांच्या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक नात्यातील सर्वात तेजस्वी आणि महत्त्वाचा दुवा कोणता असेल, तर तो म्हणजे— मलिक अंबर. एक असा माणूस, जो इथिओपियात गुलाम म्हणून जन्मला, पण आपल्या कर्तृत्वाने दखनेचा 'अघोषित राजा' बनला. ज्याने मोगलांच्या बलाढ्य सत्तेला दाती तृण धरायला लावले.
मलिक अंबरचा जन्म १५४० च्या सुमारास इथिओपियातील 'ओरोमो' जमातीत झाला. त्याचे मूळ नाव 'चापू' होते. बालपणीच त्याला पकडून गुलामांच्या बाजारात विकले गेले. अरबी व्यापाऱ्याकडून बगदाद आणि तिथून भारतापर्यंत त्याचा प्रवास झाला. नशिबाने त्याला अहमदनगरच्या निजामशाहीत आणले. तिथल्या पेशव्याने मलिक अंबरला विकत घेतले. मालकाच्या मृत्यूनंतर मलिक अंबरला स्वातंत्र्य मिळाले, पण त्याने केवळ स्वतःचे स्वातंत्र्य मिळवून तो थांबला नाही, तर त्याने आपल्या कौशल्याने ७,००० सैनिकांची फौज उभी केली.
मलिक अंबरच्या यशात मराठा सरदारांचा मोठा वाटा होता. मलिक अंबरचे सर्वात विश्वासू उजवे हात म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचे आजोबा मालोजीराजे भोसले. मलिक अंबरने मालोजीराजेंचे शौर्य ओळखून त्यांना पुणे आणि सुपे यांसारख्या महत्त्वाच्या भागांची जहागिरी दिली. हीच ती भूमी होती, जिथे पुढे स्वराज्याचे रोपटे लावले गेले. पुढील काळात शहाजीराजे भोसले यांनीही मलिक अंबरच्या मार्गदर्शनाखाली अनेक युद्धे लढली. १६२४ च्या 'भातावाडीच्या युद्धात' जेव्हा मोगल आणि विजापूरच्या आदिलशाहीने एकत्र येऊन अहमदनगरवर चाल केली, तेव्हा मलिक अंबर आणि शहाजीराजे यांनी मिळून त्यांचा धुव्वा उडवला.
मराठी साम्राज्याच्या उभारणीत मलिक अंबरचे स्थान किती महत्त्वाचे आहे, यावर ज्ञानपीठ पुरस्कार विजेते ज्येष्ठ लेखक भालचंद्र नेमाडे यांनी मांडलेले विचार अत्यंत मूलगामी आहेत. नेमाडे म्हणतात, "मराठा साम्राज्याची स्थापना कुणी केली असेल तर फार तर आपण शहाजी राजांपर्यंत जातो. शहाजी राजांच्या मागे जाणं आपल्याला परवडत नाही. कारण शहाजी राजांच्या आधी मराठी साम्राज्याचा कर्ता मलिक अंबर असतो. मलिक अंबरनं प्रथम मराठ्यांना राष्ट्रीयत्वाचं भान आणून दिलं. उत्तरेकडच्या मोगलांविरूद्ध दखनी मराठे संघटीत केले, गनिमी कावा पहिल्यांदा यशस्वी रीतीनं शोधून वापरला. शहाजी राजांसारखे सरदार तयार केले. खंडागळे विरुद्ध जाधव, जाधव विरुद्ध भोसले असे परस्परांशी लढणारे सगळे दखनी मराठे एकत्र करणारा मलिक अंबर महाराष्ट्राच्या आपल्या मध्यवर्ती संस्कृतीत धरायचा नाही?"
नेमाडे यांच्या या विधानाने इतिहास वर्तुळात मोठी खळबळ उडवून दिली होती, परंतु त्यातून मलिक अंबरने विखुरलेल्या मराठा शक्तीला एका ध्येयासाठी एकत्र आणले, हे सत्य अधोरेखित झाले.
मलिक अंबरप्रती छत्रपती शिवाजी महाराजांना किती आदर होता, याचा सर्वांत मोठा पुरावा १६७० च्या दशकात मिळतो. जेव्हा शिवरायांनी कवींद्र परमानंद यांना 'शिवभारत' हे महाकाव्य रचण्याची आज्ञा दिली, तेव्हा त्यात या दिवंगत मुस्लिम योद्धा मलिक अंबरसाठी अत्यंत गौरवोद्गार काढले गेले.
'शिवभारता'त एका युद्धप्रसंगाचे वर्णन करताना कवी म्हणतात, "ज्याप्रमाणे कार्तिकेयाने तारकासुरासोबतच्या युद्धात देवांचे रक्षण केले, त्याचप्रमाणे शहाजीराजे आणि इतर राजे मलिक अंबरच्या भोवती जमा झाले होते." शिवरायांच्या कवीने मलिक अंबरला 'सूर्यासारखा पराक्रमी', 'अचाट शक्तीचा स्वामी' आणि 'ज्याला पाहून शत्रू थरथर कापतात' अशा शब्दांत वर्णिले आहे. मृत्यूनंतरही 'तेजस्वी मावळत्या सूर्याप्रमाणे' भासणारा हा महापराक्रमी योद्धा मुळात आफ्रिकेत जन्मलेला एक गुलाम होता, हे विशेष.
छत्रपती शिवाजी महाराजांनी गनिमी काव्याचा (Guerrilla Warfare) स्वराज्य निर्मितीत फार प्रभावी वापर केला. विशेष म्हणजे, मोगलांच्या प्रचंड मोठ्या फौजेला हरवण्यासाठी छोट्या तुकड्यांनी डोंगराळ भागात अचानक हल्ला करण्याची ही पद्धत मलिक अंबरने सर्वात आधी प्रभावीपणे वापरली. याला 'बर्गीगिरी' म्हटले जाई.
महान प्राच्यविद्यापंडित शरद पाटील यांनीही मलिक अंबरच्या योगदानावर मोठे भाष्य केले होते. मलिक अंबरवर पुस्तक लिहिताना त्यांनी दशकापूर्वी एक धाडसी विचार मांडला होता. औरंगाबादच्या नामांतराचा विषय चर्चिला जात असताना शरद पाटील यांनी सुचवले होते की, जर औरंगाबादचे नाव बदलायचेच असेल, तर ते या शहराचा खरा संस्थापक असलेल्या मलिक अंबरच्या स्मरणार्थ 'अंबराबाद' करावे. मलिक अंबरनेच या शहराची (खडकी) पायाभरणी केली होती आणि तिथे पाण्याचे कालवे (नहर-ए-अंबरी) बांधून शहर समृद्ध केले होते.
मोगल सम्राट जहांगीर हा मलिक अंबरवर इतका चिडला होता की, त्याने आपल्या दरबारी चित्रकाराकडून एक काल्पनिक चित्र काढून घेतले होते. त्या जगप्रसिद्ध चित्रात जहांगीर मलिक अंबरच्या छाटलेल्या मुंडक्यावर बाण मारताना दाखवला आहे. प्रत्यक्षात जहांगीरला मलिक अंबरला कधीच हरवता आले नाही, म्हणून त्याने चित्रातून आपला राग व्यक्त केला. हीच मलिक अंबरच्या पराक्रमाची सर्वात मोठी पावती होती.
१४ मे १६२६ रोजी वयाच्या ७८व्या वर्षी मलिक अंबरचा मृत्यू झाला. आजही त्याचे वंशज अहमदनगर जिल्ह्यात वास्तव्यास आहेत आणि त्यांना अगदी अलीकडेपर्यंत सिंधिया घराण्याकडून पेन्शनही मिळत होती.
मलिक अंबरने महाराष्ट्राला युद्धनीती तर दिलीच, सोबतच जमीन महसूल व्यवस्थेचा पायाही रचला. याचा मोठा फायदा पुढे रयतेला झाला.
परकीय भूमीत गुलाम म्हणून आलेल्या एका व्यक्तीने तिथल्या लोकांशी एकरूप होत साम्राज्याच्या प्रमुख पदापर्यंतचा केलेला प्रवास आणि दिलेला लढा जागतिक इतिहासात अद्वितीय आहे.
पंतप्रधान मोदी इथिओपियाशी मैत्रीचे नवे पर्व सुरू करत आहेत. अशावेळी या दोन देशांच्या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक नात्यातील महत्वाचा दुवा राहिलेल्या मलिक अंबरची आणि त्याच्या कर्तृत्वाची आठवण होणे क्रमप्राप्त आहे.
(लेखक आवाज- द व्हॉइस मराठीचे संपादक आहेत.)
'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा -