ओवेस सकलेन अहमद
गेल्या उन्हाळ्यात जेव्हा २५ वर्षांची बॉक्सर सिंडी नगाम्बा पॅरिस ऑलिम्पिकच्या व्यासपीठावर उभी राहिली, तेव्हा तिच्या खांद्यावर पदकापेक्षाही मोठे ओझे होते. मूळची कॅमेरूनची असलेल्या सिंडीसाठी तिथे कोणतेही राष्ट्रगीत वाजले नाही किंवा तिचा स्वतःचा ध्वजही लहरला नाही. आपल्या लैंगिक ओळखीमुळे मायदेशी गेल्यास होणारा छळ टाळण्यासाठी ती 'शरणार्थी ऑलिम्पिक संघातून' (Refugee Olympic Team) खेळत होती.
कांस्य पदक जिंकून ऑलिम्पिकमध्ये पदक मिळवणारी पहिली शरणार्थी खेळाडू ठरल्यावर तिने एक विधान केले, जे आपल्याला हादरवून सोडणारे आहे. ती म्हणाली, "मी अशा १२ कोटींहून अधिक विस्थापित लोकांचे प्रतिनिधित्व करते ज्यांच्याकडे स्वप्ने तर आहेत, पण ती पूर्ण करण्यासाठी संधी नव्हती". त्या एका क्षणात ती अशा प्रत्येक स्थलांतरितासाठी बोलली जी माणसे अशी शहरे उभी करतात जिथे राहणे त्यांना परवडत नाही, जी दुसऱ्यांची मुले सांभाळतात आणि ज्यांचे स्वतःचे आयुष्य केवळ फरशी पुसण्यात खर्ची पडते.
मदिनेचा आदर्श आणि इतिहासाची पुनरावृत्ती
विस्थापित होण्याची ही कहाणी नवीन नाही. चौदाशे वर्षांपूर्वी प्रेषित मोहम्मद (स.) यांनाही मारेकरी मागे लागलेले असताना मक्का सोडून मदिनेत आश्रयाला यावे लागले होते. तेव्हा मदिनेच्या रहिवाशांनी म्हणजेच 'अन्सार'नी जे केले ते अद्भूत होते. त्यांनी प्रत्येक शरणार्थी कुटुंबाला आपल्या एका स्थानिक कुटुंबाशी जोडून दिले आणि आपली घरे व व्यवसाय त्यांच्याशी समान वाटून घेतले. ही केवळ दानशूरता नव्हती, तर ती खरी भागीदारी होती. कुराणमध्येही अशा लोकांचे कौतुक केले आहे ज्यांनी "आश्रयाला आलेल्यांवर प्रेम केले" आणि स्वतः संकटात असतानाही दुसऱ्यांना प्राधान्य दिले.
प्रेषितांनी मदिनेत आल्यावर दिलेला पहिला संदेश अतिशय व्यावहारिक होता: "शांतता पसरवा, अन्न द्या आणि लोक झोपलेले असताना प्रार्थना करा". जेव्हा एखाद्या शहराची लोकसंख्या विस्थापित लोकांमुळे अचानक दुप्पट होते, तेव्हा सर्वसमावेशक समाज कसा उभा करावा, याचा हा एक उत्तम आराखडा होता.
आजचे दाहक वास्तव
पण आजची परिस्थिती याच्या अगदी उलट आहे. आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेच्या (ILO) २०२३ च्या आकडेवारीनुसार, जगभरातील १.१५ कोटी घरकाम करणाऱ्या स्थलांतरित महिलांना रोज पासपोर्ट जप्त होणे, मजुरीची चोरी आणि अत्याचाराचा सामना करावा लागतो. गेल्या वर्षी प्रवासादरम्यान ८,५०० हून अधिक स्थलांतरितांचा मृत्यू झाला असून ही आतापर्यंतची सर्वात मोठी संख्या आहे. या प्रत्येक आकड्यामागे कोणाची तरी मुलगी दिवसाचे सोळा-सोळा तास राबत आहे, तर कोणाचा तरी मुलगा कित्येक महिने पगार न मिळाल्याने अडकून पडला आहे.
मदिनेच्या संविधानात स्पष्टपणे म्हटले होते: "स्थलांतरितांचे हक्क हे त्यांच्या यजमानांइतकेच असतील". कुराणमध्येही (९:६) सांगितले आहे की जर कोणी संरक्षण मागितले तर त्याला कोणत्याही अटींशिवाय ते दिले पाहिजे.
आपण सर्वच स्थलांतरित आहोत
हे केवळ पुस्तकी ज्ञान नसून जगण्याचा भाग होता. पण काळानुसार आपण हे विसरलो की आपल्या प्रत्येकाच्या घरात एक स्थलांतराची कथा दडलेली आहे. कॉलेजसाठी शहरात आलेले तुमचे आजोबा असोत किंवा दुसऱ्या राज्यात लग्न करून गेलेली तुमची मावशी; आपण सर्वजण अशाच लोकांचे वंशज आहोत जे कधीतरी नवीन ठिकाणी काहीतरी आशा घेऊन आले होते.
पॅरिस ऑलिम्पिकमधील शरणार्थी संघाची वाढलेली संख्या हे सिद्ध करते की विस्थापन तुमची स्वप्ने कमी करत नाही, तर ती अधिक धारदार करते. प्रेषितांनी आपल्या अनुयायांना "या जगात असे राहा जणू तुम्ही प्रवासी किंवा अनोळखी आहात" असे सांगितले होते. याचाच अर्थ असा की आपण कोणालाही परके वाटू देऊ नये, कारण आपण सर्वजण या पृथ्वीवर तात्पुरते रहिवासी आहोत.
तुमचा फ्लॅट बांधणारा मजूर कदाचित तिथे राहू शकत नाही. पहाटे ५ वाजता ऑफिसेस साफ करणारी महिला कदाचित आठवडेभर स्वतःचे घर साफ पाहू शकत नाही. डिलिव्हरी बॉय वेळेच्या शर्यतीत स्वतःच्या मुलाची पहिली पावले पाहायला मुकत असेल. या लोकांना तुमची दया नको आहे, त्यांना फक्त न्याय हवा आहे. आपल्या मुलांना चांगल्या शाळेत पाठवण्याचा आणि सन्मानाने जगण्याचा त्यांना हक्क आहे.
या आंतरराष्ट्रीय स्थलांतरित दिवशी आपण स्वतःला एक साधा प्रश्न विचारूया: "आपण घराबाहेरच्या सुरक्षा रक्षकाला कोणाचा तरी वडील म्हणून बघणे कधीपासून थांबवले?". मदिनेच्या लोकांनी स्वतःचे घर आणि संपत्ती वाटून घेतली होती कारण त्यांना त्या अनोळखी व्यक्तींच्या डोळ्यात स्वतःचेच प्रतिबिंब दिसले होते. खरे तर अनोळखी व्यक्ती म्हणजे दुसरे तिसरे कोणी नसून असे नातेवाईक आहेत ज्यांना आपण अजून भेटलेलो नाही.
म्हणूनच आज तुमच्या इमारतीच्या वॉचमनचे नाव जाणून घ्या, घरकाम करणाऱ्या मावशींना त्यांच्या स्वप्नांबद्दल विचारा आणि डिलिव्हरी करणाऱ्या मुलाला मनापासून काहीतरी जास्तीचे द्या. हे बदल लहान वाटत असले तरी क्रांतीची सुरुवात नेहमीच दुर्लक्षित माणसांना पुन्हा लक्षात घेण्यापासून होते.
शेवटी एक कटू सत्य हेच आहे की आपण सर्वजण केवळ वेळेचे प्रवासी आहोत. आजचा रहिवासी हा कालचा नवा पाहुणा होता. जे सुरक्षा कवच आज आपल्याला वाचवत आहे, तेच उद्या आपल्याला नाकारू शकते. जगातील २८ कोटी स्थलांतरितांशी माणुसकीने वागणे आपल्याला परवडेल का, हा प्रश्न नाहीये; तर तसे न करणे आपल्याला परवडेल का, हा खरा प्रश्न आहे.
(लेखक बेंगळुरूमध्ये विमान वाहतूक क्षेत्रात कार्यरत आहेत)
'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा -